Ad Advertisement Ad Advertisement

मुलगा, सुनेला घराबाहेर काढून फ्लॅट पुन्हा वृद्ध वडिलांकडे – Bombay High Court senior citizen flat case

मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

मुंबई : Bombay High Court senior citizen flat case वृद्ध वडिलांचा सांभाळ न करता फसवणुकीने राहता फ्लॅट स्वत:च्या नावावर करून घेणाऱ्या मुलाला आणि सुनेला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. न्यायालयाने आठ वर्षांपूर्वी केलेले फ्लॅटचे दानपत्र रद्द ठरवत, मुलगा आणि सुनेला आठ दिवसांत घर खाली करण्याचे आणि फ्लॅटचा ताबा पुन्हा ८८ वर्षीय वृद्ध वडिलांकडे सोपवण्याचे आदेश दिले आहेत.

मालाड (पश्चिम) येथील मार्वे रोडवरील ‘आदर्श क्लासिक सोसायटी’तील फ्लॅट क्रमांक ३०४ बाबत हा निकाल देण्यात आला आहे. न्यायमूर्ती आरती साठे यांनी ८८ वर्षीय देवचंद कोरशी देढिया यांच्या याचिकेवर हा निर्णय दिला. देवचंद यांनी स्वत:च्या कष्टाच्या पैशातून हा फ्लॅट खरेदी केला होता. पत्नीच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा शिबन आणि सून रिटा यांनी धाकदपटशा व फसवणूक करून या फ्लॅटचे दानपत्र स्वत:च्या नावावर करून घेतले.

वडिलांचा आयुष्यभर सांभाळ करण्याची अट या दानपत्रात होती. मात्र, प्रत्यक्षात मुलाने त्यांना आधी एका गलिच्छ चाळीत आणि नंतर वृद्धाश्रमात ढकलले. या अन्यायाविरोधात देवचंद यांनी ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिक कल्याण कायद्या’अंतर्गत दाद मागितली होती. मात्र, कनिष्ठ प्राधिकरणांनी मुलाला केवळ दरमहा १० हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचे आदेश दिले, फ्लॅटच्या ताब्याबाबत निर्णय दिला नाही. अखेर देवचंद यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

कायद्याच्या कलम २३ नुसार हायकोर्टाने हे दानपत्र रद्दबातल ठरवले. मुलगा शिबन आणि सून रिटा यांनी आठ दिवसांत फ्लॅट रिकामा करावा, अन्यथा पोलिसांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले जाईल, असा इशारा कोर्टाने दिला आहे.

दहा हजार रुपये निर्वाह भत्ता

दरमहा दहा हजार रुपये निर्वाह भत्ता देण्याचा आदेशही न्यायालयाने कायम ठेवला आहे. वृद्ध आई-वडिलांना वाऱ्यावर सोडणाऱ्या मुलांना वठणीवर आणणारा हा निकाल ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देणारा ठरला आहे.

Read About : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्सचेंजवर – CSR funding for healthcare

E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.