आम्हाला न विचारता प्लॉट घेतलाच कसा? : भूमाफिया गुंड राहुल चाबुकस्वारच्या टोळीची धमकी, तिघांना बेड्या
छत्रपती संभाजीनगर : Extortion Gang Arrested in Sambhajinagar कुख्यात गुंड व भूमाफिया राहुल चाबुकस्वारच्या टोळीचा आणखी एक नवा कारनामा समोर आला आहे. या भागात आम्हाला विचारल्याशिवाय कोणी प्लॉट घेत नाही. प्लॉट हवा तर १५ लाख रुपये द्या. नाहीतर आणखी दोन मर्डर करणे आम्हाला अवघड नाही, अशी थेट धमकी देत त्याच्या टोळीने थेट खंडणी मागितली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने २४ नोव्हेंबर रोजी तिघांना अटक केली. मुख्य सूत्रधार राहुल साहेबराव चाबुकस्वार (रा. पुंडलिकनगर) हा मात्र अजूनही पसार आहे. त्याच्याविरुद्ध हा सलग चौथा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.
जमीर शेख उर्फ गुड्डू (रा. हुसेन कॉलनी), श्रीकांत घुले (रा. जयभवानीनगर) आणि प्रमोद उर्फ पप्पू रावसाहेब सोनकांबळे (रा. न्यू हनुमाननगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.
विकास सोनुने (३३, रा. चिकलठाणा) हे रामनगरमध्ये कॉम्प्युटर क्लासेस चालवतात. त्यांनी मित्र विशाल बनकरसोबत २९ ऑगस्टला जयभवानीनगरात प्लॉट नं २८६ व २८७ हे दोन प्लॉट घेतले. अॅड. गौतम कर्णे यांच्याकडून १८ लाखांत हा व्यवहार झाला होता. मात्र, १ सप्टेंबरला करबस माळी यांनी प्लॉटवर दावा करून तेथील नामफलक काढून वाद घातला. तेथून हे प्रकरण मुकुंदवाडी ठाण्यात गेले. पोलिसांनी माळीला कागदपत्र सादर करण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी २४ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्र सादर केले नव्हते. दरम्यान, त्यावर सोनुने यांनी महापालिकेत आक्षेप नोंदवला होता.
१३ ऑक्टोबरला सुनावणी होताच राहुल चाबुकस्वारची टोळी मैदानात उतरली. गुड्डू, घुले आणि सोनकांबळे यांनी दोघांना कामगार चौकात बोलावले. अनुराधा माळीकडून हा प्लॉट घेतल्याचे नोटराईज्ड खरेदीखत त्यांनी दाखवले. ही कागदपत्रे बनावट असल्याचा संशय आहे. आमच्या परवानगीशिवाय प्लॉट घेतलाच कसा, म्हणत त्यांनी १५ लाखांची खंडणी मागितली. पुढे १५ आणि २३ ऑक्टोबरलाही त्यांनी रस्त्यात व हॉटेलमध्ये गाठून धमकावले. टोळीच्या दहशतीमुळे घाबरलेल्या सोनुने यांनी अखेर २४ नोव्हेंबरला तक्रार दिली.
चाबुकस्वारवर २७ तर जमीरवर १० गुन्हे
या टोळीचा मास्टरमाइंड राहुल चाबुकस्वारविरुद्ध खून, बलात्कार, प्राणघातक हल्ला, अपहरण, खंडणी, मारहाण यासारखे सुमारे २७ गुन्हे दाखल आहेत. मागील दोन महिन्यांत त्याच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको, उस्मानपुरा, पुंडलिकनगर आणि मुकुंदवाडी या चार ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले असून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी डबल मोक्कानुसार कारवाई केली आहे. तो तेव्हापासून पसार झाला आहे. दरम्यान, जमीर शेखविरुद्धही खून, प्राणघातक हल्ला करणे, खंडणी यासारखे १० गंभीर गुन्हे दाखल आहेत. घुले आणि सोनकांबळे यांच्याविरुद्ध प्रत्येकी तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.
निर्भयपणे तक्रार करा : पोलिसांचे आवाहन
या टोळीने किंवा इतर कोणी धमकावून खंडणी मागितल्यास नागरिकांनी घाबरू नये. थेट पोलीस आयुक्तांच्या ९२२६५१४००१ या क्रमांकावर किंवा गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी केले आहे.
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.