विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर प्रशासनाला सूचना
मुंबई : Illegal Hoardings Pune Municipal Corporation – पुणे शहरातील अनधिकृत जाहिरात फलक आणि फ्लेक्सबाजीला आळा घालण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या ‘भाऊ फ्लेक्स काढा’ मोहिमेला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या मोहिमेचे कौतुक केले आहे. पुण्यात सध्या अतिक्रमणाविरोधात आणि विशेषत: अवैध होर्डिंगविरोधात कारवाई सुरू आहे. याबद्दल मी पुणे महापालिका प्रशासनाचे अतिशय मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच, उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.
वाढदिवस, राजकीय नियुक्त्या, स्वागत, सत्कार तसेच विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील चौक, रस्ते, पदपथ, झाडे आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत फ्लेक्स लावले जातात. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा पोहोचत असून, नागरिकांकडून वारंवार नाराजी व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका प्रशासनाने नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सची छायाचित्रे अपलोड करून ऑनलाइन तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नियमांचे पालन करणे गरजेचे
याचसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीट केले आहे. शहरातील पायाभूत सुविधांचा नागरिकांना योग्य वापर करता आला पाहिजे. वाहनांसाठी, पायी चालण्यासाठी जागा असल्या पाहिजेत. शेवटी नियम हे काही केवळ जीआर किंवा शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, ते पाळायचे सुद्धा असतात. याचा हेतू सर्वसामान्यांचे जीवन सुखकारक करणे हाच असतो, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
पुणेरी धाटणीतील संकल्पना
बेकायदेशीर होर्डिंग ही केवळ पुण्यात नाही, सर्वत्रच मोठी समस्या आहे. यावर सातत्याने आणि नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. त्यातही पुण्याने जी अभिनव आणि अस्सल ‘पुणेरी’ धाटणीतील संकल्पना स्वीकारली, त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे. पुणे प्रशासनाला मी सांगेन…. उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या त्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा, असेही त्यांनी नमूमद केले आहे.
नागपूर अधिवेशनात बेकायदा होर्डिंग्ज नको
आता येणार्या काळात नागपूर येथे विधिमंडळाचे अधिवेशन आहे, तेथेही आता बेकायदेशीर होर्डिंग्जचा धडाका सुरू होईल. नागपूर प्रशासनाने आतापासून जनजागृती करावी आणि शहर विद्रुप होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजे, बेकायदा होर्डिंग्जवर नाही, असे त्यांनी सुनावले आहे.
Read About : महाराष्ट्रातील तुरुंगांचे धक्कादायक वास्तव..! जेलच्या भिंतीमागे नेमके काय चालतं? Maharashtra Jail Reality
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.