भारतीय औषध संशोधनासाठीही महत्त्वाचा ठरू शकणारा ऐतिहासिक शोध
लंडन : Benzene Ring Chemistry Breakthrough – कर्करोग आणि उच्च रक्तदाबासारख्या गंभीर आजारांवरील औषधांचे भवितव्य बदलण्याची क्षमता असलेला एक महत्त्वपूर्ण शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. औषधनिर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बेंझिन रिंगच्या सहाही स्थानांवर इच्छित रासायनिक घटक अचूकपणे जोडण्याचे नवे तंत्र संशोधकांनी विकसित केले आहे. जगप्रसिद्ध ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनामुळे गुंतागुंतीच्या औषधी रेणुंच्या निर्मितीसाठी नवी दिशा मिळाली आहे.
बेंझिन रिंगचे दशकांपासूनचे कोडे सुटणार
आधुनिक औषधनिर्मितीमध्ये ‘बेंझिन रिंग’ ही सहा कार्बन अणंूनी बनलेली षटकोनी रासायनिक रचना अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक लहान रेणंूच्या औषधांमध्ये तिचा वापर केला जातो. मात्र, या रिंगच्या सहाही स्थानांवर वेगवेगळे रासायनिक गट इच्छित क्रमाने जोडणे आजवर अत्यंत कठीण होते. त्यामुळे अशा पूर्णपणे प्रतिस्थापित बेंझिन संरचनांचा औषध संशोधनात मर्यादित वापर होत होता.
गिलॉम मोलर्ट, हँग-फेई तू, रॉबर्ट एस. पॅटन आणि मार्कोस जी. सुएरो यांच्यासह संशोधकांनी या आव्हानावर अभिनव उपाय शोधला आहे. त्यांनी ‘सायक्लोप्रोपेनियम कॅटायन्स’ आणि ‘ट्रायअल्काइलसिलिल ॲलीन्स’ यांच्या नियंत्रित अभिक्रियेतून ‘मॉड्युलर बेंझॅन्युलेशन’ तंत्र विकसित केले. या पद्धतीत बेंझिन रिंग तयार होण्यापूर्वीच तिच्या सहाही स्थानांवर कोणते रासायनिक गट जोडले जातील, हे निश्चित करता येते.
‘नॉन-क्लासिकल’ रसायनशास्त्राची कमाल
या अभिक्रियेतील वैशिष्ट्यपूर्ण ‘नॉन-क्लासिकल कार्बोकॅटायन’ मध्यस्थामुळे रासायनिक घटकांची अचूक मांडणी शक्य होते. संगणकीय डीएफटी विश्लेषणातून या प्रक्रियेतील चार केंद्र, चार-इलेक्ट्रॉन बंधांची भूमिका स्पष्ट झाली. तसेच ‘मेमरी ऑफ कायरॅलिटी’मुळे रेणंूची त्रिमितीय रचनाही जतन करता येते.
कर्करोग आणि रक्तदाबावरील औषधांना नवी दिशा
या तंत्राची क्षमता सिद्ध करण्यासाठी संशोधकांनी कर्करोगावरील ‘सोनिडेगिब’ आणि उच्च रक्तदाबावरील ‘टेल्मिसार्टन’ यांच्या यापूर्वी सहज उपलब्ध नसलेल्या नवीन संरचनात्मक आवृत्त्या तयार केल्या. ट्रायफेनिलीनसारख्या जटिल संयुगांची निर्मितीही केली. हा शोध म्हणजे औषधनिर्मितीतील नवे दालन खुले करणारे पाऊल आहे. या संयुगांची सुरक्षितता आणि उपचारक्षमता सिद्ध होण्यासाठी पुढील संशोधन आवश्यक असले, तरी भविष्यात अधिक अचूक आणि लक्ष्यित औषधे विकसित करण्यासाठी या तंत्रज्ञानाने आशेचा नवा किरण दाखवला आहे.
Read About: प्रकाशकोड्यात वेगवान इंटरनेटचे गुपित – Barium Titanate
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.