लिफ्ट मागत मानेवर वार करून लुटल्याच्या प्रकरणात टोळीचा पर्दाफाश : एकाला बेड्या
छत्रपती संभाजीनगर : Robbery Gang Arrested बीड बायपासवरील हेडगेवार हॉस्पिटलजवळ लिफ्ट मागत मानेवर वार करून गंभीर जखमी करीत लुटल्याच्या प्रकरणाचा एमआयडीसी सिडको पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश केला. महिन्याभरापूर्वी जामिनावर सुटलेल्या टोळीनेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न होताच टोळीतील एकाला बेड्या ठोकल्या. पसार तिघांचा पोलीस शोध घेत आहेत.
ऋषीकेश गणेश उदावंत (२३, रा. स्वराजनगर, मुकुंदवाडी), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याने सुरज काळे आणि इतर दोघांच्या साथीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत राहिरे यांनी दिली.
सुमित कैलास भुजबळ (२४, रा. अमरावती, ह.मु. बजाज हॉस्पिटलजवळ, सुधाकर नगर रोड, सातारा परिसर) हा २० नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास सिडको बसस्थानक चौकात मित्राला भेटला. तेथून केंब्रिज चौक, झाल्टा फाटा मार्गे बीड बायपासने तो देवळाई चौकाकडे निघाला. हेडगेवार हॉस्पिटलजवळील पुलावर टोळीने त्याला लिफ्ट मागितली. तेव्हा सुमितने तुम्ही तिघे आहात, असे म्हणत लिफ्ट देण्यास नकार दिला. तेवढ्यात आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला.
मानेवर चाकूने वार करून गंभीर जखमी करीत त्याची दुचाकी, लॅपटॉप, मोबाइल आणि रोकड असा १ लाख ५५ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर विशेष पथकाचे सहायक निरीक्षक भरत पाचोळे, उपनिरीक्षक राहुल बिघोत, अंमलदार संतोष सोनवणे, संजय नंद, पोपट दहिफळे, प्रकाश सोनवणे, परशुराम सोनुने, रतन नागलोत यांच्या पथकाने तपास करून ऋषीकेश उदावंत, सुरज काळेच्या टोळीनेच हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले.
मुकुंदवाडी, बायपासवर वारंवार करतात गुन्हे
रेकॉर्डवरील आरोपी ऋषीकेश उदावंत, सुरज काळे आणि त्याचे साथीदार हे मुकुंदवाडी, चिकलठाणा, बीड बायपासवर सातत्याने फिरत राहतात. या टोळीविरुद्ध लुटमारीचे चार गुन्हे दाखल असून ते वारंवार याच भागात गुन्हे करतात. मोबाइल हिसकावल्याच्या एका गुन्ह्यात एमआयडीसी सिडको पोलिसांनी ऋषीकेश आणि सुरजला अटक केली होती. महिन्याभरापूर्वीच ते जामिनावर बाहेर आले. त्यानंतर लगेचच त्यांनी पुन्हा गुन्हा केला.
Read About: Honey Trap Crime Sambhajinagar – रात्रीचा ‘पुलाव’ पडला महागात; एमआर ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात! – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.