Ad Advertisement Ad Advertisement

Bamu 67th Convocation – हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मिळाले यशाचे प्रमाणपत्र

६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पदवीची मोहोर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६७ वा दीक्षांत सोहळा संपन्न

छत्रपती संभाजीनगर: Bamu 67th Convocation- उच्च शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पदवी हा केवळ शैक्षणिक प्रवासाचा शेवट नसून नव्या संधींची सुरुवात आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करा आणि विद्यापीठाशी असलेले नाते कायम जपा, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६७ व्या दीक्षांत समारंभात करण्यात आले. यंदा तब्बल ६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली असून, त्यामध्ये ३३४ संशोधकांना पीएच.डी. पदवीने गौरविण्यात आले.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा अत्यंत साधेपणाने पार पडला. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ४) विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा सोहळा झाला. मुंबई येथील इन्स्टट्यिूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे (आयसीटी) कुलगुरू प्रा. अनिरुद्ध पंडित प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी, प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, लोकभवनचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. संजय कवडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. बी. एन. डोळे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य ॲड दत्तात्रय भांगे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.


या दीक्षांत समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध विद्याशाखांतील ३३४ संशोधकांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये मानव्यविद्या शाखेतील सर्वाधिक १३१ संशोधकांचा समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील १२४, आंतरविद्याशाखेतील ४८, तर वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र शाखेतील ३१ संशोधकांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. याशिवाय ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२५ मधील परीक्षांतील १० हजार ३३१, मार्च-एप्रिल २०२६ मधील ५५ हजार २५५ आणि विद्यापीठ परिसरातील १ हजार ६३९ पदवीधारकांचा समावेश आहे. अशा एकूण ६७ हजार ५५९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.

कुलगुरू डॉ. फुलारी यांच्या कार्यकाळातील चौथा दीक्षांत सोहळा

कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी २४ जानेवारी २०२४ रोजी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळातील हा चौथा दीक्षांत समारंभ ठरला. यापूर्वी १३ जून २०२४ रोजी ६४ वा, २२ फेब्रुवारी २०२५ रोजी ६५ वा आणि ५ जानेवारी २०२६ रोजी ६६ वा दीक्षांत समारंभ झाला होता. आता ६७ वा समारंभही यशस्वीरीत्या पार पडला. दीक्षांत मिरवणुकीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर वंदे मातरम, राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. विविध विद्याशाखांतील पदव्यांचे वाचन संबंधित अधिष्ठात्यांनी केले. डॉ. मुस्तजिब खान आणि डॉ. गणेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

Read About : BAMU Career-Oriented Courses – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे नवे दालन
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.