३० जणांना उच्च रक्तदाबाचे निदान
छत्रपती संभाजीनगर : Diabetes Screening 153 People – धावपळीची जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. अनेकदा शरीरात आजाराची लक्षणे दिसत असतानाही दुर्लक्ष केले जाते. मात्र, वेळीच तपासणी आणि योग्य उपचार घेतल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळवून निरोगी आयुष्य जगता येते. हाच महत्त्वाचा संदेश देण्यासाठी १४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पद्मजा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी फिजिशियन डॉ. प्रीती तांदळे, डॉ. ओंकार झाडगावकर, डॉ. अमोल कुकडे, डॉ. जावेद कुरेशी, डॉ. प्रितेश लहाने, डॉ. वैष्णवी जायभाय, डॉ. नेहा धमाने, डॉ. महेविश शेख, डॉ. शरयू मारवाडकर, डॉ. अकसद देशमुख, मीनाक्षी ठोकळ, रेखा सुरोसे, साहेबरावकेळोदे, शितल बागुल, अनिता जाधव, स्वाती गुडवे उपस्थित होते. असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आयोजित या उपक्रमाचे यंदाचे ब्रीदवाक्य ‘मधुमेहावर वेळीच कृती’ असे होते.
मधुमेहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता नागरिकांना या आजाराबाबत जागरूक करणे, प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे, लवकर निदान करणे आणि नियमित उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करणे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू होता. या कार्यक्रमात आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला नागरिकांचा सहभाग लाभला. एकूण १५३ जणांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली. यामध्ये २५ जणांना मधुमेह, तर ३० जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळून आले.
लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
वारंवार लघवी होणे, सतत तहान लागणे, नेहमीपेक्षा जास्त भूक लागणे, विनाकारण वजन कमी होणे, थकवा, अशक्तपणा, अंधुक दिसणे आणि जखमा लवकर बऱ्या न होणे ही मधुमेहाची प्रमुख लक्षणे आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, शारीरिक हालचाल, संतुलित व पौष्टिक आहार, वजन नियंत्रणात ठेवणे आणि तंबाखू सेवन टाळणे या गोष्टींचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
Read About : Diabetes Eye Disease Diabetic – साखर वाढतेय अन् दृष्टी हरवतेय
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.