Terrorism and Deradicalization : जगातील बहुतांश राष्ट्र दहशतवादाने पीडित आहेत. सरकारकडून दहशतवादाचा कणा मोडण्याचे प्रयत्न सुरू आहे, तर काही राष्ट्र प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे दहशतवाद कधी मोडीत निघणार, हा प्रत्येकाला पडलेला जागतिक प्रश्न आहे. अर्थात एकविसाव्या शतकात जागतिक शांतता आणि स्थिरतेसमोर सर्वांत मोठे आव्हानच दहशतवाद आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर झालेल्या भीषण हल्ल्याला २५ वर्षांचा काळ उलटून गेल्यानंतरही दहशतवादाचे स्वरूप संपलेले नाही. उलट ते अधिक सूक्ष्म, आभासी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पसरल्याचे दिसत आहे. भारताला गेल्या ५० वर्षांपासून दहशतवादाची झळ बसत आहे, तर जागतिक दहशतवाद निर्देशांकानुसार, सर्वाधिक दहशतवादग्रस्त राष्ट्र म्हणून पाकिस्तान जगात अव्वल आहे. मात्र दहशतवादी बनलेला माणूस आयुष्यभर दहशतवादीच असतो, हा प्रत्येकांचा समज आहे. हा दृष्टिकोन सर्व दहशतवादी गुन्हेगार एकाच प्रकारचे असतात आणि त्यांचे पुनर्वसन अशक्य आहे, या गैरसमजावर आधारित आहे. परंतु आधुनिक संशोधन आणि प्रत्यक्ष अनुभवावरून हे स्पष्ट होत आहे की, योग्य पुनर्वसन, सामाजिक स्वीकार आणि विचारसरणीचे सकारात्मक परिवर्तन या माध्यमातून लोक दहशतवादाचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात येऊ शकतात. ऑस्टेलियात हे घडले आहे तर भारतात अंतर्गत सुरक्षेला धोका असलेला नक्षलवाद सध्या शेवटचा श्वास घेत आहे. परंतु सीमेवरचा दहशतवाद हा वेगळा…पाकिस्तानला ऑस्ट्रेलिया बनता येणार काय?
मानवी समज येतेय तेव्हा कोणालाही वाटत नाही की, आपण गुन्हेगारप्रवृत्ती स्वीकारावी. कोणाचा शत्रू म्हणून जगावे, मात्र जेव्हा समूहाने लोक दहशतवादी बनतात तेव्हा यांना शांतता नको असते काय? कोणतीही व्यक्ती किंवा समूह एका रात्रीत दहशतवादी बनत नाही. या दहशतवादामागे विविध कारणे असू शकतात. धर्म शांततेसाठीच आला, पण जगभरात एखाद्या विशिष्ट धर्मालाच दहशतवादासोबत जोडले जाते. दहशतवादामागे केवळ धर्मांधताच नसते, तर राजकीय असंतोष, आर्थिक, सामाजिक विषमता, बेरोजगारी आणि अन्यायाची भावना या घटकांचे जाळे असते. तरुण मने जेव्हा स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी धडपडत असतात, तेव्हा तो कट्टरपंथीयांच्या जाळ्यात नकळत ओढल्या जाते. कोणताही हिंसाचार हा न्याय नसतो, पण हिंसक विचार जेव्हा युवकांच्या मेंदूतील रक्ताभिसरण होते तेव्हा मात्र त्याच्यात अन्यायाची भावना निर्माण होते. अर्थात हिंसक विचारसरणी ही अन्यायाचे समर्थन करण्यासाठी वापरली जाते. त्यावेळी एखाद्या व्यक्तीला समाजात किंवा कुटुंबात स्वत:चे मूल्य जाणवत नाही, तेव्हा दहशतवादी संघटना त्यांना महत्त्वाची भूमिका आणि आपलेपणाची खोटी भावना देतात. त्यामुळे दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात केवळ लष्करी कारवाई पुरेशी नाही.
बंदुकीच्या बळावर दहशतवादी संघटनांचा सफाया होऊ शकतो, पण किडलेल्या विचारसरणीचा अंत होऊ शकत नाही. दहशतवाद सोडणे म्हणजे केवळ बंदूक खाली ठेवणे किंवा एखाद्या संघटनेचा राजीनामा देणे नव्हे; तर ती मानसिक आणि सामाजिक पुनर्बांधणीची प्रक्रिया आहे. जेव्हा एखादा व्यक्ती हिंसक संघटना सोडते तेव्हा तो एकाकी पडलेला असतो. त्याच्यासमोर जुने नातेसंबंध तुटलेले असतात आणि समाज स्वीकारणार की नाही? अशी भीती असते. अशावेळी स्वत:च्या ओळखीची पुनर्बांधणी करणे कठीण असते. हिंसक झालेल्या मेंदूतून बाहेर पडण्यासाठी केवळ जुने विचार काढून टाकणे पुरेसे नाही तर नावीन्यता, सकारात्मकता आणि सामाजिक ध्येय निर्माण करणे आवश्यक असते. जागतिक पातळीवर ऑस्ट्रेलियन सरकारच्या ‘कम्युनिटी इंटिग्रेशन सपोर्ट प्रोग्राम’सारख्या उपक्रमाने जगाला दाखवून दिले आहे की, वैज्ञानिक आणि मानवी दृष्टिकोनातून पुनर्वसन शक्य आहे. या मॉडेलचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ कायद्याचा बडगा न दाखविता विविध स्तरावर पाठिंबा दिला जातो. या माध्यमातून स्थानिक धार्मिक, मदतगार मार्गदर्शक, मानसशास्त्रज्ञ आणि कौटुंबिक साहाय्य अधिकारी एकत्र येऊन काम करतात. कट्टरपंथ कसा विनाशकारी असतो, हे समजावून सांगण्यासाठी धार्मिक ज्ञानाचा संदर्भासह अर्थ लावला जातो. नाण्याला दोन बाजू असतात. तसेच एखाद्या व्यक्तीला काळा रंग आवडतो की पांढरा? हा वैयक्तिक विषय असला तरी विचारांच्या दृष्टिकोनातून काळ्या प्रवृत्तीला बाहेर काढले जाते.
माणूस एकदा हिंसक विचारांतून बाहेर पडला की त्याला हिंसेपेक्षा शांतता जवळची वाटते. भारतात दहशतवादासह नक्षलवादाचा सामना करताना नेहमीच दुहेरी धोरण राबविण्यात आले. एकीकडे ‘झीरो टॉलरन्स’अंतर्गत सुरक्षादलांची कारवाई तर दुसरीकडे आत्मसमर्पण व पुनर्वसन योजना राबविल्या जाते. भरकटलेल्या काश्मिरी तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय लष्कराचे ‘ऑपरेशन सद्भाव’ हे आदर्श उदाहरण आहे. या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि क्रीडा उपक्रमांतून तरुणांना जोडले जाते. महाराष्ट्रातील गडचिरोलीसह विविध राज्यांत आत्मसमर्पण योजनेमुळे नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून सन्मानाचे आयुष्य सुरू केले आहे. परंतु या भारतीय प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय संस्थात्मक मॉडेल्सप्रमाणे मानसशास्त्रीय आणि दीर्घकालीन पुनर्वसनाच्या चौकटीत बांधण्याची गरज आहे.
बहुतांश लोकं न्याय आणि करुणेच्या भावनेतून दहशतवादाकडे आकर्षित होतात. परंतु त्यांचा हा जीवनमार्ग चुकलेला असतो. पुनर्वसन करताना या मूळ मानवी मूल्यांना कुटुंब, समाज अन् शांततेकडे वळविले जाते. दहशतवादी एका रात्रीत कोणीही बनत नाही, पण दहशतवादी झालेल्यांच्या आयुष्यातही परिवर्तन घडविण्याचे काम एका रात्रीत होत नाही. या वास्तविक परिवर्तनासाठी तीन किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांचा काळ लागतो. त्यामुळे भविष्यात तरुणांनी भरकटू नये, यासाठी शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सुरक्षा दिली तर कट्टरवादाला लगाम बसू शकतो. कारागृहात असलेल्या गतकाळातील दहशतवाद्यांना समाजात पुनर्स्थापित करण्यासाठी दीर्घकालीन, वैज्ञानिक आणि सहानुभूतीपूर्वक पुनर्वसन योजना राबविणे आवश्यक आहे. परंतु पाकिस्तानसारखा देश या धोरणाचा पाठिराखा कधी होणार? दहशतवादाविरुद्धचा लढा हा केवळ सीमांवर लढला जाणारा लढा नाही, तर तो मानवी मनातील विचारांचा लढा आहे. हिंसेचे धडगे उभारणाऱ्या द्वेषाविरोधात नम्रता आणि विश्वासाने माणूस बदलू शकतो. त्यामुळे भरकटलेल्यांना माणसांत आणण्यासाठी ऑस्ट्रेलियासारखे जागतिक प्रयत्न झाले पाहिजे…!!

You need an account to post comments.