Ad Advertisement Ad Advertisement

World Food Day 2026 : अन्नाचा उत्सव की भूकमुक्ती?

World Food Day 2026 : गेल्या सुमारे पाच दशकांपासून, म्हणजे सन १९८१ पासून दर वर्षी १६ ऑक्टोबर या दिवशी जगभर जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. तसा तो यंदाही तीन दिवसांपूर्वी साजरा झाला. खरे म्हणजे, काही दिवस ‘साजरे’ करावयाचे की ‘पाळावयाचे’ याबाबतचा संभ्रम अशा काही निमित्ताने अधिकच बळावतो. अन्नधान्याचे उत्पादन वाढत असल्याचा डांगोरा पिटला जात असला तरी जगातील कोट्यवधी लोकांना दोन वेळेचे पुरेसे अन्न मिळत नसेल, त्यांना अर्धपोटी किंवा उपाशी राहावे लागत असेल, तर अन्नाच्या उपलब्धतेपासून अन्न वितरणापर्यंतच्या साखळीसमोर उभी राहणारी प्रश्नचिन्हे अधिक गडद होतात आणि ‘आहे रे’ वर्गापेक्षाही, ‘नाही रे’ वर्ग अशा समस्यांनी होरपळू लागतात. अशा वेळी जे काही दिवस ‘साजरे’ करण्याऐवजी ‘पाळले’ गेले पाहिजेत, त्यामध्ये जागतिक अन्न दिवसाचा समावेश असायला हवा.

जेव्हा कोट्यवधी लोक अन्नाच्या अपेक्षेने दिवसेंदिवस भुकेल्या स्थितीत प्रत्येक दिवस ढकलत असतात, तेव्हा अन्न दिवस साजरा करणे ही त्यांच्यावर कोसळणाऱ्या आपत्तीची उपेक्षा ठरत असल्याने, जागतिक अन्न दिवसाचा उत्सव साजरा करण्यावर प्रश्नचिन्ह उमटायलाच हवे. अन्नधान्याचे पुरेसे उत्पादन होत असतानाही असंख्य लोकांवर उपासमारीची आपत्ती कोसळत असेल तर तो वितरणातील व्यवस्थेचा दोष मानावा, की वंचितांच्या उपेक्षेची सामाजिक मानसिकता मानावी हा प्रश्न मात्र जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने या प्रश्नाला सामोरे जाणे गरजेचे आहे. कारण केवळ जनजागृतीचे कार्यक्रम करून व दिवस साजरे करून भुकेच्या व कुपोषणाच्या समस्येवर मात करता येत नाही. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, सामाजिक संवेदनशीलता, प्रभावी सार्वजनिक धोरणे यांची सांगड घालणे गरजेचे ठरते.

म्हणूनच केवळ अन्नाचे महत्त्व अधोरेखित करणे हा जागतिक अन्न दिवसाचा मर्यादित उद्देश असू शकत नाही. जगातील भूक, उपासमारी, कुपोषण आणि अन्नसुरक्षेच्या समस्या सोडविण्यासाठी सरकारनी, शेतकऱ्यांनी, उद्योगविश्वाने आणि सामान्य समाजाने काय करावयास हवे याचे चिंतन या दिवसाच्या निमित्ताने होणे गरजेचे आहे. ज्याअर्थी, गेल्या सुमारे ४५ वर्षांपासून जगभर हा दिवस साजरा होत आहे, त्या अर्थी त्या दिवशी असे चिंतन होत असेल, तर या काळात या समस्येवर मात करण्यासाठी कोणते प्रयत्न झाले, त्यांना किती यश मिळाले आणि संपूर्ण यश मिळविण्याच्या अंतिम टप्प्यापासून जग किती दूर आहे याचा लेखाजोखादेखील मांडला जावयास हवा.

कोणत्याही जिवंत व्यक्तीवर उपासमारीची वेळ येऊ नये, अर्धपोटी झोपण्याचा प्रसंग ओढवू नये आणि कोणत्याही बालकावर अन्नाअभावी कुपोषणाच्या समस्येची शिकार होण्याचा प्रसंग ओढवू नये याकरिता प्रत्येक व्यक्तीला पुरेसे, सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळावे, शेती व अन्नव्यवस्था शाश्वत व्हावी ही या दिवसामागील व्यापक भूमिका आहे.

म्हणजेच जागतिक अन्न दिवस हा अन्नाचा उत्सव न राहता, जगात कोणावरही भुकेले राहण्याची वेळ येणार नाही यासाठी काय करता येईल याचा हिशेब मागणारा दिवस असायला हवा. पण, प्रत्यक्षात जगभरातील भुकेच्या समस्येचे वास्तव मात्र काहीसे चिंताजनकच आहे. जगभराच्या लोकसंख्येपैकी सुमारे आठ टक्के लोकसंख्या भुकेच्या समस्येशी संघर्ष करत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या २०२६ च्या अहवालातच नमूद करण्यात आले आहे. २०२५ मध्ये जगातील ४७ देशांतील सुमारे २६ कोटी लोकांना तीव्र अन्नसंकटाचा सामना करावा लागला, असेही या अहवालात म्हटले आहे.

त्यामुळेच अन्नधान्याचे उत्पादन वाढत असतानाही भुकेची समस्या कायम का, हा प्रश्न जागतिक अन्न दिवसाच्या केंद्रस्थानी असायला हवा. अन्नधान्याच्या उपलब्धतेअभावी भुकेची समस्या निर्माण होते असे नाही, तर उपलब्ध असूनही प्रत्येकाच्या ताटात गरजेएवढे अन्न पोहोचत नाही असा याचा स्पष्ट अर्थ आहे. अन्नधान्याच्या किमती वाढल्यावर गरीब कुटुंबांच्या आहारातील पोषक अन्नपदार्थ दूर होतात, त्यामुळे पोट भरले तरी पोषण होत नसल्याने जगण्याच्या संघर्षाची शक्ती क्षीण होत जाते. अमाप उत्पादनामुळे जगात एका बाजूला अन्न वाया जाते, तर दुसऱ्या बाजूला कुपोषणाचा विळखा कायम राहतो.

यामुळेच भूक ही केवळ शेती किंवा अन्नधान्याच्या उत्पादनाशी जोडलेली समस्या नाही, तर सामाजिक न्याय आणि मानवी हक्काशी जोडली गेलेली समस्या आहे. अशा वेळी भूक ही केवळ नैसर्गिक आपत्ती राहत नाही. ती मानवनिर्मित संकट बनते. एका बाजूला अन्नाची नासाडी आणि दुसऱ्या बाजूला उपासमार असेल, तर ही केवळ संसाधनांची कमतरता नाही; ती व्यवस्थेच्या प्राधान्यक्रमांचीही कसोटी आहे. अन्न ही चैनीची वस्तू नाही, ती मानवी जगण्याची मूलभूत गरज आहे, म्हणून भुकेकडे दानधर्माचा विषय म्हणून नव्हे तर मानवी प्रतिष्ठा, सामाजिक न्याय आणि सार्वजनिक धोरणांचा अविभाज्य भाग म्हणून पाहिले पाहिजे.

जागतिक अन्न दिवस साजरा करण्याचे किती कार्यक्रम झाले, यापेक्षा त्या दिवसानंतर किती लोकांची भूक मिटली, किती बालकांचे कुपोषण कमी झाले हा त्याच्या यशाचा खरा निकष असला पाहिजे. अन्यथा अन्न दिवस साजरा करणाऱ्या व्यासपीठांवर भूकमुक्त जगाची घोषणा घुमत राहील आणि त्याच वेळी जगाच्या एखाद्या कोपऱ्यात एखादे मूल रिकाम्या पोटी झोपेल. त्या घोषणेतील आणि वास्तवातील अंतर कमी करणे हेच जागतिक अन्न दिवसाचे खरे प्रयोजन आहे.

Read About : India-China Relations : वाघ आणि ड्रॅगन
E-Paper : Punyanagari E-Paperसंपादकीय

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.