Ad Advertisement Ad Advertisement

Delhi Murder Case Accused Arrested : छत्तीस तासांत कायद्याच्या कचाट्यात

Delhi Murder Case Accused Arrested : दिल्लीच्या टिळकनगर परिसरातील ओल्ड महावीर वसाहतीत दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली. शर्मा कुटुंबात काम करणारी मोलकरीण नेहमीप्रमाणे पावणेसातच्या सुमारास आली. आज दार उघडे पाहून ती चमकली. पण, आत गेली आणि तिच्या तोंडून जोरदार किंकाळी उमटली. कारण घरातली तरुण मुलगी मुस्कान रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा भाऊ आणि आई कुठे दिसत नव्हते.

मोलकरणीची किंकाळी ऐकून शेजारीपाजारी धावत आले. मुस्कानला पाहून एकच हलकल्लोळ उडाला. पण, गर्दीतील विजय नावाच्या तरुणाने प्रसंगावधान राखून रिक्षा बोलावली आणि एकाच्या मदतीने मुस्कानला उचलून रिक्षाने जनकपुरी इथल्या ‘अमर लीला रुग्णालयात’ नेले, तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. दरम्यान, मुस्कानच्या घरी जमलेल्या लोकांनी पोलिसांना कळवले होते. पोलीस पथक आले आणि तिथली पाहणी करून त्वरेने अमर लीला रुग्णालयात पोहोचले. डॉक्टरांशी चर्चा करून मुस्कानचा मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी रवाना केला.
एव्हाना मुस्कानची आई कमलेश आणि भाऊ आकाश घरी आले होते. मुस्कानच्या मृत्यूबद्दल ऐकून त्यांना धक्का बसला होता आणि ते आक्रोश करीत होते. त्यांचे थोडे सांत्वन केल्यावर पोलिसांनी त्यांना खुनाबद्दल विचारले. दोघांनी आकिब नावाच्या तरुणावर संशय व्यक्त केला. पोलिसांनी मुस्कानचा मोबाईल मागितला, पण तो घरात सापडला नाही. थोड्या वेळाने तो रस्त्यावर सापडला.

आकिब हा जिम ट्रेनर होता. आकाशने पोलिसांना त्याचा पत्ता सांगितला. तो जवळच्याच चौखंडी कॉलनीत राहतो हे समजल्यावर पोलीस लगेच त्याच्या घरी जाऊन धडकले, पण तो घरी सापडला नाही, त्यामुळे त्याच्याकडे चौकशी करणे शक्य झाले नाही. आकाश आणि त्याच्या आईने जरी आकिबवर संशय व्यक्त केला असला तरी पुराव्याशिवाय त्याला थेट अटक करणे शक्य नव्हते, त्यामुळे पोलिसांनी मुस्कानच्या आणि आकिबच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड मागवले. आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा दिसले की पांढरा शर्ट परिधान केलेला एक तगडा युवक ६ वाजता मुस्कानच्या घरात शिरताना आणि थोड्या वेळाने बाहेर पडताना आढळला. त्याचा चेहरा ‘झूम’ करून आकाशला आणि आईला दाखवला तेव्हा दोघांनी आकिबला ओळखले. मोबाईलचे कॉल रेकॉर्ड आणि सीसीटीव्ही हे दोन पुरावे हाती आल्यावर पोलिसांनी आकिबला पकडायचे ठरवले. पण, आकिब घरी नव्हता आणि त्याचा मोबाईल स्विच ऑफ होता. मात्र, पोलिसांची त्या नंबरवर पाळत होती.

खुनाच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजे २७ तारखेला शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर मुस्कानचे शव अंत्यसंस्कारांसाठी तिच्या नातलगांच्या हवाली करण्यात आले. त्याच रात्री ११ वाजता पोलिसांना त्यांच्या खबरीकडून समजले की आकिब या वेळी रघुवीर नगरमधल्या नाला रोडवर आहे. तात्काळ पोलिसांची दोन पथके नाला रोडवर रोडच्या दोन्ही दिशांनी धावली. दोन्ही दिशांनी पोलीस आल्यामुळे आकिबला पळून जाणे शक्य नव्हते. पोलिसांनी त्याला शरण येण्यासाठी आवाहन केले, पण आकिबने पोलिसांवर गोळीबार करून पळून जायचा प्रयत्न केला. तेव्हा प्रतिकारार्थ पोलिसांनी गोळीबार केला. आकिबच्या पायात तीन गोळ्या घुसल्या आणि तो कोसळला. पोलिसांनी त्याला अटक करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

कोण आहे आकिब? आणि कोण होती मुस्कान?

Delhi Murder Case Accused Arrested : मुस्कान ही कमलेश शर्माची तीन नंबरची मुलगी. आकाश तिचा धाकटा भाऊ. तिच्या दोन बहिणी विवाहित असून मुस्कान कॉलेजमध्ये शिकत होती. लवकरच पदवीधर होणार होती. एकवीस वर्षांची मुस्कान दिसायला अतिशय गोड व देखणी होती. तिचा बांधा कमनीय होता. फिटनेसच्या बाबतीत मुस्कान अतिशय जागरूक होती. पदवी मिळाल्यावर मॉडेलिंग क्षेत्रात जावे अशी तिची मनीषा होती. त्याच हेतूने ती रोज सकाळी ‘सेव्हन झोन’ नावाच्या जिममध्ये जायची. जिममध्येच तिची आकिब या ट्रेनरशी ओळख झाली. आकिब तिच्याच वयाचा होता. जिम ट्रेनर असल्याने स्वत: बॉडी बिल्डर होता. दिसयला देखणा होता.

मुस्कान लवकरच पदवीधर होणार होती आणि आकिब मात्र बारावी पास होता. तरीदेखील तारुण्यसुलभ हार्मोन्सचा परिणाम म्हणून मुस्कान आकिबच्या मोहजालात अडकली असावी. दीड वर्षे त्यांची मैत्री आणि प्रेम चालू होते. दोघे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर सक्रिय होते.कोणास ठाऊक कशी, पण मुस्कान कालांतराने भानावर आली. तिने आकिबशी मैत्री कमी करायला सुरुवात केली. आकिब मात्र तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. तो तिला लग्नाचा आग्रह करू लागला. तिने त्याला साफ नकार दिला. तो तिला वेळोवेळी रस्त्यावर अडवू लागला. तिने फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरणे बंद केले. त्याला व्हॉट्सॲप आणि फोनवर ब्लॉक केले. मग तो तिला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करू लागला. पण, त्याचा आवाज ऐकला की ती फोन कट करायची. तिने आईला आणि भावाला हे सर्व सांगितले. १८ जुलै रोजी त्यांनी पोलिसांत तक्रार केली, पण एफआयआर राहिला होता.

त्या वेळी आणि २०१८ सालीदेखील आकिबवर काही गुन्हे होते. ३० जुलै रोजी तो बाहेर सुटला. दिनांक २६ ऑगस्ट रोजी मुस्कान फेसबुक आणि इन्स्टाग्राम बघत असताना अचानक आकिबने इन्स्टाग्रामवर येऊन तिला खतम करण्याची धमकी दिली. पण, तिला ती खरी वाटली नाही. दुर्दैवाने ती खरी ठरली. संध्याकाळची वेळ होती. मुस्कानची आई आणि आकाश बाहेर गेले होते. मुस्कान फेसबुक बघत गुंग होती. उघड्या दारातून अचानक आकिब घरात घुसला. त्याने पुन्हा तिला लग्नाची मागणी घातली, तिने नकार दिला. वादावादी झाली. त्याने तिच्यावर चाकूने वार केले, तिचा मोबाईल घेतला आणि बाहेर पळाला. मोबाईल रस्त्यावर टाकून दिला.
पण, छत्तीस तासात कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोचले आणि तो ‘आत’ गेला.

विजय तरवडे

Read About : AI and Jobs – एआय आणि नोकरी
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.