Ad Advertisement Ad Advertisement

Bank Strike 2026 : बँक कर्मचाऱ्यांचा २८ सप्टेंबरपासूनचा देशव्यापी संप स्थगित

पाच दिवसांचा आठवडा, PLI योजना आणि प्रलंबित मागण्यांवर चर्चेसाठी समिती

मुंबई: Bank Strike 2026 बँकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करावा या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियन (UFBU) या संघटनेने २८ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यान पुकारलेला तीन दिवसीय देशव्यापी संप स्थगित करण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सकारात्मक तोडगा निघाल्याने हा निर्णय घेण्यात आला. ऐनवेळी संप टळल्याने सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे

बैठकीत झालेले मुख्य निर्णय

१. पाच दिवसांच्या आठवड्यासाठी समिती: सर्व शनिवार सुट्टी घोषित करण्याच्या मागणीवर विचार करण्यासाठी आयबीए (IBA) आणि यूएफबीयू (UFBU) मिळून तातडीने एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहेत. ही समिती सर्व घटकांशी चर्चा करून ग्राहकांच्या हिताचा विचार करत सर्वमान्य तोडगा काढेल.

२. PLI योजनेत बदल: स्केल ४ आणि त्यावरील बँक अधिकाऱ्यांसाठी लागू असलेल्या कामगिरीशी निगडित प्रोत्साहन योजनेत आवश्यक बदल करण्याबाबत दोन्ही बाजू आगामी काळात सविस्तर चर्चा करतील.

३. प्रलंबित मागण्यांवर तोडगा: यापूर्वी ८ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील प्रलंबित मागण्यांवर लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटना (AIBEA) आणि बँक अधिकारी महासंघाने या निर्णयाला सहमती दर्शवत आंदोलनाचे सर्व कार्यक्रम तूर्तास थांबवले आहेत। आयबीएने मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिल्यामुळे बँक संघटनांनी संप पुढे ढकलला आहे, ज्यामुळे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार ठप्प होण्यापासून वाचले आहेत.

Read About: UPI MDR: छोट्या व्यापाऱ्यांवर वाढू शकतो आर्थिक भार; ग्राहकांवरही परिणाम होण्याची सूरतच्या कापड व्यापाऱ्यांची चिंता
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.