Ad Advertisement Ad Advertisement

AI Medication Dose Check – एआयने सुचविलेल्या चुकीच्या डोसपासून रुग्णांचे रक्षण करते ‘डोसचेक’

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चुकीचा फटका बसू नये म्हणून उपाय

वॉशिंग्टन : AI Medication Dose Check – डॉक्टर आता रुग्णांवर उपचार करताना एआयची मदत मोठ्या प्रमाणावर घेऊ लागले आहेत. पण एआय कधी कधी चुकीची माहिती आत्मविश्वासाने देते. औषधाच्या डोसबाबत अशी चूक झाली तर रुग्णाचा जीवही धोक्यात येऊ शकतो. हा धोका ओळखून अमेरिकेतील डॉक्सिमिटी कंपनीने डोसचेक नावाची नवी सुरक्षा-सुविधा सुरू केली आहे.
डॉक्सिमिटी हा डॉक्टरांसाठीचा मोठा डिजिटल मंच आहे. अमेरिकेतील ८५ टक्क्यांहून अधिक डॉक्टर आणि १६५ हून अधिक आरोग्य-संस्था त्याचा वापर करतात. त्यांच्या ‘डॉक्सिमिटी आस्क’ या एआय साधनाला डॉक्टर उपचारांबाबत प्रश्न विचारतात. डोसचेक याच साधनात जोडण्यात आले आहे.

2.3 टक्के उत्तरे चुकीची

ही सुविधा का गरजेची होती, हे कंपनीच्या चाचणीतून दिसते. कंपनीने नऊ प्रचलित एआय मॉडेल्सना डॉक्टरांच्या प्रत्यक्ष प्रश्नांवर आधारित ८,००० हून अधिक डोसविषयक प्रश्न विचारले. त्यात किमान २.३ टक्के उत्तरे चुकीची निघाली. त्याहून गंभीर बाब म्हणजे सापडलेल्या चुकांपैकी ४३.८ टक्के चुका गंभीर किंवा जीवघेण्या ठरू शकल्या असत्या.

तपासणीची पद्धत वेगळी

डोसचेकची पद्धत वेगळी आहे. एका एआयने दिलेले उत्तर दुसऱ्या एआयकडून तपासून घेतले जात नाही. त्याऐवजी एआयने सुचवलेला प्रत्येक डोस ठरावीक नियमांच्या आधारे तपासला जातो. तो अमेरिकेच्या एफडीएने मंजूर केलेल्या औषध-लेबलशी आणि वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांशी जुळवून पाहिला जातो. त्यामुळे एकाच प्रश्नाला प्रत्येक वेळी एकच, खात्रीशीर उत्तर मिळते. कंपनीच्या दाव्यानुसार ८,००० हून अधिक प्रत्यक्ष प्रश्नांवर डोसचेकची अचूकता ९९ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. एआय अंदाजावर चालते, पण औषधाचा डोस अंदाजावर ठरवता येत नाही, अशी भूमिका कंपनीच्या मुख्य एआय संशोधकांनी मांडली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून मोबाइल आणि संगणक दोन्हींवर डॉक्सिमिटी आस्क वापरणाऱ्या सर्व डॉक्टरांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

Read About : OpenAI Mathematical Breakthrough – ‘ओपनएआय’चा गणित, भौतिकशास्त्रात पराक्रम!

E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.