धाराशिवच्या महिलांचे सलग दोन विजय : बादफेरीत प्रवेश
अहिल्यानगर : 62nd State Kho Kho Championship राज्य अजिंक्यपदाच्या रणांगणात पहिल्याच दिवशी प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारत धाराशिव, पुणे आणि मुंबई, उपनगरच्या संघांनी विजयी सलामी दिली. धाराशिवच्या महिला संघाने सलग दोन विजयांची नोंद करत बादफेरीतील प्रवेश निश्चित केला, तर पुणे, मुंबई व उपनगरच्या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवले. रत्नागिरीच्या महिला संघाने नांदेडचा ६४-६ असा धुव्वा उडवत ५८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने आणि अहिल्यानगर जिल्हा खो-खो असोसिएशनच्या सहकार्याने एकलव्य क्रीडा मंडळाच्या वतीने स्व.अरुणकाका जगताप क्रीडा नगरी, न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे ६२ वी पुरुष-महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा सुरू झाली. महिला गटात धाराशिवने सलामीच्या सामन्यात पालघरवर ३४-१० असा एक डाव राखून २४ गुणांनी विजय मिळवला. मैथिली पवारने (१.१० व नाबाद ३ मि. संरक्षण आणि २ गुण) अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या सामन्यात धाराशिवने परभणीवर ४३-८ असा एक डाव राखून दणदणीत विजय मिळवला. पुरुष गटातही धाराशिवने छत्रपती संभाजीनगरवर ४३-१६ अशी २७ गुणांनी मात केली.
मुंबई उपनगरचे दोन्ही संघ विजयी
मुंबई उपनगरच्या महिला संघाने हिंगोलीवर ४४-१२ असा एक डाव राखून विजय मिळवला. आर्या भाटकर (२ मि. संरक्षण व १० गुण), कृतिका वाघमारे (४.२० मि. संरक्षण) आणि देविका अहिरे (३.५० मि. संरक्षण) यांनी संघाच्या विजयाची घडी बसवली. पुरुष गटात मुंबई उपनगरने नांदेडला ३५-१४ असे पराभूत केले. मुंबई उपनगरकडून रामचंद्र झोरे (३.४० मि. संरक्षण व ४ गुण) आणि अनिकेत चेंदवनकर (२.१० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
मुंबईची पालघरवर ५ गुणांनी मात; सामना अखेरपर्यंत रंगला!
पुरुष गटातील तुल्यबळ लढतीत मुंबईने पालघरवर ४१-३६ अशी ५ गुणांनी मात करत विजय मिळवला. मुंबईच्या सम्यक जाधवने धारदार आक्रमण करत १२ गुण मिळवले, तर वेदांत देसाईने (१.२० मि. संरक्षण व ८ गुण) अष्टपैलू योगदान दिले. पालघरकडून मंदार बंडावे (१.२० मि., १.१० मि. संरक्षण व ८ गुण) आणि सोहम महाले (८ गुण) यांनी जोरदार झुंज दिली.
Read About : Maharashtra Girls Gold Medal – महाराष्ट्राच्या मुलींचा ‘सुवर्ण दबदबा’ कायम!
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.