Ad Advertisement Ad Advertisement

China Nuclear Tank : 450 किमी मारा करणारा चीनचा आण्विक रणगाडा; 60 टनांचा सुपर टँक

१० मेगावॉटची लघु अणुभट्टी आणि ५० मेगाजूल रेलगन; २०४५ नंतर सुपर रणगाडा विकसित करण्याचे चीनचे उद्दिष्ट

बीजिंग : China Nuclear Tank पारंपरिक रणगाड्यांच्या संकल्पनेला पूर्णपणे छेद देत चीनच्या लष्करी संशोधकांनी एका ६० टन वजनाच्या आणि अणुऊर्जेवर चालणाऱ्या सुपर रणगाड्याची संकल्पना मांडली आहे. हा जगातील पहिलाच आण्विक हायपरसॉनिक रेलगन रणगाडा असून, तो तब्बल ४५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करण्यास सक्षम असेल. २०४५ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने विकसित करण्याचे उद्दिष्ट चीनने ठेवले आहे.

५० मेगाजूल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेलगन

या रणगाड्यात पारंपरिक रासायनिक दारूगोळ्याऐवजी विद्युत आणि चुंबकीय शक्तीवर चालणारी रेलगन बसवली जाईल. यातून सुटणाऱ्या प्रक्षेपकाचा वेग प्रति सेकंद ३.५ किमी (ताशी सुमारे १२,६०० किमी) असेल, जो ध्वनीच्या वेगापेक्षा १० पटीने अधिक म्हणजेच हायपरसॉनिक श्रेणीतील आहे. ४५० किमीच्या अफाट मारक्षमतेमुळे हा रणगाडा दूरवरून शत्रूची कमांड सेंटर्स आणि लष्करी तळ उद्ध्वस्त करू शकेल.

१० मेगावॉटची लघु अणुभट्टी

रेलगनला लागणारी प्रचंड विद्युतशक्ती क्षणात पुरवण्यासाठी रणगाड्यात १० मेगावॉट क्षमतेची, लेड-बिस्मथ असणारी लघु अणुभट्टी बसवली जाईल. ही संपूर्ण अणुभट्टी अवघ्या २ घनमीटर जागेत बसवण्याचे आव्हानात्मक उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, यातील इंधन सलग ५ वर्षे बदलण्याची गरज भासणार नाही.

तीन टप्प्यांचा आराखडा २०३५ पूर्वी

विद्यमान रणगाड्यांवर हायब्रिड-डिझेल सिस्टीम आणि १५० किमी रेंज असणारी १० मेगाजूलची तोफ बसवणे. २०३५ ते २०४५ या वर्षाच्या दरम्यान इंजिन क्षमता वाढवून ३०० किमी रेंजची २० मेगाजूलची रेलगन आणि एआय मायक्रोग्रीड विकसित करणे. २०४५ नंतर १० मेगावॅटची अणुभट्टी आणि ५० मेगाजूलची रेलगन एकत्रित करून मूळ सुपर रणगाडा तयार करणे असे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

चीनला यापूर्वी युद्धनौकांवर प्रायोगिक रेलगन आणि ईमाल्स तंत्रज्ञान वापरण्याचा अनुभव आहे. मात्र, अमेरिकेने वाढता खर्च आणि तांत्रिक अडचणींमुळे २०२१ मध्ये आपला रेलगन कार्यक्रम बंद केला होता. त्यामुळे अवघ्या ६० टनाच्या रणगाड्यात अणुभट्टी, कूलिंग सिस्टीम आणि रेडिएशन सुरक्षा एकत्र करणे हे चीनसमोरील सर्वात मोठे अभियांत्रिकी आव्हान असेल.

Read About : Indravati River : बस्तर भूमंडळाची इंद्रावती
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.