Ad Advertisement Ad Advertisement

Barrier-Free Toll System- बॅरियर-लेस टोल नाक्यांवर मोठी गडबड

राजस्थानमध्ये २.६० लाख वाहने टोल न भरताच निघून गेली

जयपूर : Barrier-Free Toll System- महामार्गावरील ‘बॅरियर-लेस’ म्हणजे अडथळ्याशिवाय टोल घेण्याच्या पद्धतीत मोठी त्रुटी समोर आली आहे. राजस्थानातील शाहजहांपूर टोल नाक्यावर २४ लाख वाहनांपैकी २.६० लाख वाहनांची ओळखच पटली नाही. ही वाहने टोल न भरताच पुढे गेली. मनोहरपुरा टोल नाक्यावरही ९९,५०० हून अधिक वाहनांची नोंद मिळू शकली नाही. आता अशा वाहनचालकांकडून टोलच्या दुप्पट किंवा त्याहून जास्त दंड वसूल करण्याची तयारी सुरू आहे.

देशात आता असे टोल नाके उभारले जात आहेत जिथे टोल भरण्यासाठी गाडी थांबवावी लागत नाही. रस्त्यावर वर लावलेले कॅमेरे व आरएफआयडी उपकरणे नंबर प्लेट आणि फास्टॅग स्कॅन करतात आणि खात्यातून टोल आपोआप कापला जातो. याला ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (एमएलएफएफ) प्रणाली म्हणतात. ही प्रणाली योग्य चालण्यासाठी नंबर प्लेट आणि फास्टॅग स्पष्ट दिसले पाहिजेत व दोन्हींची माहिती जुळली पाहिजे.

नंबर प्लेट झाकलेली, गायब किंवा चुकीची असेल, तर कॅमेरा ओळखू शकत नाही. फास्टॅगमध्ये बिघाड असला तरी गाडी पकडली जात नाही. नेहमीच्या नाक्यावर बॅरियर आणि कर्मचारी असतात, जे टोल न देता जाणाऱ्या गाड्या थांबवू शकतात. पण एमएलएफएफ नाक्यावर बॅरियर नसल्याने अशा गाड्या थांबवणे सोपे नाही. फास्टॅगमध्ये पैसे कमी असलेल्या गाडीला ‘ओळख न पटलेल्या’ वर्गात टाकले जात नाही. मालकाला ई-नोटीस येते आणि रिचार्ज करून टोल भरण्यासाठी ७२ तासांची मुदत मिळते. नोटीसवर आक्षेप असेल तर तिला आव्हान देण्याचाही पर्याय आहे.

कुठे किती वाहने ओळखली गेली नाहीत?

शाहजहांपूर (राजस्थान), दिल्ली-जयपूर महामार्ग : प्रणाली १ ऑगस्टपासून सुरू. तेव्हापासून सुमारे २४ लाख वाहनांपैकी २.६० लाख ओळख न पटता गेली. मनोहरपुरा (राजस्थान), एनएच-४८ : १ जुलै ते २१ ऑक्टोबरदरम्यान सुमारे ३१.७४ लाख वाहने गेली. त्यापैकी ९९,५०० हून अधिकांची ओळख पटली नाही. मुंडका-बक्करवाला (दिल्ली) : सुमारे २ टक्के वाहनांची ओळख पटली नाही.

परनूर (तामिळनाडू) : १ ऑक्टोबरला प्रणाली सुरू झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांतच ५०० हून अधिक वाहनांची ओळख पटवता आली नाही.
एनएच-४८ वरील दौलतपुरा, मनोहरपुरा आणि शाहजहांपूर या तिन्ही नाक्यांवर ही प्रणाली चालू असल्याने दिल्ली-गुरुग्राम-जयपूर मागार्बाबत चिंता आहे. कारण एखादे वाहन टोल न भरता तिन्ही नाक्यांतून जाऊ शकते.

दंड अन् एफआयआरची तयारी

टोलचोरी करणाऱ्यांवर कडक कारवाईचा विचार मंत्रालय करत आहे. प्रस्तावानुसार ठरलेल्या टोलच्या दुप्पटीहून जास्त दंड लागू शकतो. नियम मोडणाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याचा पर्यायही विचाराधीन आहे. याबाबत महिनाभरात निर्णय अपेक्षित आहे. यासाठी एनएचएआय स्वतंत्र ऑनलाइन पोर्टलही बनवत आहे.

एआयच्या मदतीने पकडणार संशयास्पद गाड्या

एनएचएआय कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून उपाय शोधत आहे. त्यात एमएलएफएफ नाके, नेहमीचे नाके आणि ‘वाहन’ डेटाबेस जोडला जाईल. वाहनाचे मॉडेल आणि रंग यांसारखी माहिती वाहन डेटाबेसमध्ये असते. एआयच्या मदतीने सुमारे १० मिनिटांत वेगवेगळ्या नाक्यांवरील नोंदींची जुळवणी करून संशयास्पद गाडी शोधता येईल.

देशभर कधी येणार?

एनएचएआयने मे २०२६ मध्ये गुजरातमधील सुरतजवळच्या चोयार्सी टोल नाक्यावर देशातील पहिली एमएलएफएफ प्रणाली सुरू केली. सध्या ती ७ नाक्यांवर चालू आहे. आणखी १० ठिकाणी लवकरच सुरू होणार असून, १०४ इतर नाक्यांसाठी निविदा काढल्या आहेत. मार्च २०२९ पयंर्त देशातील चार किंवा अधिक लेनच्या सर्व राष्ट्रीय महामार्गांवर आणि एक्सप्रेसवेवर ही प्रणाली लागू करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.

Read About : EPFO New PF Withdrawal Rules 2026 -पीएफधारकांना मोठा दिलासा
E-Paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.