Maharashtra drought : आज गणेश चतुर्थी. देशात आणि महाराष्ट्रात अनेक घरी आणि सार्वजनिक ठिकाणी श्रीगणेशाचं आगमन झालं आहे. गणपती म्हणजे सर्व विघ्न दूर करणारा, सुख देणारा देव म्हणून ओळखला जातो. म्हणूनच त्याला विघ्नेश किंवा सुखकर्ता, दुखहर्ता म्हटलं जातं. तो आपल्यापैकी काहींच्या घरीही येऊन विराजमान झाला असेल, पण महाराष्ट्रात आणि त्यातही विशेषत: ग्रामीण भागात चिंतेचं वातावरण आहे. बऱ्याच जिल्ह्यात पावसाचा पत्ता नाही.
अनेक जिल्ह्यात आधी जून व ऑगस्ट महिना कोरडा गेला आणि सप्टेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरी पावसाचा पत्ता नाही. मान्सून संपायला जेमतेम १५ दिवस बाकी आहेत. ऑक्टोबर म्हणजे थंडी पडण्याआधीचा कडक उन्हाळ्याचा महिना. त्या महिन्यात पावसाची शक्यता अतिशय कमी. शिवाय ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने कोरडे गेल्यास ऑक्टोबरमध्ये पाऊस पडून काही फायदा नाही अशी स्थिती. म्हणजे आधी जी शक्यता वर्तवण्यात आली होती, त्यानुसार हे वर्ष किमान महाराष्ट्रासाठी तरी चांगलं नाही. दुष्काळी स्थिती अटळ दिसत आहे, त्यामुळे विघ्नहर्ता गणराय आपल्याकडे आले असले तरी येणारं संकट दूर वा कमी होण्याची शक्यता अजिबात नाही.
हिंदी चित्रपटांत अनेकदा दुष्काळ दाखवला जातो. अगदी ‘दो बिघा जमीन’पासून ‘गाईड’, ‘लगान’ या हिंदी चित्रपटातील दुष्काळ आपल्यापैकी काहींनी पाहिला असेल. ‘हरियाला सावन ढोल बजाता आया’ हे गाणं ऐकायला बरं वाटतं, पण आपल्याकडे मात्र संपूर्ण श्रावणात पावसाने महाराष्ट्राकडे पाठच फिरवली. ‘मेघ दे पानी दे छाया दे रे’ या गाण्याद्वारे पावसासाठी देवाचा धावा करणाऱ्या देव आनंदने आपल्याला रिझवलं, पण आपल्यासाठी मात्र पावसाचं सुख वा समाधान यंदा नाही. ‘काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ’ ही आमिर खानची विनवणी ऐकून पाऊस पडला. राज्यातील शेतकरी मात्र केव्हाचा आभाळाकडे डोळे लावून बसला, पण आपल्या शेतात आणि तलावात फारसं पाणी पडलंच नाही, त्यामुळे आता विघ्नहर्ता गणपतीही आपल्याला सुख देऊ शकणार नाही.
अर्थात त्याबद्दल देवाला बोल लावून काय उपयोग? जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गाचं चक्र नीट फिरेनासं झालं आहे. ते अधूनमधून अडखळतं. कधी पाऊस जास्त, कधी कमी, कधी अजिबात थंडी नाही, कधी ती खूपच. यंदाचं वर्षआणि त्यातही ऑगस्ट महिना प्रचंड उन्हाळ्याचा होता. हिरवा श्रावण यंदा दिसलाच नाही. विकासाच्या नावाखाली जगभर निसर्गाचा जो विनाश झाला वा होत आहे, त्याचा हा परिणाम आहे. आपण सारेही त्याला काही प्रमाणात जबाबदार आहोतच.
मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे, सोलापूर, अहिल्यानगर वगैरे भागाची अवस्था यंदा फारच वाईट आहे. पाऊस नसल्यानं काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतावर नांगरच फिरवला आहे. काही निराशाग्रस्त शेतकऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलल्याच्या बातम्या येत आहेत. यावर्षीच्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजे मान्सूनचं आगमन होईपर्यंत अंदाजे एक हजार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं होतं. जुलै सुरू होण्याआधी मराठवाड्यात ४६५ तर पश्चिम विदर्भात सुमारे ३२५ शेतकऱ्यांनी जीव दिला होता. त्यानंतरच्या काळात रोज सरासरी तीन शेतकरी वा शेतीवर अवलंबून असलेले लोक आत्महत्या करत असल्याचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्यात ऐन बैल पोळ्याच्या तोंडावर एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली, त्यामुळे गावाने पोळा साजराच केला नाही. ही स्थिती भयावह आहे. निराशा आणि वाढत्या आर्थिक समस्या यांमुळे असे प्रकार होऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी आपापसात बोलणं, चर्चा करणं, उपाय शोधण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. चिंतेमुळे गप्प राहण्याने तणाव वाढतात आणि असं केलं जातं, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगत असतात.
यंदाच्या दुष्काळाची तुलना १९७२ सालाशी केली जात आहे. सप्टेंबर अर्ध्यावर आला तरी तलावात, अनेक धरणांत पुरेसं पाणी नाही. पावसाळा कागदोपत्री असून सुमारे ३०० पाण्याचे टँकर सुरू आहेत. सर्वाधिक पाणीटंचाई अहिल्यानगरमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगरची स्थितीही फारशी चांगली नाही. खुद्द शहरातही पाच-सहा दिवसांनी लोकांना पाणीपुरवठा होत आहे. जालना, बीड, सोलापूरची अवस्थाही खूप वाईट आहे. सुमारे १४०० गावे व वाड्या पूर्णपणे या टँकरवर अवलंबून आहेत. पुढील नऊ महिने ही स्थिती सुधारणार नाही आणि पाण्याची टंचाई असलेल्या गावांची संख्या अधिकच वाढत जाईल. विदर्भात पावसाची सुमारे ३० टक्के, तर मराठवाड्यात २० टक्के तूट आहे, त्यामुळे धरणातील पाणी पिण्यासाठीच वापरावं असं काही ठिकाणी आताच सांगण्यात आलं आहे. त्याचा परिणाम रब्बीवर होऊ शकेल.
आताच सोयाबीन, कापूस, मका, उडीद, मूग ही पिकं वाया गेल्याच्या बातम्या येत आहेत. म्हणजे त्यात केलेली गुंतवणूक वाया गेली. आता कुठं कर्जमाफीचा थोडासा फायदा झाला वा होत होता तोच हे संकट उभं राहिलं, त्यामुळे पुन्हा पाहणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुरू झाली आहे. आधी रब्बी गेलं आणि खरीपही, त्यामुळे हातात पैसा नाही, प्यायला पुरेसं पाणी नाही, विहिरीही कोरड्या पडण्याच्या अवस्थेत आणि जनावरांना पुरेसा चारा मिळण्याची शक्यता दुरावत चालली आहे. सततची नापिकी, डोक्यावर कर्जाचा बोजा आणि कधी अवकाळी पाऊस तर कधी पावसाची दडी यांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्था फार अडचणीत आली आहे.
पुढील पंधरा दिवसांत बरा वा चांगला पाऊस झाला तर पिण्याच्या पाण्याची समस्या काही प्रमाणात कमी होईल. पण, स्वत:साठी अन्नधान्य आणि जनावरांसाठी चारा हे प्रश्न खूप बिकट होतील अशी भीती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रोजगार हमी योजनेची कामं खूप कमी निघाल्याची तक्रार वा चर्चा आहे.
त्यातच ग्रामीण भागात व शहरात महागाईचा कहर सुरू झाला आहे. साखर, अन्नधान्य, कांदे, टोमॅटो, खाद्यतेल, दूध यांच्या किमती कडाडल्या आहेत. कांदे ६०-७० रुपयांवर गेले आहेत. बऱ्याच भाज्यांचा भाव २५-३० रुपये पाव किलो म्हणजे १०० रुपये किलोपर्यंत गेला आहे. एक लिंबू व शेवग्याची शेंग यासाठीही १० रुपये मोजावे लागत आहेत. हे भाव आणखीही वाढत जातील. परिस्थिती बिकट आहे, त्यामुळे केंद्र व राज्य सरकार काय उपाय योजणार, ग्रामीण भाग व शेतकऱ्यांना कसा दिलासा देणार हे पाहायचं.
संजीव साबडे
संपर्क : ८८८८८४३३७१

You need an account to post comments.