Ad Advertisement Ad Advertisement

Mukundwadi Gang Terror – ‘काळ्या’, ‘पॉक्सी’, ‘बिबट्या’ गँगची मुकुंदवाडीत दहशत

विठ्ठलनगरात नशेखोर टोळक्याचा मध्यरात्री धिंगाणा : चाकूने फोडली कारची काच, व्हायरल व्हिडिओवरून १३ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : Mukundwadi Gang Terror मुकुंदवाडीतील विठ्ठलनगर परिसरात नशेखोर टवाळखोरांच्या टोळक्याने रस्त्यावर उतरून मध्यरात्री प्रचंड धिंगाणा घातला. आपसात वाद घालत या टोळक्याने परिसरात दहशत माजवली असून, एका अल्पवयीन मुलाने चाकूसारख्या हत्याराने रस्त्यावरील चारचाकी गाडीची काच फोडून नुकसान केले. या थराराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला असून मुकुंदवाडी पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यात तीन अल्पवयीनांचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस अंमलदार दीपक इंगळे यांच्या फिर्यादीवरून वैभव चव्हाण उर्फ काळ्या (रा. रामनगर, मुकुंदवाडी), रोहन तुपे उर्फ पॉक्सी, श्रावण किरण आव्हाड, साहिल साळवे, यश काळे (सर्व रा. संघर्षनगर, मुकुंदवाडी), निलेश उर्फ बिबट्या (रा. म्हाडा कॉलनी, एन-२, सिडको), संकेत केदारे, आदर्श उपदेशे, कुणाल भालेराव, भूषण मोकळे (सर्व रा. संजयनगर, मुकुंदवाडी) आणि तीन अल्पवयीन मुलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. विठ्ठलनगर चौकाकडून मारुती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील शहीद भगतसिंग मार्केटमध्ये ‘विमल आई दूध डेअरी’ आहे.

१६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास १३ जणांच्या टोळक्याने या डेअरीसमोरील गल्लीत बेकायदेशीरित्या एकत्र येत आरडाओरड व गोंधळ घालण्यास सुरुवात केली. नशेच्या आहारी गेलेल्या या तरुणांनी रस्त्यावरच आपसात वादावादी करत सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. याच दरम्यान टोळक्यातील एका अल्पवयीन मुलाने आपल्याकडील चाकूसारख्या तीक्ष्ण हत्याराने डेअरीसमोर उभ्या असलेल्या एका चारचाकी वाहनाच्या काचेवर वार करून काच फोडली.

व्हायरल व्हिडिओवरून पटवली ओळख

या धिंगाण्याचा व्हिडिओ एकाने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी पोलीस निरीक्षक सोनवणे यांना व्हॉट्सॲपवर पाठवला. त्यांनी तात्काळ विशेष पथकाला या हुल्लडबाजांची ओळख पटवून कारवाईच्या सूचना दिल्या. विशेष पथकाचे पोलीस हवालदार विक्रमसिंग राऊळ, अंमलदार दीपक इंगळे, राहुल राठोड, शाम आढे आणि संतोष भानुसे यांनी व्हिडिओची बारकाईने पाहणी करून सर्व १३ जणांची ओळख पटवली. अधिक तपास हवालदार राजाभाऊ कोल्हे करीत आहेत.

गुन्हेगारांची फिल्मी टोपणनावे अन् अल्पवयीन मुलांचा सहभाग!

रस्त्यावर उतरून दहशत माजवणाऱ्या या टोळक्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील आरोपींनी स्वत:ला ‘काळ्या’, ‘पॉक्सी’, ‘बिबट्या’ अशी गुन्हेगारी जगतातील टोपणनावे ठेवलेली असून, नशेच्या आहारी गेलेल्या या तरुणांमुळे मुकुंदवाडी व विठ्ठलनगर भागातील शांतता धोक्यात आली आहे.

Read About : Imran Khan Leave India Notice – अभिनेता इमरान खानच्या अडचणी वाढणार?
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.