महिला ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेकडून गुन्ह्याचा उलगडा
परभणी Parbhani Auto Driver Murder : शहरातील नानलपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अपहरण प्रकरणाला खुनाचे वळण लागले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत या गुन्ह्याचा शोध लावून अनैतिक संबंधातून झालेल्या खुनाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी महिला व दोन विधीसंघर्षग्रस्त मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
२४ नोव्हेंबर २०२६ रोजी नानलपेठ पोलीस ठाण्यात तक्रारदार सुलताना बेगम शेख युसूफ यांनी तक्रार दिली की, त्यांचा मुलगा शेख युनूस शेख युसूफ हा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी घरातून ऑटो घेऊन जात असल्याचे सांगून गेला होता. मात्र, तो परत आला नाही. सदर तक्रारीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात अपहृत व्यक्ती बेपत्ता असल्याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ८१४/२०२६, कलम १४० (३) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान अपहृत व्यक्तीचा ऑटो हा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्गा परिसरात कालव्यामध्ये आढळून आला. त्यामुळे पथकाने परभणी शहरातून जाणाऱ्या कालवा परिसरात शोध घेतला असता नवा मोढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलसा शिवारात अपहृत इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
मृतदेह आढळल्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिक माहितीच्या आधारे पथकाने गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपी महिला व तिचे दोन विधीसंघर्षग्रस्त मुले यांना ताब्यात घेऊन नानलपेठ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आरोपी महिलेला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिचे व मयत इसमाचे मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. तसेच अनैतिक संबंधातून सदर खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले. हा खून नेमका कशापध्दतीने करण्यात आला? आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू
पालम : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका शिक्षक गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत पावल्याची घटना बुधवारी (दि.२५) सायंकाळी घडली. अज्ञात वाहनाचा शोध पोलीस घेत आहेत. बुधवारी (दि.२५) सायंकाळी ७:१५ वाजेच्या सुमारास शहरातील गंगाखेड रोडवर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत शिक्षक लिंबाजी विश्वनाथ तुडमे यांना गंभीर दुखापत झाली होती. तत्काळ त्यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र उपचार सुरू असतानाच रात्री २:३० वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. लिंबाजी तुडमे यांचे जन्मगाव चाटोरी असून ते तालुक्यातील जि.प.प्राथिमक शाळा संभाजीनगर येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली व मुलगा असा परिवार आहे. अपघातानंतर काही मिनिटांतच पालम पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिकेतून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. सदरील रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. परंतु अज्ञात वाहन सापडले नाही. शहरातील व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून सदरील वाहनांचा शोध घेणे सुरू आहे.
नवऱ्याच्या जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या
धाराशिव : शहरातील समर्थ नगर येथील एका ४१ वर्षीय विवाहितेने नवऱ्याकडून होत असलेल्या जाचास कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि.१९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विवाहिता राजश्री संतोष कुलकर्णी (वय ४१ वर्षे, रा. राउत गल्ली तुळजापूर) यांचा विवाह आरोपी संतोष सुर्यकांत कुलकर्णी (वय ५२ रा.समर्थनगर, धाराशिव) याच्याशी झाला होता. मात्र, लग्नाच्या वर्षभरानंतरच पती बाहेरख्यालीपणा करत असल्याचे पत्नी राजश्री यांच्या लक्षात आले. तसेच पतीने घेतलेले कर्ज पत्नी राजश्री यांना फेडण्यास भाग पाडले. यासाठी त्यांचा मानसिक, शाररीक छळ करून पत्नीच्या नावावर असलेला प्लॉट विकण्यासाठी फेब्रुवारी २०२६ पासून तगादा लावला होता. या सततच्या जाचास कंटाळून राजश्रभ कुलकर्णी या विवाहितेने दि.१९ नोव्हेंबर रोजी समर्थ नगर येथील राम मंदिराजवळील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी उदयकुमार नंदकुमार शामराज (रा.राउत गल्ली तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सालगड्याची गळफास घेऊन आत्महत्या
केज: केज येथे एका पशु पालकाकडे सालगडी म्हणून कामाला असलेल्या एका अठरा वर्षीय तरुणाने मालकाच्या घराजवळ असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सिद्धनाथ रवी सिरसट असे मृताचे नाव आहे. केज येथील अखिल खतीब या पशु पालकाकडे जनावरांची चारा-पाणी आणि देखभाल करण्यासाठी पंधरा दिवसापूर्वी सिद्धनाथ रवी शिरसाट कामाला होता. दि.२६ ऑक्टोबर रोजी त्याने मालकाच्या घरा शेजारी असलेल्या एका पत्राच्या शेडमध्ये जनावरांच्या म्होरकीने लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता.
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.