अहमदाबादच्या सॅटलीओ लॅब्सकडून प्रायोगिक उपग्रहाची चाचणी; भविष्यात १५ सूक्ष्म उपग्रहांच्या मदतीने शहरी उष्णता, जंगलातील वणव्यांवर लक्ष ठेवण्याचे उद्दिष्ट
अहमदाबाद : Tapas-1 Satellite हवामान बदलामुळे उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि जंगलातील आगींचे संकट वाढत असताना भारतातील अहमदाबादस्थित ‘सॅटलीओ लॅब्स’ या अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअपने वेगळी मोहीम हाती घेतली आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान अंतराळातून मोजणारी उपग्रह यंत्रणा विकसित करून आपत्तींचा अंदाज अधिक वेगाने देण्याची कंपनीची योजना आहे.
‘पायरो’ नावाच्या प्रस्तावित मोहिमेत १५ सूक्ष्म उपग्रहांचा समावेश असेल. या ‘थर्मामीटर’ उपग्रह मोहिमेअंतर्गत २०३० च्या सुरुवातीपर्यंत हे उपग्रह पृथ्वीच्या कमी उंचीवरील कक्षेत तैनात करण्याचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रगत उष्णता संवेदकांच्या मदतीने दहा मीटरपेक्षा अधिक सूक्ष्म तपशीलाने तापमानातील बदल टिपता येतील. त्यामुळे शहरांमधील अतिउष्ण भाग ओळखून स्थानिक प्रशासनाला नियोजन करता येईल, असे सॅटलिओ लॅब्सच्या सहसंस्थापक ऊर्मिला बखाई यांनी सांगितले.
शेती क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. पिकांची पाने सुकण्यापूर्वीच तापमानातील बदलांवरून पाण्याचा ताण ओळखता येऊ शकतो. जंगलातील आगींचे सुरुवातीचे संकेत, औद्योगिक उत्सर्जन आणि संरक्षण क्षेत्रातील तापमानातील असामान्य बदल टिपण्याचेही नियोजन आहे.
‘तापस-१’ ची अंतराळात चाचणी
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पहिली पायरी म्हणून १ ऑक्टोबर रोजी स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटद्वारे ‘तापस-१’ हा प्रायोगिक पेलोड अवकाशात पाठवण्यात आला. ही यंत्रणा यशस्वी ठरल्यास पुढील चाचण्यांचा मार्ग मोकळा होईल. ‘तापस-२’ फेब्रुवारी २०२७ पर्यंत तयार करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.
निधी आणि प्रक्षेपणाचे आव्हान
२०२३ मध्ये स्थापन झालेल्या कंपनीने आतापर्यंत सुमारे ६ दशलक्ष डॉलर निधी उभारला आहे. संभाव्य ग्राहकांकडून ५४ दशलक्ष डॉलर मूल्याची स्वारस्यपत्रे मिळाल्याचा कंपनीचा दावा आहे. मात्र, उपग्रह तयार करण्याइतकेच त्यांना वेळेत प्रक्षेपित करण्यासाठी रॉकेट उपलब्ध होणे हेही मोठे आव्हान आहे. भारत सरकारच्या इन-स्पेस आणि इस्रोच्या सुविधांचा वापर करून कंपनी चाचण्या करत आहे. भारतातील वाढत्या खासगी अवकाश उद्योगासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरू शकतो.
Read About : Bengaluru Smoking Ban – बंगळुरूत हॉटेल, पब, बारमध्ये धूम्रपानबंदीचा प्रस्ताव
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.