Ad Advertisement Ad Advertisement

Textile Bricks From old Clothes : जुन्या कपड्यांपासून बनवली जातेय वीट

घराचे सौंदर्य वाढवणारी पर्यावरणपूरक संकल्पना

नवी दिल्ली : textile bricks from old clothes : घरातील जुने, फाटलेले किंवा निरुपयोगी कपडे आपण सामान्यत: फेकून देतो किंवा रद्दीवाल्याला खूप कमी किमतीत विकून टाकतो. परंतु, आता याच टाकाऊ कपड्यांपासून अतिशय देखण्या आणि मजबूत विटा तसेच टाइल्स तयार करण्याचे एक अनोखे तंत्रज्ञान समोर आले आहे. सध्या परदेशात या टेक्सटाइल ब्रिक्सचा ट्रेण्ड मोठ्या प्रमाणावर वाढत असून घराच्या अंतर्गत सजावटीसाठी (इंटेरियर डेकोरेशन) या विटांना मोठी पसंती मिळत आहे. या विटांसाठी निरुपयोगी कपडे गोळा केले जातात. एक वीट तयार करण्यासाठी साधारण २ ते ३ टी-शर्ट किंवा तेवढ्याच वजनाचे कपडे लागतात.

असा झाला या तंत्रज्ञानाचा शोध

जुने कपडे कशा प्रकारे रिसायकल करून पर्यावरणाचा समतोल राखता येईल, या विचारातून फ्रान्समधील एक प्रसिद्ध आर्किटेक्ट क्लारिस मर्लेट यांनी या अभिनव तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यांनी आपल्या एका स्टार्टअपच्या माध्यमातून रद्दी कपड्यांपासून विटा बनवण्याचे काम सुरू केले आणि अल्पावधीतच त्यांच्या या इको-फ्रेंडली कल्पनेची जगभरात चर्चा सुरू झाली.

कापडी वीट तयार करण्याची अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
  • कपड्यांचे संकलन आणि विभागणी : सर्वप्रथम विविध ठिकाणांहून जुने आणि निरुपयोगी कपडे गोळा केले जातात. यामध्ये सुती (कॉटन), सिंथेटिक अशा सर्व प्रकारच्या फॅब्रिकचा वापर केला जातो. एक वीट तयार करण्यासाठी साधारण २ ते ३ टी-शर्ट ची आवश्यकता भासते.
  • कपड्यांचे बारीक तुकडे : गोळा केलेल्या कपड्यांची छंटानी केल्यानंतर, अत्याधुनिक मशिनच्या साहाय्याने त्यांचे अतिशय बारीक तुकडे केले जातात. हे तुकडे इतके व्यवस्थित असतात की कपड्यांमधील प्रत्येक रेशा वेगळा होतो.
  • इको-फ्रेंडली डिंकाचा वापर : या कापडी रेष्यांमध्ये एक विशेष प्रकारचे बायो-बेस्ड म्हणजेच वनस्पतीपासून तयार केलेले नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक डिंक मिसळले जाते. हे डिंक विटेला कडकपणा देण्याचे काम करते.
  • हायड्रोलिक कॉम्प्रेषण : कापडी रेषे आणि डिंकाचे हे मिश्रण एका विशिष्ट साच्यात भरले जाते. त्यानंतर हायड्रोलिक मशीनच्या साहाय्याने त्यावर प्रचंड दाब दिला जातो, ज्यामुळे त्याला विटेचा किंवा टाईल्सचा घनदाट आकार मिळतो.
  • नैसर्गिक पद्धतीने सुकवणे : साच्यातून बाहेर काढल्यानंतर या विटा काही आठवड्यांसाठी सुकण्यासाठी खुल्या हवेत ठेवल्या जातात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पारंपरिक मातीच्या विटांप्रमाणे या विटांना भाजण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या कोळशाच्या भट्टीची किंवा आगीची गरज भासत नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया प्रदूषणमुक्त आहे.
गृहसजावटीत उपयोग
  • १. रंग देण्याची गरज नाही : कपड्यांचे स्वत:चे जे विविध रंग असतात, तेच रंग या विटांना नैसर्गिकरीत्या मिळतात. त्यामुळे विटांवर वेगळी रासायनिक रंगरंगोटी किंवा डाय करण्याची गरज पडत नाही. वेगवेगळ्या रंगांच्या रेष्यांमुळे या विटांना एक अतिशय आकर्षक आणि युनिक टेक्सचर मिळते.
  • २. घराचे इंटेरियर आणि फर्निचर : या विटा वजनाने हलक्या असल्या तरी मजबूत असतात. यांचा वापर इमारतींच्या मुख्य किंवा वजन पेलणाऱ्या बाहेरील भिंतींसाठी करता येत नाही. मात्र, घराच्या आत खोल्यांचे विभाजन करण्यासाठी या विटा सर्वोत्तम ठरतात. याशिवाय या विटांचा वापर करून स्टायलिश टेबल, स्टूल, शेल्फ आणि इतर शोभिवंत फर्निचर देखील बनवले जाते.
  • ३. साउंड आणि टेम्परेचर प्रूफ : कापडाच्या नैसर्गिक गुणधर्मांमुळे या विटा खोलीतील आवाज गुंजण्यापासून रोखतात तसेच, त्या खोलीतील तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहू शकते.
भारतीय बाजारपेठेतील उपलब्धता

हे एक अत्यंत कल्पक आणि पर्यावरणपूरक उत्पादन असले, तरी सध्या ते भारतातील स्थानिक बाजारपेठांमध्ये पारंपरिक विटांसारखे सहज उपलब्ध नाही. परदेशातून किंवा विशिष्ट कस्टमाइज्ड डिझायनिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या अधिकृत वेबसाईटवर ऑर्डर देऊन या विशेष विटा मागवाव्या लागतात. त्यामुळे यांची किंमत सामान्य विटांच्या तुलनेत बरीच जास्त असते.

Read About : Pehla Pyaar Doosri Baar trailer : ‘पहला प्यार दूसरी बार’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.