कवडशी वाघ शिकार प्रकरणात धक्कादायक खुलासे : अंधश्रद्धेपोटी नखे, सुळे, दात आणि हाडांची साठवणूक
चिमूर (चंद्रपूर) : Chandrapur tiger poaching case वाघाची शिकार केल्यानंतर त्याच्या अवयवांची नातेवाईकांमध्ये वाटणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कवडशी शिवारातील वाघ शिकार प्रकरणाच्या तपासातून समोर आला आहे. वाघाची नखे ताईत म्हणून वापरल्यास भूतबाधा होत नाही, तर त्याच्या हाडांपासून औषध तयार होते, अशा अंधश्रद्धेतून आरोपींनी वाघाचे अवशेष स्वत:कडे साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले आहे. वनविभागाने सात आरोपींना अटक केली असून त्यांची १० डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कवडशी शिवारात वाघाचा मृत्यू विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाल्यानंतर त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आला होता. मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापुरतेच हे प्रकरण मर्यादित नसून वाघाच्या अवयवांची साठवणूक आणि वाटणी झाल्याचे तपासात उघड झाले. वनविभागाने आरोपींच्या घरांची झडती घेतली असता वाघाचे विविध अवशेष हस्तगत करण्यात आले. मुख्य आरोपी फकिरा रणदिवे याच्याकडून वाघाची सहा नखे, दोन सुळे, दात आणि एक हाड जप्त करण्यात आले. हे अवशेष विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवले होते का, याचाही तपास केला जात आहे. या प्रकरणातील सात आरोपींपैकी पाच जण एकमेकांचे नातेवाईक असल्याचे तपासात समोर आले आहे.
नामदेव ननावरे आणि अरविंद ननावरे हे पिता-पुत्र आहेत, तर अन्य आरोपी मुख्य आरोपी फकिरा रणदिवे याचे नातेवाईक असल्याचे सांगण्यात येते. वाघाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर फकिरा रणदिवे, चंदू रणदिवे, भोजराज खाटे, नामदेव ननावरे आणि अरविंद ननावरे यांनी वाघाचे अवशेष पुरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र अवशेषांची वाटणी नेमकी कोणामध्ये आणि कशा प्रकारे झाली, याचा सविस्तर तपास सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय तस्करीचे धागेदोरे!
या प्रकरणात केवळ सात आरोपींपुरतीच साखळी मर्यादित आहे की यामागे मोठे रॅकेट कार्यरत आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वाघाच्या अवयवांच्या तस्करीचे धागेदोरे विदेशापर्यंत पोहोचले आहेत का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास प्रादेशिक वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
Read About : मतदारसंघ फेररचनेची लढाई आता संसदेत – Delimitation Bill 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.