हार्वर्ड युनिव्हर्सिटीचे क्रांतीकारी संशोधन
वॉशिंग्टन : Aging heart rejuvenation – एखाद्या अवयवाचे ‘वय’ हे कायमस्वरूपी ठराविक नसते, तर तो अवयव ज्या शरीरात राहतो तिथल्या वातावरणावर अवलंबून असते, असा महत्वपूर्ण शोध हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी लावला आहे.
या संशोधकांनी तरुण आणि वृद्ध उंदरांमध्ये हृदयांचे प्रत्यारोपण करून अभ्यास केला. सोबतच, मानवी हृदय प्रत्यारोपणाच्या जुन्या वैद्यकीय नोंदींचाही सखोल अभ्यास केला. या अभ्यासात त्यांच्या लक्षात आले की, जेव्हा एखाद्या वृद्ध व्यक्तीचे किंवा उंदराचे हृदय तरुण शरीरात बसवले गेले, तेव्हा त्या हृदयातील पेशी आणि जनुके पुन्हा तरुण झाल्यासारखी लक्षणे दाखवू लागली. म्हणजेच, वृद्ध हृदयाचे जैविक वय कमी झाले! याउलट, जेव्हा तरुण हृदय वृद्ध शरीरात बसवले गेले, तेव्हा त्या हृदयाच्या पेशी वेगाने म्हातारपणाकडे झुकू लागल्या.
या शोधाचा काय फायदा होणार?
सध्याच्या वैद्यकीय नियमांनुसार, हृदय प्रत्यारोपणासाठी ४५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या दात्यांचेच हृदय प्राधान्याने निवडले जाते; कारण जुने हृदय नवीन शरीरात टिकणार नाही अशी भीती असते. परंतु, या संशोधनाने हे दाखवून दिले आहे की तरुण शरीरात गेल्यानंतर वृद्ध अवयवसुद्धा स्वत:च्या पेशींची रचना बदलून नव्या शरीराच्या वयाशी जुळवून घेतात. अवयवांची शारीरिक झीज पूर्णपणे भरून निघत नसली, तरी पेशींच्या पातळीवर हे अवयव पुन्हा ‘तरुण’ होतात. त्यामुळे अवयवदानासाठी असलेल्या वयाच्या कडक अटी शिथिल होऊ शकतात आणि गरजूंना अवयव मिळणे अधिक सोपे होऊ शकते.
Read about : Why Doctors Wear Green and Blue : डॉक्टर का घालतात हिरवे आणि निळे कपडे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.