फिनलंडमधील ७५ टनांच्या इलेक्ट्रिक आर्क फर्नेसमध्ये रोबोट्सनी घेतली ‘उडी’; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सॅन होजे : Figure AI F.02 Humanoid Robots अमेरिकेतील आघाडीची रोबोटिक्स कंपनी ने आपल्या जुन्या F.02 ह्युमनॉइड रोबोट्सच्या ताफ्याला एका अतिशय नाट्यमय आणि ऐतिहासिक पद्धतीने निरोप दिला आहे. हॉलिवूडच्या प्रसिद्ध टर्मिनेटर २: जजमेंट डे चित्रपटातील शेवटच्या दृश्याप्रमाणेच, या रोबोट्सनी फिनलंडमधील एका स्टील कारखान्यात ७५-टन वजनाच्या धगधगत्या इलेक्ट्रिक आर्क फर्नेसमध्ये (भट्टीत) स्वतःहून उडी घेतली आणि त्यात ते वितळले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर जगभरातील टेक जगतात याची मोठी चर्चा सुरू आहे.
चित्रपटातील अभिनेत्याचा अजब सल्ला
या प्रयोगाची सुरुवात एका सोशल मीडियावरील चर्चेतून झाली कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रेट ॲडकॉक यांनी जुन्या रोबोट्सची विल्हेवाट कशी लावावी, याबद्दल इंटरनेटवर लोकांकडून कल्पना मागवल्या होत्या. यावर स्वतः ‘टर्मिनेटर’ फेम अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरने एका ओळीत उत्तर दिले यांना वितळवून टाका. कंपनीला ही कल्पना प्रचंड आवडली आणि त्यांनी श्वार्झनेगरच्या सहभागाने या प्रकल्पाची योजना आखली.
फिनलंडमध्येच का करण्यात आले?
रोबोट्समध्ये मोठ्या क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटऱ्या आणि महागडे सेन्सर्स असतात, जे भट्टीत टाकल्यास स्फोट होण्याचा किंवा उपकरणे खराब होण्याचा धोका असतो. यामुळे अमेरिका किंवा मेक्सिकोमधील कोणत्याही धातू कारखान्याने या रोबोट्सना स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला होता. अखेर, फिनलंडमधील ‘इमात्रा’ येथील एका विशेष स्टील प्लांटने यासाठी परवानगी दिली.
वितळवण्यामागचे तांत्रिक कारण
फिगर कंपनीने आपल्या दुसऱ्या पिढीतील F.02 रोबोट्सचा ताफा बीएमडब्ल्यूच्या कारखान्यात यशस्वी चाचणीनंतर निवृत्त केला होता. कंपनी आता अधिक प्रगत अशा F.03 आणि F.04 ताफ्याकडे वळत आहे. हे जुने रोबोट्स भंगारात टाकल्यास कंपनीचे पेटंट असलेले अंतर्गत डिझाईन आणि गोपनीय तंत्रज्ञान स्पर्धकांसमोर उघड होण्याचा मोठा धोका होता. तसेच, प्रत्येक रोबोटचे सुटे भाग मॅन्युअली वेगळे करण्यासाठी अभियंत्यांचा मौल्यवान वेळ वाया जाणार होता, जो कंपनीला नवीन पिढीच्या रोबोट्ससाठी वापरायचा होता
अशी घेतली रोबोट्सनी उडी
रोबोट्सना धगधगत्या भट्टीत अचूक उडी मारता यावी, यासाठी कंपनीच्या कॅलिफोर्नियातील मुख्यालयात स्टंट कलाकारांच्या हालचालींचा अभ्यास करून सिम्युलेशनद्वारे एका एआय मॉडेलला खास प्रशिक्षण देण्यात आले होते. अत्यंत तीव्र उष्णता आणि विद्युतचुंबकीय लहरी असूनही रोबोट्सनी आपोआप आणि यशस्वीपणे उड्या मारल्या. विशेष म्हणजे, एका रोबोटने वितळत असताना टर्मिनेटर चित्रपटाप्रमाणेच हाताने थंब्स-अप दाखवून सर्वांचे लक्ष वेधले.
या वितळलेल्या धातूपासून मिळणाऱ्या पट्ट्या आता पुन्हा अमेरिकेत आणण्यात आल्या असून, त्यापासून मर्यादित संख्येत स्मारक कलाकृती बनवून विक्रीसाठी उपलब्ध केल्या जाणार आहेत.
Read About : Longest Tunnels in the World : जगातील सर्वाधिक 24.5 किमी लांबीचे बोगदे
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.