Ad Advertisement Ad Advertisement

Bamu Governor Skill Based Education 2026- विद्यापीठाने पदवीकेंद्रित नव्हे, तर क्षमताकेंद्रित शिक्षणावर भर द्यावा

कुलपती जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन | संशोधन, कौशल्य विकास आणि बहुविद्याशाखीय शिक्षणाला प्राधान्य देण्याचे प्रतिपादन

छत्रपती संभाजीनगर : Bamu Governor Skill Based Education 2026- विद्यापीठाने केवळ पदवी देणारी संस्था न राहता विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, कौशल्य, चिकित्सक विचार आणि सामाजिक जबाबदारी विकसित करणारे केंद्र बनले पाहिजे. पदवीकेंद्रित शिक्षणपद्धतीऐवजी क्षमताकेंद्रित शिक्षणावर भर देण्याची गरज आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात ज्ञान, हातात कौशल्य आणि हृदयात मूल्ये असली पाहिजेत, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या दीक्षांत समारंभात बुधवारी (दि. ४) विद्यापीठाच्या नाट्यगृहात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. विजय फुलारी, प्र-कुलगुरू डॉ. प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ. संजय कवडे, डॉ. बी. एन. डोळे, ॲड. दत्तात्रय भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलपती वर्मा म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव लाभलेल्या विद्यापीठातून पदवी प्राप्त करणे ही केवळ शैक्षणिक पात्रता नसून मोठी जबाबदारी आहे. विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची, सातत्याने शिकण्याची, मानवी प्रतिष्ठेचा आदर करण्याची आणि समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याची जबाबदारी पदवीधरांनी ओळखली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालक, शिक्षक, मार्गदर्शक आणि समाजाचे सामूहिक योगदान असते, याची जाणीवही त्यांनी ठेवावी. विद्यापीठाने मागील काही वर्षांत शैक्षणिक गुणवत्ता, विस्तार, संशोधन आणि संस्थात्मक विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. नॅककडून ३.३८ सीजीपीएसह ए प्लस मानांकन मिळणे ही अभिमानाची बाब आहे. मात्र, मानांकन म्हणजे गुणवत्तेचा अंतिम टप्पा नसून सातत्यपूर्ण गुणवत्तेची बांधिलकी आहे. त्याचप्रमाणे एनआयआरएफ २०२४ मध्ये राज्य सार्वजनिक विद्यापीठांच्या श्रेणीत ४६ वे स्थान मिळणे ही सकारात्मक बाब असली, तरी क्रमवारीपेक्षा विद्यार्थ्यांचे शिक्षण, संशोधन, नवकल्पना आणि सामाजिक योगदान अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षणात मोठे परिवर्तन घडत आहे. बहुविद्याशाखीय शिक्षण, कौशल्य विकास, ऐच्छिक विषय आणि नव्या अभ्यासक्रम रचनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विचार, विश्लेषण, संवाद, सर्जनशीलता आणि सहकार्याची क्षमता विकसित झाली पाहिजे. पारंपरिक शिक्षणासोबत कौशल्याधारित शिक्षणही उच्च शिक्षणाचा अविभाज्य भाग बनविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

बहुविद्याशाखीय शैक्षणिक वातावरण विकसित करावे


विद्यापीठाला पीएम-उषा योजनेंतर्गत एमईआरयू घटकातून १०० कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. हा निधी केवळ पायाभूत सुविधांसाठी नसून विद्यापीठाच्या भविष्यातील शैक्षणिक स्वरूपाच्या विकासासाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून आधुनिक प्रयोगशाळा, डिजिटल सुविधा, संशोधन केंद्रे आणि बहुविद्याशाखीय शैक्षणिक वातावरण विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यापीठाच्या भविष्यातील वाटचालीत संशोधनाला विशेष महत्त्व असले पाहिजे. मराठवाड्यातील पाणी, शेती, आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांवर विद्यापीठाने संशोधन करून त्यावर उपाय शोधण्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्योग, रुग्णालये, शाळा, प्रयोगशाळा, स्टार्टअप्स, शासकीय संस्था आणि सामाजिक संघटनांशी सहकार्य वाढवावे. संशोधन केवळ प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांपुरते मर्यादित न राहता समाजाच्या उपयोगी पडले पाहिजे, असे राज्यपाल वर्मा यांनी नमूद केले.

ज्ञानाचे दूत म्हणून समाजात जा

मराठवाड्याला अजिंठा-वेरूळ, पैठण, सुफी परंपरा, बौद्ध वारसा, लोकसंस्कृती आणि समृद्ध साहित्यिक परंपरेचा मोठा वारसा लाभला आहे. या वारशाचे दस्तऐवजीकरण, संशोधन आणि आधुनिक ज्ञानाशी त्याची सांगड घालण्याचे काम विद्यापीठाने करावे. भारतीय ज्ञानपरंपरेचा अभ्यास करताना तिचे चिकित्सक परीक्षण करणेही आवश्यक असल्याचे राज्यपाल वर्मा म्हणाले. तंत्रज्ञानाच्या वेगवान बदलांच्या काळात विज्ञान आणि समाज, तंत्रज्ञान आणि नैतिकता, नवकल्पना आणि सामाजिक जबाबदारी यांची सांगड घालणे आवश्यक आहे. विद्यापीठाने शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट, सामाजिकदृष्ट्या समावेशक, तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगत, संशोधनाभिमुख आणि संविधानिक मूल्यांशी बांधील संस्था म्हणून पुढे यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पदवी तुम्हाला संधी देते; मात्र तुमचे भविष्य तुमच्या निवडी आणि कृती ठरवतात. ज्ञानाचे दूत म्हणून समाजात जा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा व मूल्यांचा आदर्श आपल्या आचरणातून जपा, असे मार्गदर्शन त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना केले.

Read About : Education Department Inspects 517 Private Schools- पटसंख्येच्या बनवाबनवीला शिक्षण विभागाचा दणका!
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.