Ad Advertisement Ad Advertisement

Ecuador Priest Death : धक्कादायक ! चर्चमध्ये प्रवचन देत असतानाच अंगावर पडला जड क्रॉस; थेट प्रक्षेपणादरम्यान पाद्रींचा अंत

ऑनलाइन लाइव्ह प्रक्षेपणादरम्यान घडलेल्या दुर्घटनेत ६१ वर्षीय फादर पॅट्रिसिओ आल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी यांचा मृत्यू

गवायाकील (इक्वाडोर) : Ecuador Priest Death इक्वाडोरमधील एका कॅथलिक चर्चमध्ये अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. चर्चमध्ये प्रार्थनेचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण सुरू असताना, भिंतीवरील एक मोठा आणि जड क्रुसिफिक्स (येशू ख्रिस्ताचा क्रॉस) पाद्रींच्या डोक्यावर कोसळला. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. फादर पॅट्रिसिओ आल्फ्रेडो सांचेझ मोलिनारी असे या ६१ वर्षीय मृत पाद्रींचे नाव आहे.

मृत्यूवरच दिले शेवटचे प्रवचन

या दुर्दैवी घटनेत एक अत्यंत अंगावर काटा आणणारा योगायोग समोर आला आहे. अपघात होण्याच्या अवघ्या काही सेकंद आधी फादर मोलिनारी हे मानवी जीवनाचे नश्वरत्व आणि मृत्यू या विषयावरच भाविकांना प्रवचन देत होते.

एक दिवस आपण सर्वजण मरणार आहोत. आपण आपला मौल्यवान वेळ मोबाईल फोनवर स्क्रोल करण्यात वाया घालवण्यापेक्षा देव आणि आपल्या कुटुंबियांना दिला पाहिजे, असा संदेश त्यांनी दिला. हे बोलून त्यांनी पुढची प्रार्थना सुरू करताच, त्यांच्या मागे भिंतीवर असलेला जड क्रॉस अचानक निखळला आणि थेट त्यांच्या डोक्याच्या पाठीमागच्या भागावर कोसळला.

चर्चमध्ये एकच गोंधळ आणि आक्रोश

ही घटना घडताच चर्चमध्ये उपस्थित असलेल्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण होते. थेट प्रक्षेपणात भाविकांचा आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज रेकॉर्ड झाला आहे. अनेक जण त्यांच्या मदतीसाठी धावले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावण्यात आली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

हा जड क्रॉस भिंतीवरून नेमका कसा निखळला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुख्य आर्चडायोसीजने फादर मोलिनारी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवरून हटवण्यात आला आहे.

Read About : Dongarale Murder Case – साडेचार वर्षांच्या बालिकेवरील अत्याचार-हत्या प्रकरणात आरोपीला मृत्युदंड
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.