१६० कोटींचे सोने देणारे वर्धमान जैन कोण?
बंगळुरू : तिरुपती मंदिराला 121 किलो सोन्याचे दान : मंदिरात दानधर्म करणे पुण्याचे मानले जाते. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या श्रद्धेनुसार दान करत असतो. कोणी फळे-फुले, कपडे, रोख रक्कम, तर काही जण सोने-चांदी दान करतात. देशातील अनेक मोठ्या मंदिरांमध्ये भाविकांकडून किलोच्या हिशेबाने सोने आणि चांदी दान केली जाते. मात्र, दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुपती मंदिरात नुकत्याच झालेल्या एका दानाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. चेन्नई येथील व्यावसायिक वर्धमान जैन यांनी तिरुमला तिरुपती मंदिराला तब्बल १२१ किलो सोन्याचे दान केले आहे. या सोन्याची किंमत सुमारे १६० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
कोण आहेत वर्धमान जैन?
वर्धमान जैन हे चेन्नईचे रहिवासी असून व्यावसायिक आहेत. हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) आणि ऑटोमेशन या क्षेत्रांत त्यांनी काम केले आहे. ‘ॲक्सेस हेल्थकेअर’चे संस्थापक आणि माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. ही कंपनी आरोग्यसेवा क्षेत्राला तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवते.
अमेरिकेत झाले शिक्षण
वर्धमान जैन यांनी चेन्नईतील लोयोला महाविद्यालयातून स्टैटिक्स विषयाचे शिक्षण घेतले. त्यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. तेथे ऑस्टिन येथील टेक्सास विद्यापीठातून त्यांनी संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. अमेरिकेत काही वर्षे काम करताना त्यांनी हेल्थकेअर टेक्नॉलॉजी, मेडिकल कोडिंग, इमेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशन या क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळवले. व्यवसाय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यापूर्वी त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक वरिष्ठ पदांवर काम केले. त्यांनी ‘व्हिजन हेल्थसोर्स’ या कंपनीची सहस्थापना केली होती. तसेच डेल सर्व्हिसेसच्या बीपीओ विभागात व्यवस्थापकीय संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.
२०२५ मध्ये व्यवसायात मोठी उलाढाल
वर्धमान जैन यांच्या व्यावसायिक प्रवासात २०२५ हे वर्ष महत्त्वाचे ठरले. त्यांनी ‘ॲक्सेस हेल्थकेअर’मधील आपला ७० टक्के हिस्सा एका अमेरिकन कंपनीला विकल्याचे सांगितले जाते. हा व्यवहार सुमारे दोन अब्ज डॉलरमध्ये झाल्याची माहिती आहे. या व्यवहारामुळे कंपनी आणि जैन यांचे नाव व्यावसायिक क्षेत्रात चर्चेत आले. याशिवाय ते एशिया चेन्नई इंजिनिअरिंगसह अन्य काही व्यावसायिक उपक्रमांशीही संबंधित राहिले आहेत.
तिरुपती मंदिराला १२१ किलो सोन्याचे दान
सध्या वर्धमान जैन हे तिरुपती मंदिराला केलेल्या १२१ किलो सोन्याच्या दानामुळे चर्चेत आले आहेत. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पत्नी यांच्या उपस्थितीत त्यांनी हे दान केले. या सोन्यामध्ये भगवान वेंकटेश्वर यांच्यासाठी तयार करण्यात आलेले दागिने आणि मुकुट यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, वर्धमान जैन यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर दान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी मंदिराच्या देखभालीसाठी आणि विविध आवश्यक कामांसाठी अनेकदा आर्थिक मदत केली आहे.
Read About : Mandar Kivale Attack Case : मंदार किवळेवर जीवघेणा हल्ला; शुभमच्या हत्येचा बदला घेतल्याचा दावा!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.