कोडिंगपासून क्राइम तपासापर्यंत, बेरोजगारी, तरुणांची स्वप्ने आणि सायबर गुन्ह्यांचा थरार उलगडणार दर्शील-झैनची अनोखी जोडी
मुंबई : Cyber Movie – हातात इंजिनिअरिंगची पदवी, डोळ्यांत मोठी स्वप्ने आणि मनात चांगल्या नोकरीची आशा…पण नोकरी मिळत नसल्याने सुरू असलेली धडपड, अशातच अचानक एका सायबर एजन्सीमध्ये काम करण्याची संधी मिळते आणि दोन तरुणांचे आयुष्यच बदलून जाते. सुरुवातीला साधी वाटणारी ही नोकरी त्यांना घेऊन जाते सायबर गुन्हेगारीच्या एका वेगळ्याच जगात, तंत्रज्ञानाचा वापर करून होणारे गुन्हे, त्यांचा तपास आणि या प्रवासात समोर येणारी अनपेक्षित आव्हाने यांचा थरार आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक अलोक नाईक यांचा आगामी चित्रपट ‘सायबर’ सध्या चर्चेत आहे.
‘तारे जमीन पर’मधील बालकलाकार
‘तारे जमीन पर’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून घराघरांत पोहोचलेला दर्शील सफारी या चित्रपटात झैन खान दुर्रानीसोबत झळकणार आहे. ‘शिकारा’ आणि ‘मुखबिर’मधील भूमिकांमुळे ओळख मिळवणारा झैन या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या दोघांची नवी जोडी आणि सायबर गुन्हेगारीसारखा आजच्या काळातील महत्त्वाचा विषय यामुळे चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
नोकरी मिळाली, पण पुढे काय घडले?
‘सायबर’ची कथा दोन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पदवीधर तरुणांभोवती फिरते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही त्यांना नोकरी मिळत नाही. करिअर घडवण्यासाठी आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी दोघांची धडपड सुरू असते. अशातच त्यांना एका सायबर एजन्सीमध्ये काम करण्याची संधी मिळते. आपल्या शिक्षणाचा आणि तांत्रिक ज्ञानाचा उपयोग करण्याची ही चांगली संधी असल्याचे त्यांना वाटते.
मात्र, या नोकरीमुळे त्यांच्यासमोर एक नवे आणि अनोखे जग उघडते. सायबर गुन्हे कसे घडतात, गुन्हेगार तंत्रज्ञानाचा गैरवापर कसा करतात आणि डिजिटल पुराव्यांच्या मदतीने त्यांचा माग कसा काढला जातो, याचा अनुभव त्यांना येऊ लागतो. प्रत्येक तपासासोबत नवे प्रश्न आणि आव्हाने समोर येतात. या कामामुळे दोघांच्या आयुष्यात अनपेक्षित बदल घडू लागतात.
केवळ गुन्हेगारीचा थरार नाही, तर तरुणांच्या संघर्षाची गोष्ट
आजच्या काळात सायबर गुन्हेगारी ही मोठी समस्या बनली आहे. ऑनलाइन फसवणूक, डिजिटल माध्यमांचा गैरवापर आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणारे गुन्हे याबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. ‘सायबर’ या विषयाला थरारक कथेची जोड देत प्रेक्षकांसमोर आणणार आहे.
विशेष म्हणजे, चित्रपटात केवळ गुन्हे आणि पोलिस तपास दाखवण्यात येणार नाही. बेरोजगारी, नोकरीसाठी तरुणांना करावी लागणारी धडपड, स्वत:ची ओळख निर्माण करण्याची इच्छा, वैयक्तिक स्वप्ने आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द यांनाही महत्त्व दिले आहे. त्यामुळे ही कथा केवळ सायबर गुन्ह्यांची नसून आजच्या तरुणांच्या जगण्याशी जोडलेली आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत नवे पाऊल
या चित्रपटाची निर्मिती राज झकारियास यांनी ‘सेलेब्स अँड रेड कार्पेट’ या बॅनरखाली केली आहे. या निर्मिती संस्थेने यापूर्वी ‘अन्वर’ (पृथ्वीराज अभिनीत), ‘लालबाग’ आणि ‘रहदारी’ यांसारख्या दक्षिण भारतीय चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘सायबर’च्या माध्यमातून ही संस्था प्रथमच हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे.
चित्रपटाची कथा निवडण्यामागील कारण सांगताना निर्माता राज झकारियास म्हणाले, ”या चित्रपटाने माझे लक्ष वेधून घेतले, कारण ही दोन इंजिनिअरिंग पदवीधर तरुणांची गोष्ट आहे. ते बेरोजगार आहेत आणि आयुष्यात काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही एका सामान्य माणसाची कथा आहे. सायबर एजन्सीमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कसे बदल घडतात, हे चित्रपटात वास्तववादी पद्धतीने दाखवण्यात आले आहे.”
दमदार कलाकार आणि लोकप्रिय संगीतकाराची साथ
दर्शील सफारी आणि झैन खान दुर्रानी यांच्यासोबत या चित्रपटात अजित कोशी, कबीर दुहान सिंह, प्रसाद ओक, अलीशा खान, आयुषी त्यागी, सौम्या श्रीवास्तव, राहुल सिंह आणि विठ्ठल काळे हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी लोकप्रिय आणि पुरस्कारविजेते संगीतकार गोपी सुंदर सी. एस. यांनी सांभाळली आहे. ‘गीता गोविंदम’, ‘बंगळुरू डेज’ आणि ‘चार्ली’ यांसारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतही त्यांच्या संगीताची विशेष ओळख आहे.
दर्शीलचा नवा अंदाज पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक
‘तारे जमीन पर’मधील निरागस ईशानच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा दर्शील सफारी आता एका वेगळ्याच विषयातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याच्यासोबत झैन खान दुर्रानीची जोडीही पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे. सायबर गुन्हेगारीचा थरार, बेरोजगारीचे वास्तव आणि स्वप्नांच्या मागे धावणाऱ्या दोन तरुणांची कहाणी यामुळे ‘सायबर’ हा चित्रपट वेगळा ठरण्याची शक्यता आहे.तंत्रज्ञानाच्या युगात घडणाऱ्या गुन्ह्यांची आणि त्यामागील सत्याची ही कहाणी प्रेक्षकांना किती भावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Read About: Aisi Deewangi Dekhi Nahin Kahin – बॉलिवूडला नवी जोडी! सुब्हान-ऐराहचे पदार्पण
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.