‘N-STOP’ मोहिमेंतर्गत शिवाजीनगर पोलिसांची कारवाई; मोहम्मद ईसाकच्या चौकशीतून दुसऱ्या संशयिताचे नाव समोर
नांदेड : Nanded Ganja Seizure – शहरातील नवी आबादी परिसरातील दातार चौक भाजीमंडईत सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या प्रकारावर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १ किलो २४६ ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत २५ हजार रुपये आहे. गांजा विक्रीसाठी बाळगल्याप्रकरणी मोहम्मद ईसाक पिता मोहम्मद युसुफ याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने गांजा शंकर उर्फ भोला वगरे याच्याकडून आणल्याचे सांगितल्याने दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणाईला आणि समाजाला अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या संकल्पनेतून ‘N-STOP : नशेला STOP, भविष्याला START!’ ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.
२७ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत दातार चौक भाजीमंडई परिसरात एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी बाळगून असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांची परवानगी घेण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
त्यानंतर राजपत्रित अधिकारी आणि शासकीय पंचांच्या उपस्थितीत सायंकाळी दातार चौकातील भाजीपाल्याच्या गाड्यांशेजारी सापळा रचण्यात आला. पोलिसांनी संशयित मोहम्मद ईसाक पिता मोहम्मद युसुफ (वय ४५, व्यवसाय मजुरी, रा. भाजीमंडई, नवी आबादी, नांदेड) याच्या हातातील वायरच्या पिशवीची झडती घेतली. त्यामध्ये दोन कॅरीबॅगमध्ये सुका गांजा आढळून आला.
पोलिसांनी पंचांसमक्ष १ किलो २४६ ग्रॅम गांजा, अंदाजे किंमत २५ हजार रुपये, जप्त केला. विशेष म्हणजे, चौकशीदरम्यान मोहम्मद ईसाक याने हा गांजा विक्रीसाठी शंकर उर्फ भोला वगरे (रा. जयभीमनगर, नांदेड) याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील गांजाच्या पुरवठ्याच्या साखळीबाबतही तपासाची दिशा स्पष्ट झाली आहे. या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरनं. ५२५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २०(ब)(ii)(ब) प्रमाणे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इरफान सय्यद करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव, श्रीमती अर्चना पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश पुरी, पोलीस उपनिरीक्षक इरफान सय्यद, पोलीस अंमलदार संदीप राठोड, आकोसकर, कालो, काकडे, जमीर आणि जोगपेटे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
दरम्यान, शहरात कुठेही अमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा सेवन होत असल्याची माहिती नागरिकांना मिळाल्यास त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्याशी अथवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी आशिष सिताराम बोराटे यांनी केले आहे.
Read About : थकीत वेतनासाठी १.८० लाखांची लाच; कला शिक्षकास रंगेहात पकडले! – Art Teacher Bribe Case
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.