रिझर्व्ह बँकेचे नवे नियम लागू
नवी दिल्ली : RBI ATM guidelines 2026 भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएम आणि पॉइंट-ऑफ-सेल टर्मिनलद्वारे रोख रक्कम काढण्याबाबतचे नियम एकत्रित करून नवीन दिशादर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. २००८ ते २०२२ दरम्यानचे १७ जुने परिपत्रक मागे घेण्यात आले असून नवीन नियम तत्काळ लागू झाले आहेत.
नवीन नियमांनुसार, बँकांना अशी प्रणाली तयार करावी लागेल ज्यामुळे ग्राहकांना दरमहा वापरलेल्या मोफत एटीएम व्यवहारांची माहिती मिळेल आणि मोफत मर्यादा संपल्यानंतर आकारल्या जाणाऱ्या शुल्काची स्पष्ट सूचना दिली जाईल. एटीएम मेट्रो भागात आहे की नॉन-मेट्रो भागात, हे स्पष्टपणे नमूद करणे बँकांसाठी बंधनकारक आहे. तसेच, कमाल रोख मर्यादा, मोफत व्यवहार आणि लागू शुल्क ही माहिती इंग्रजी, हिंदी आणि स्थानिक भाषेत प्रदर्शित करावी लागेल.
मोफत व्यवहारांच्या मर्यादेत कोणताही बदल केलेला नाही. बचत खात्याच्या ग्राहकांना स्वत:च्या बँकेच्या एटीएमवर दरमहा ५ मोफत व्यवहार (आर्थिक व बिगर-आर्थिक) मिळतील. इतर बँकांच्या एटीएमवर मेट्रो शहरात ३ आणि नॉन-मेट्रो भागात ५ मोफत व्यवहार मिळतील. मर्यादा संपल्यानंतर प्रति व्यवहार जास्तीत जास्त २३ रुपये शुल्क (कर अतिरिक्त) आकारता येईल. तांत्रिक बिघाड किंवा एटीएममध्ये रोख नसल्यामुळे अयशस्वी झालेल्या व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारता येणार नाही.
जास्तीत जास्त १ टक्के शुल्क
डेबिट कार्ड, पूर्ण केवायसी असलेले पीपीआय आणि यूपीआयद्वारे पीओएसवर प्रति व्यवहार कमाल २,००० रुपये आणि मासिक कमाल १०,००० रुपये रोख काढता येईल. यावरील शुल्क जास्तीत जास्त १ टक्के असेल. खरेदी असो वा नसो, व्यापाऱ्यांकडे ही सुविधा उपलब्ध असावी आणि खरेदीसह रोख काढल्यास पावतीवर दोन्ही रकमा वेगवेगळ्या नमूद करणे आवश्यक आहे.
Read About : गॅस, SBI कार्डसह 5 मोठे बदल – December 1 Financial Changes 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.