Ad Advertisement Ad Advertisement

AfD Germany Election : जर्मनीत देशीवादी पक्षाचा विजय

AfD Germany Election : जर्मनीत सॅक्सनी अन्हाल्ट या राज्यात विधानसभा निवडणूक झाली. ८३ जागांच्या या विधानसभेत एएफडी (पर्यायी जर्मनी) या पक्षाला ३९ जागा मिळाल्या. सरकार करण्यासाठी ३ जागा कमी पडतात. सत्ताधारी सीडीयू (१५ जागा), डावा पक्ष (८ जागा) यांना बरोबर घेतलं तरच एएफडी सरकार स्थापन करू शकतो किंवा त्या पक्षातली ३ माणसं फोडून. दोन्ही पक्ष एएफडीच्या विरुद्ध विचारधारेचे आहेत. या पक्षांना विरोध करतच एएफडी वाढला आहे.

AfD Germany Election : गेल्या जर्मन लोकसभेच्या निवडणुकीत एएफडी या पक्षाला ३५ टक्के मतं मिळाली होती.

खरं म्हणजे सॅक्सनी अन्हाल्ट हे अगदीच पिटुकलं राज्य आणि जर्मनीच्या लोकसंख्येत सॅक्सनी अन्हाल्टची लोकसंख्या फक्त २.५ टक्के. म्हणजे असं म्हणा ना, की भारत आणि महाराष्ट्रातला अकोला जिल्हा. अकोला जिल्हा परिषदेच्या निकालाची दखल कोणी घेईल का? पण, सॅक्सनी अन्हाल्ट निकालावर न्यूयॉर्क टाईम्स, वॉशिंग्टन पोस्ट, गार्डियन इत्यादी पेपरांनी लांबलांब लेख आणि विश्लेषण प्रसिद्ध केलंय.
कारण जर्मनीतल्या बदलत्या राजकीय चित्रात हा निकाल महत्वाचा आहे. उद्या हा पक्ष जर्मनीवर राज्य करण्याची शक्यता दिसतेय.

एएफडी हा स्वत:ला पर्यायी जर्मन पक्ष म्हणवतो. म्हणजे जर्मनीतल्या राजकीय स्थितीला पर्यायी पक्ष आहोत असं एएफडीचं म्हणणं आहे.
एएफडी हा उजवा पक्ष आहे. तो देशीवादी पक्ष आहे. जर्मनीत नवा राष्ट्रवाद हा पक्ष सांगू पाहतोय. ज्यू हत्याकांडाचा काळ हा जर्मनीच्या हजार वर्षांच्या इतिहासातला तिळा एवढा लहानसा बिंदू आहे, त्याकडं दुर्लक्ष करा. जर्मनी हा एक दीर्घकाळ महान देश होता आणि तो पुन्हा महान करायचा आहे असं या पक्षाचे लोक म्हणतात. हा पक्ष डावा नाही, उजवा नाही, मध्यममार्गी नाही, देशीवादी आहे.

जर्मनी पुन्हा महान करायचा असेल तर बाहेरून आलेल्या लोकांना बाहेर काढा, बाहेरून येणाऱ्या लोकांचा ओघ नियंत्रित करायला हवा. युरोपियन युनियनची दादागिरी संपायला हवी, जर्मनीला स्वातंत्र्य असायला हवं, वेळ पडल्यास जर्मनीनं युरोपियन युनियनमधून बाहेर पडायला हवं. पर्यायी उर्जा प्रकरण बंद करायला हवं, पर्यावरण प्रदूषण थांबवण्यासाठी केलेले कायदे रद्द करायला हवेत. जर्मनीची अर्थराज्यव्यवस्था मुक्त बाजारवादी असावी, समाजहितवादी असू नये, रशियाशी सख्य असावं, असं या पक्षाचं म्हणणं आहे.

आजच्या युरोप-ब्रिटनमध्ये उदारमतवादी लोकशाहीला मान्यता आहे. एएफडीला ते धोरण मान्य नाही. ट्रम्पच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाशी एएफडीच्या धोरणाचं साम्य आहे, म्हणूनच युरोप हादरलं आहे. अमेरिकेत ट्रम्पवाद लोकप्रिय होतोय अशी भीती युरोपला आणि अमेरिकेतल्या ट्रम्प विरोधकांना वाटतेय.

अडचण अशी की हा देशीवाद जर्मनीचे प्रश्न कसे सोडवणार ते स्पष्ट होत नाही.

एएफडीचा राग बाहेरून आलेल्या लोकांवर आहे. २०१५ नंतर पश्चिम आशिया, अरब विभागात निर्माण झालेल्या राजकीय संकटामुळं तिथली माणसं स्थलांतरीत झाली. २०१५ ते २०२५ या काळात स्थलांतरीतांचा मोठ्ठा लोंढा, ६१ लाख जर्मनीत आला. अँजेला मर्केलनी त्यांचं स्वागत केलं; एक तर मानवतेच्या भावनेतून. पण, त्या बरोबरच जर्मनीत तरुणांची आणि अकुशल माणसांची आवश्यकता होती. जर्मनी म्हातारा होत चाललाय, तिथं काम करायला, कष्टाची कामं करायला माणसं नाहीयेत.

परंतु, जर्मनीतल्या फार लोकांना बाहेरून आलेल्या लोकांचा धर्म, रंग, संस्कृती सलते आहे. त्यांना अरब, मुसलमान आणि गरीब लोक त्यांच्या देशात नको आहेत. ‘ते असंस्कृत आहेत.’ ती माणसं बाहेर गेली की जर्मनीचा विकास होणार? ती माणसं बाहेर गेली की जर्मनीत महाग होत चाललेली वीज स्वस्त होणार? ती माणसं बाहेर गेली की जर्मन कारचा दर्जा सुधारून त्यांच्या किमती कमी होऊन त्या जगाच्या बाजारात विकल्या जाणार?

एएफडीला युरोपियन युनियनच्या बाहेर पडायचं आहे, कारण युरोपियन युनियनची धोरणं विकासाच्या आड येतात असं त्यांना वाटतं. जर्मन अर्थव्यवस्था संकटात आहे. अमेरिकेनं दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनीला संरक्षण छत्री दिली होती, संरक्षणाची जबाबदारी घेतली होती. २०२४ साली जर्मनी संरक्षणावर ९८ अब्ज डॉलर्स खर्च करत होता. ट्रम्पनी जर्मनीतून काढता पाय घेतल्यावर जर्मनीला पुढल्या चार वर्षांत २०० अब्ज डॉलर संरक्षणावर खर्च करावे लागतील. पैसे कुठून आणि कसे आणणार?

रशिया हे मोठ्ठं संकट आहे. पुतीन विस्तारवादी आहेत. आज युक्रेन, उद्या जर्मनी. जर्मनीनं युक्रेनला पाठिंबा दिलाय. युक्रेन युद्धावर जर्मनी खूप खर्च करतंय, त्यामुळं पुतीन खसकले आहेत. जर्मनी रशियाच्या तेलावर जगतो. रशियातून येणाऱ्या तेलाच्या आणि गॅसच्या पाईप लाईनी ही जर्मनीची रक्तवाहिनी आहे. युक्रेन युद्धामुळं आणि रशियाशी पंगा घेतल्यानं तेल महागलं आहे. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेवर सर्वांत मोठ्ठा बोजा तेलाच्या किमतींचा आहे. उद्या रशियानं तेल देणं बंद केलं तर जर्मनी गोठून मरेल अशी स्थिती आहे.

गोंधळ असा आहे की, जर्मनीतले जुने आणि जाणते सीडीयू आणि एसपीडी या पक्षांना सुधरत नाहीये. ट्रम्प आणि पुतीन मिळून साऱ्या जगाची चटणी करत आहेत, त्यातून जर्मन पक्षाना वाट सापडत नाहीये. अर्थव्यवस्था संकटात आहे. जनता त्रस्त आणि गोंधळलेली आहे.

या पोकळीत एएफडी घुसलाय. बाहेरची माणसं हे संकट आहे, युरोपियन युनियन हे संकट आहे असं हा पक्ष लोकांना सांगतोय. जवळ जवळ हाच उद्योग ब्रिटननं एके काळी आरंभला, युरोपियन युनियनमधून बाहेर पडले, संकटं काही संपली नाहीत. ट्रम्पही अमेरिकेत बाहेरून आलेल्या असंस्कृत लोकांना; जगात पसरलेल्या इराण, पॅलेस्टाईन, युरोप इत्यादी ‘खालच्या दर्जाच्या’ लोकांना लक्ष्य करत आहेत.
जर्मनीचं काही खरं नाही, अमेरिकेचं काही खरं नाही…

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.