बहिणीला खास छायाचित्रांसह आलियाची प्रेमळ पोस्ट; आई सोनी राजदान यांनीही जुन्या आठवणींना दिला उजाळा
मुंबई : Shaheen Bhatt Birthday अभिनेत्री आलिया भट्टने आपली बहीण शहीन भट्ट हिला वाढदिवसानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत. आलियाने बहिणीसोबतची काही सुंदर छायाचित्रे समाजमाध्यमांवर शेअर करत तिच्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. आई सोनी राजदान यांनीही मुलगी शहीनसाठी भावनिक संदेश लिहित तिच्या स्वभावाचे आणि गुणांचे कौतुक केले.
आलियाने शहीनसोबतची काही छायाचित्रे इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहेत. यातील एका छायाचित्रात आलिया बहिणीच्या गालावर प्रेमाने किस करताना दिसते. या पोस्टसोबत तिने, ‘तूच प्रेम आहेस आणि प्रेम म्हणजे तूच! वाढदिवसाच्या शुभेच्छा, माझ्या खास व्यक्ती,’ अशा आशयाचा संदेश लिहिला.
आई सोनी राजदान यांची भावनिक पोस्ट
सोनी राजदान यांनीही मुलगी शहीनसाठी खास संदेश लिहिला. शहीन दिवसेंदिवस अधिक सुंदर होत असल्याचे सांगतानाच, तिच्यावर प्रेम करण्यामागचे कारण केवळ तिचे सौंदर्य नसून तिचा प्रेमळ स्वभाव, दयाळूपणा आणि बुद्धिमत्ता असल्याचे त्यांनी म्हटले.
शहीन प्राण्यांवर प्रेम करते, कठीण प्रसंगांत मार्ग काढते आणि आपल्या आयुष्यात खंबीर आधार बनून उभी राहते, अशा शब्दांत त्यांनी मुलीचे कौतुक केले. शहीनशी संपर्क साधणे किंवा तिला एखाद्या गोष्टीसाठी तयार करणे कधीकधी कठीण जाते, असे मिश्किलपणे नमूद करत त्यांनी तिच्यासोबतची काही छायाचित्रेही शेअर केली. यात आलिया आणि शहीन यांच्या बालपणीच्या दुर्मीळ छायाचित्रांचाही समावेश आहे.
बहिणींच्या नात्याची खास झलक
आलियाने शहीनसोबतचे प्रेमळ क्षण छायाचित्रांतून शेअर केले, तर सोनी राजदान यांनी मुलींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. या पोस्टमधून भट्ट कुटुंबातील जिव्हाळ्याचे नाते पुन्हा एकदा पाहायला मिळाले.
शहीन निर्मिती क्षेत्रातही सक्रिय
कामाच्या आघाडीवर शहीनने अलीकडेच आलियासोबत ‘डोन्ट बी शाय’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या ‘इटर्नल सनशाइन प्रॉडक्शन्स’ या निर्मिती संस्थेने चॉकबोर्ड एंटरटेनमेंटच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली.
दरम्यान, शहीनने काही काळापूर्वी प्रियकर ईशान मेहरासोबत साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती. साखरपुड्याची अंगठी दाखवत तिने समाजमाध्यमांवर ही आनंदाची बातमी शेअर केली होती. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिने ईशानसोबतचे नाते इन्स्टाग्रामवर अधिकृतपणे जाहीर केले होते.
Read About : फवाद-माहिराच्या सीरिजला भारतात विरोध! – Jo Bache Hain Samet Lo Controversy
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.