१० डिसेंबरला हैदराबादमध्ये भारतातील सातवे स्टोअर सुरू होणार
नवी दिल्ली : Apple Hyderabad Store – भारतातील टेकप्रेमींसाठी आनंदाची बातमी, जगप्रसिद्ध टेक कंपनी ॲपलने भारतीय बाजारपेठेतील आपला विस्तार आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी आता तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये आपले पहिले अधिकृत रिटेल स्टोअर सुरू करणार आहे. विशेष म्हणजे, हैदराबादची ‘मोत्यांचे शहर’ ही ओळख लक्षात घेऊन या स्टोअरचे आकर्षक डिझाइन तयार करण्यात आले आहे. येत्या १० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता हे स्टोअर ग्राहकांसाठी खुले होणार असून, भारतातील ॲपलचे हे सातवे रिटेल स्टोअर ठरणार आहे.
कसे असेल नवे ॲपल स्टोअर?
‘ॲपल कुकटपल्ली’ असे या नव्या स्टोअरचे नाव आहे. हैदराबादमधील लेक शोर-वाय जंक्शन मॉलमध्ये हे स्टोअर उभारण्यात आले आहे. कंपनीने या स्टोअरच्या बाह्य सजावटीची पहिली झलकही प्रसिद्ध केली आहे. इंद्रधनुषी पार्श्वभूमीवर मोत्यांपासून प्रेरित ॲपलचा लोगो साकारण्यात आला आहे. हैदराबादच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे हे डिझाइन विशेष आकर्षण ठरणार आहे.
खरेदीसोबत मोफत प्रशिक्षणही
या स्टोअरमध्ये ग्राहकांना आयफोन, आयपॅड, मॅकसह ॲपलच्या विविध उत्पादनांची संपूर्ण श्रेणी पाहता आणि प्रत्यक्ष वापरून अनुभवता येणार आहे. याशिवाय उत्पादनांबाबत मार्गदर्शन, तांत्रिक अडचणींचे निराकरण आणि व्यावसायिक ग्राहकांसाठी स्वतंत्र टीमची मदत उपलब्ध असेल.
विशेष म्हणजे, ‘टुडे ॲड ॲपल’ या उपक्रमांतर्गत ग्राहकांसाठी फोटोग्राफी, व्हिडिओ निर्मिती, चित्रकला आणि ॲपल उपकरणांच्या प्रभावी वापराबाबत मोफत प्रशिक्षण सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना खरेदीसोबत नवी कौशल्ये शिकण्याची संधीही मिळणार आहे.
भारतातील विस्ताराला वेग
मुंबई, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू आणि पुण्यानंतर आता ॲपलने हैदराबादमध्ये आपले पाऊल रोवले आहे. शहरात कंपनीची संशोधन आणि विकास तसेच रिटेल ग्राहक सेवा पथके आधीपासूनच कार्यरत आहेत. त्यामुळे हैदराबाद हे कंपनीच्या भारतातील कामकाजासाठी महत्त्वाचे केंद्र ठरले आहे.
उद्घाटनापूर्वी कंपनीने हैदराबादच्या संस्कृतीपासून प्रेरित खास डिजिटल वॉलपेपर, स्टिकर्स आणि संगीताची विशेष प्लेलिस्टही प्रसिद्ध केली आहे. १० डिसेंबरपासून हैदराबादकरांना ॲपलची उत्पादने, तांत्रिक मदत आणि मोफत प्रशिक्षणाचा अनुभव एकाच छताखाली घेता येणार आहे. त्यामुळे मोत्यांच्या शहरात आता ॲपलच्या तंत्रज्ञानाची नवी चमक पाहायला मिळणार आहे.
Read About: प्रकाशकोड्यात वेगवान इंटरनेटचे गुपित – Barium Titanate
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.