अडीच वर्षाच्या बालकासाठी डॉक्टर ठरले देवदूत
छत्रपती संभाजीनगर : Ghati Hospital Doctors – दिवाळीचा आनंदोत्सव सुरू असताना एका कुटुंबावर मात्र काळजाचा ठोका चुकवणारा प्रसंग ओढवला. अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याने सीताफळ खाताना त्यातील बी अनावधानाने गिळली आणि ती थेट फुफ्फुसात जाऊन अडकली. काही क्षणांतच चिमुकल्याची प्रकृती गंभीर झाली. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. मात्र, घाटी रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे या चिमुकल्याला नवजीवन मिळाले.
चिमुकल्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले होते. परिस्थिती पाहता कुटुंबीयांनी घाटीत धाव घेतली. येथे डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने उपचार सुरू केले. घाटी रुग्णालयातील कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी ब्रोन्कोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. अत्यंत कौशल्याने आणि काळजीपूर्वक प्रक्रिया पार पाडत फुफ्फुसात अडकलेली सीताफळाची बी बाहेर काढण्यात आली. डॉक्टरांच्या या प्रयत्नांना यश आले आणि चिमुकल्याच्या जीवावरील मोठे संकट टळले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कान, नाक व घसा विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथकाने ही यशस्वी उपचारप्रक्रिया पार पाडली. या उपचारात बालरोग पथकप्रमुख डॉ. तृप्ती जोशी, बधिरीकरणशास्त्र विभाग, ईएनटी विभाग, निवासी डॉक्टर, ओटी-१ मधील कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले.
पालकांनो, लहान मुलांना सीताफळ देताना विशेष काळजी घ्या
सीताफळाच्या बिया लहान मुलांच्या घशात किंवा श्वसनमार्गात अडकण्याचा धोका असतो. त्यामुळे लहान मुलांना सीताफळ देताना बिया पूर्णपणे काढून टाकाव्यात आणि त्यांच्या खाण्यावर लक्ष ठेवावे. मुलांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वेळ न घालवता तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा जीव धोक्यात येऊ शकतो.
– डॉ. सुनील देशमुख (कान, नाक व घसा विभागप्रमुख)
Read About : Diabetes Eye Disease Diabetic – साखर वाढतेय अन् दृष्टी हरवतेय
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.