मध्यरात्री धडकणार, मदत यंत्रणा सज्ज | दोन्ही राज्यांत मुसळधार पाऊस, शाळांना सुट्टी
आंध्र प्रदेशात १९ उड्डाणे रद्द | हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
Cyclone Murasu in Andhra Pradesh : अमरावती/चेन्नई/भुवनेश्वर : ‘अर्णब’नंतर आता बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘मुरासू’ चक्रीवादळ सोमवारी रात्री ११ वाजून ३० मिनिटे ते मंगळवारी पहाटे ४ वाजेदरम्यान ओंगोलजवळ नेल्लोर व नरसापूरच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. या वादळामुळे ओडिशा व आंध्र प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू झाला असून प्रशासनाने दोन्ही राज्यांत अलर्ट जारी केला आहे. विजयवाडा, तिरुपती आणि विशाखापट्टणम येथील १९ उड्डाणे रद्द झाली. तर, तामिळनाडूची राजधानी चेन्नईत मुसळधार पाऊस सुरू असल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसेच हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ५ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास मुरासू चक्रीवादळ चेन्नईपासून २०० किमी आणि नेल्लोरपासून २१० किमी अंतरावर होते. ते २५ किमी प्रतितास वेगाने पुढे सरकत होते. आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव सुरू झाला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील मयपाडू समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात उंच लाटा उसळत असून, वादळी वारे वाहत आहेत. विजयवाडा विमानतळावरील १० उड्डाणे रद्द करण्यात आली. तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू आणि तिरुवल्लूर येथे रविवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे.
चेन्नईतील अनेक रस्ते जलमय झाले असून, शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ओडिशातील अनेक जिल्ह्यांत धुवांधार पाऊस सुरू आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील मयपाडू बीचवर समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. तामिळनाडूतील पझावेकार्डू येथे समुद्रात सुमारे ६ फूट उंच लाटा उसळत आहेत.
एनडीआरएफच्या ३ तुकड्या तैनात
मुरासू चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ‘एनडीआरएफ’च्या चौथ्या बटालियनच्या तीन तुकड्या आणि वीज वितरण विभागाच्या ५०० कर्मचाऱ्यांच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या तुकड्यांमध्ये ९० जवानांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातील नेल्लोर, प्रकाशम आणि मार्कापुरम येथे मदत आणि बचाव कार्यासाठी त्यांना तैनात करण्यात आले. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बापटला, कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुरासूचा अर्थ ‘युद्ध नगाडा’
मुरासू या चक्रीवादळाचे नाव भारताने दिले. तमिळ भाषेत मुरासूचा अर्थ ‘युद्ध नगाडा’ असा आहे. मुरासूने १ नोव्हेंबर रोजी बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचे रूप घेतले होते. २४ तासांच्या आत याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले. देशात एका आठवड्याच्या आत बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले हे दुसरे चक्रीवादळ आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर रोजी ‘अर्णब’ चक्रीवादळ आले होते.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : Tibet Mega Dam – ब्रह्मपुत्रेवरील चीनच्या महाधरणामुळे भारत-बांगलादेशला पुराचा धोका?
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.