लग्नाच्याच दिवाशी मुलगी झाली गायब; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : Fake Marriage Fraud – लग्नासाठी मुलेगी दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर बनावट लग्न लावून पाच लाख रुपये उकळत तरुणाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाच्याच दिवाशी मुलगी गायब झाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मण कन्नुगोळे (३०, रा. बारसवाडा, ता. अंबड, जि. जालना) असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. लक्ष्मण कन्नुगोळे यांनी तक्रार दिली की, १४ ते १७ एप्रिल या कालावधीत वानखेडेनगर एन-१३ येथील सुनील विठोबा खेमणार, सचिन जाधव आणि कांता राहाणे या तिघांनी लक्ष्मण कन्नुगोळे यांना लग्नासाठी मुलगी दाखवून विवाह लावण्याचे आमीष दाखवले. त्याबदल्यात फिर्यादीकडून पाच लाख रुपये घेतले. १७ एप्रिल २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील वानखेडे नगर येथील एन १३ येथे सचिन जाधव यांच्याघरी १६ एप्रिल रोजी बोलाविले.
रात्री सहा वाजता कोमल राजू पवार ही मुलगी दाखविली. मुलगी पसंत आल्याने उर्वरित पैसे दिले. त्यावेळी कोणताही धार्मिक विधी किंवा कायदेशीर नोंदणी न करता एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्न झाल्याचे सांगितले. तसेच लग्नानंतर कोमलला लक्ष्मणसोबत मूळ गावी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील बारसवाडा येथे रवाना करण्यात आले. लग्नाच्या वेळी कोमल राजू पवार, सुनील विठोबा खेमणार, सचिन जाधव, कांता राहाणे असे चौघेजणही हजर होते.
वधू रात्रीतून गायब
लग्नानंतर लक्ष्मण आणि कोमल मध्यरात्री २.३० वाजता बारसवाडा येथे पोहोचले. त्यानंतर सर्व कुुंटुंबिय झोपल्यानंतर कोमलने घरातून धुम ठोकली. पहाटे साडेचार वाजता लक्ष्मण याने घरात पाहिले असता कोमल कुठेही आढळून आली नाही. कोणालाही न सांगता ती निघून गेल्याची खात्री झाली. सकाळी लक्ष्मणने सुनील खेमणार यांना फोन करून कोमल पळून गेल्याचे कळविले. त्यावेळी थोडे दिवस थांबा तुमच्यासाठी नवीन दुसरी मुलगी बघतोे असे म्हणून वेळ मारून नेली. आजपर्यंत लग्नासाठी मुलगी दाखविली नाही आणि घेतलेले पैसेही परत केले नाही. यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्ष्मणच्या लक्षात आल्याने त्याने बेगमपुरा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.
चौघांविरुद्ध गुन्हा
चौघांनी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याचे लक्ष्मण यांच्या लक्षात आले. या प्रकरणी सुनील विठोबा खेमणार, कोमल राजू पवार, सचिन जाधव आणि कांता राहाणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात बेगमपुरा पोलिसांनी सुनील खेमणार, कोमल पवार आणि कांता राहाणे या तिघांना अटक केली आहे. तर सचिन जाधवचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोमटे करीत आहेत.
महत्त्वाचे मुद्दे
Read About : थकीत वेतनासाठी १.८० लाखांची लाच; कला शिक्षकास रंगेहात पकडले! – Art Teacher Bribe Case
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.