Ad Advertisement Ad Advertisement

Himachal Pradesh Weather : हिमाचलमध्ये पुन्हा पाऊस आणि हिमवृष्टीचा अंदाज; तापमानात ६ अंशांपर्यंत घसरणीची शक्यता

१३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव; उंच पर्वतीय भागांत बर्फवृष्टी, अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता

शिमला : Himachal Pradesh Weather उत्तर भारतातील डोंगराळ राज्य असणाऱ्या हिमाचल प्रदेशात पुन्हा एकदा पाऊस आणि हिमवृष्टीचा नवा टप्पा सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नव्या पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे १३ ऑक्टोबरच्या संध्याकाळपासून ते १५ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि उंच पर्वतीय भागात बर्फवृष्टी होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा यांनी दिली आहे.

कुठे पाऊस आणि कुठे होणार हिमवृष्टी?

चंबा, कांगडा, लाहुल-स्पिती आणि कुल्लू जिल्ह्यांतील उंच पर्वतीय भागात आणि घाटांमध्ये हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान मध्य-डोंगराळ भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर १५ ऑक्टोबर रोजी उना, बिलासपूर, हमीरपूर, सिरमौर आणि सोलन या मैदानी भागांतही पावसाची शक्यता आहे. १६ ऑक्टोबरपासून पावसाचा जोर कमी होईल आणि १७ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात हवामान पूर्णपणे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.

तापमानात मोठी घसरण

मागील २४ तासांत झालेल्या पावसामुळे हिमाचल प्रदेशातील बहुतांश शहरांमध्ये दिवसाच्या तापमानात मोठी घसरण झाली आहे. अनेक ठिकाणी कमाल तापमान सामान्यपेक्षा ६ ते १० अंश सेल्सिअसने खाली आले आहे. शिमला येथे कमाल तापमान १६.४ अंश सेल्सिअस (सामान्यपेक्षा ६ अंशाने कमी), तर कुल्लू, कांगडा आणि चंबा येथे १८ ते १९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. चंबामध्ये तापमानात मोठी घसरण झाली असून तिथे तापमान सामान्यपेक्षा तब्बल १४ अंशांनी खाली घसरले आहे. येत्या १३ ते १५ ऑक्टोबरदरम्यान पुन्हा सक्रिय होणाऱ्या प्रणालीमुळे तापमानात आणखी ४ ते ६ अंशांची घसरण होऊ शकते.

हिवाळा सुरू झाला का?

अचानक वाढलेल्या थंडीमुळे हिवाळा सुरू झाल्याची चर्चा असली तरी हवामान शास्त्रज्ञ संदीप कुमार शर्मा यांनी स्पष्ट केले की, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे महिने पोस्ट-मॉन्सून हंगामात मोडतात. या काळात मुख्यत्वे पश्चिमी चक्रवातामुळे पाऊस आणि बर्फवृष्टी होते. शिमला, लाहुल-स्पिती, किन्नौर आणि कुल्लूमध्ये खरा मुख्य हिवाळा आणि नेहमीची बर्फवृष्टी सहसा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होते. त्यामुळे सध्याचा काळ हा हिवाळ्याची चाहूल मानली तरी हा मुख्य हिवाळा नाही.

Read About : Indian Wolf Satellite Collar लांडग्याला सॅटॅलाइट कॉलर; राज्यातील दुसरा प्रयोग संभाजीनगरात
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.