६ लाखांचा ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई व खव्याचा साठा जप्त
छत्रपती संभाजीनगर : FDA Action 2026 : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘Safe Food Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर शहरात मोठी कारवाई केली. शाहनूरमियाँ दर्गा चौक परिसरातील डी-मार्टजवळील ट्रॅव्हल्स पार्किंगमध्ये दोन बसवर छापा टाकून ३,६९१ किलो संशयास्पद मिठाई व खवा सदृश अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालाची एकूण किंमत ५ लाख ९४ हजार ७३६ रुपये आहे.
मुंबई येथील इंटेलिजन्स ब्युरोकडून (IB) मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. श्रीनिवास केदार यांनी माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविले. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, शकीर्तिका झाडे आणि योगेश चिभादे यांच्या पथकाने रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी ही कारवाई केली.
नीलकंठ ट्रॅव्हल्सवर पहिली कारवाई
अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे आलेल्या नीलकंठ ट्रॅव्हल्स (बस क्रमांक AR 01 AR 5135) या बसची तपासणी करण्यात आली. बसमध्ये विक्रीसाठी आणण्यात आलेला संशयास्पद अन्नपदार्थांचा साठा आढळून आला. या कारवाईत २,०७९ किलो अन्नपदार्थ जप्त करण्यात आले असून, त्याची किंमत ३ लाख ५५ हजार ५०० रुपये आहे.
वीर ट्रॅव्हल्समधून १,६१२ किलो साठा जप्त
याच परिसरात वीर ट्रॅव्हल्स (बस क्रमांक AR 02 C 7878) या बसचीही तपासणी करण्यात आली. या बसमधून आलेल्या संशयास्पद अन्नपदार्थांचा १,६१२ किलो साठा** जप्त करण्यात आला. या मालाची किंमत २ लाख ४९ हजार २३६ रुपये असल्याचे प्रशासनाने सांगितले.
नमुने प्रयोगशाळेत; अहवालानंतर कारवाई
- दोन्ही कारवायांमध्ये अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे यांनी संबंधित अन्नपदार्थांचे कायदेशीर नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. उर्वरित अन्नपदार्थांचा संपूर्ण साठा मराठवाडा कोल्ड स्टोरेज प्रा. लिमिटेड येथे उणे १० अंश सेल्सिअस तापमानात सुरक्षितपणे सीलबंद करून ठेवण्यात आला आहे.
- प्रयोगशाळेचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत संबंधित दोषींविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांनी सांगितले.
- सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून अशा प्रकारच्या तपासण्या आणि कारवाया यापुढेही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
Read About : SSC HSC Exam 2027: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.