अंतराळात डेटा सेंटर उभारण्याची एलन मस्क यांची महत्त्वाकांक्षी योजना
वॉशिंग्टन : SpaceX AI Satellites अमेरिकन नियामकांनी एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीला अंतराळात डेटा सेंटर म्हणून काम करणारे १० लाखांपर्यंत उपग्रह तैनात करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयामुळे अंतराळ संशोधनात अडथळे येतील आणि रात्रीच्या आकाशाचे स्वरूप बदलेल, असा इशारा देत खगोलशास्त्रज्ञांनी या प्रकल्पावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनने स्पष्ट केले की, प्रस्तावित ‘स्टारमाइंड’ नेटवर्क अंतराळात डेटा प्रोसेस करेल. यामुळे पृथ्वीवरील आर्टिफिशियल इंटेलिजेंस कॉम्प्युटिंगची वाढती मागणी पूर्ण होण्यास मदत होईल. हे उपग्रह ऑप्टिकल लिंकद्वारे संवाद साधतील आणि अंतराळातील कचऱ्याच्या नियमांचे पालन करतील. एफसीसीचे अध्यक्ष ब्रेंडन कॅर यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, राष्ट्रपती ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका ‘सुपर इंटेलिजेंस’च्या युगात जगाचे नेतृत्व करेल, असा विश्वास व्यक्त केला. या परवान्यानुसार स्पेसएक्सला २०३३ पर्यंत उपग्रह तैनात करण्यास सुरुवात करावी लागेल, २०३५ पर्यंत १ लाख उपग्रह, तर २०४० पर्यंत संपूर्ण नेटवर्क पूर्ण करावे लागेल.
हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पृथ्वीच्या वरच्या वातावरणासाठी विनाशकारी ठरू शकतो, असा गंभीर इशारा युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधक इलोइस मॅरेस आणि कॉनर बार्कर यांनी दिला आहे.
संशोधकांच्या गणनेनुसार, हे १० लाख उपग्रह कक्षेत नेण्यासाठी स्पेसएक्सला आपल्या महाकाय स्टारशिप रॉकेटची वर्षाला किमान ५,००० उड्डाणे (म्हणजेच दररोज सुमारे १४ प्रक्षेपणे) करावी लागतील. यामुळे २०२५ च्या तुलनेत रॉकेट प्रक्षेपणातून होणारे एकूण प्रदूषण १५० पटींहून अधिक वाढण्याची भीती आहे.
या प्रकल्पाचे काय आहे मुख्य धोके
ओझोन थराला मोठा धोका – रॉकेट पृथ्वीवर परतताना आणि आयुष्य संपलेले जुने उपग्रह वातावरणात जळून खाक होताना दरवर्षी २.३३ ते ५.०७ लाख मेट्रिक टन नायट्रोजन ऑक्साईड्स वायू तयार होतील. हे प्रमाण संपूर्ण युरोपीय देशांच्या वार्षिक प्रदूषणाएवढे असून, यामुळे सूर्याच्या घातक अतिनील किरणांपासून संरक्षण करणारा ओझोन थर कमकुवत होईल.
धातूंचे प्रदूषण आणि धुके – दरवर्षी सुमारे २ लाख मेट्रिक टन उपग्रहांचे अवशेष वातावरणात जळतील. त्यातून बाहेर पडणारे ॲल्युमिनियमचे सूक्ष्म कण वरच्या वातावरणात धुके तयार करून पृथ्वीवर येणाऱ्या सूर्यप्रकाशात बदल घडवू शकतात.
मिथेन गळती – स्टारशिपमध्ये इंधन भरताना होणाऱ्या गळतीमुळे दरवर्षी ६०,००० मेट्रिक टन मिथेन वातावरणात मिसळू शकतो, जो कार्बन डायऑक्साईडपेक्षाही अधिक घातक हरितगृह वायू आहे.
Read About : Horizon Supercomputer : अमेरिकेतील शक्तिशाली शैक्षणिक सुपरकॉम्प्युटर होरायझन कार्यान्वित; 132 पेटाफ्लॉप्स वेगाने करणार संशोधन
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.