भारताची निर्यात 82.68 अब्ज डॉलरवर पोहोचल्याची वाणिज्य सचिव Rajesh Agrawal यांची माहिती
नवी दिल्ली : Export Growth: भारताच्या निर्यात क्षेत्रासाठी ऑगस्ट 2026 महिना सकारात्मक ठरला आहे. ऑगस्टमध्ये देशाच्या एकूण निर्यातीत वार्षिक आधारावर 25.4 टक्क्यांची वाढ होऊन ती 82.68 अब्ज डॉलरवर पोहोचली. त्याचवेळी भारताची एकूण व्यापार तूट मागील वर्षीच्या 11.62 अब्ज डॉलरवरून घटून 9.41 अब्ज डॉलरवर आली आहे. निर्यात वाढीचा वेग आणखी मजबूत झाला असून विविध वस्तू आणि जागतिक बाजारपेठांमध्ये भारताच्या निर्यातीचा विस्तार होत असल्याचे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal) यांनी सांगितले.
ऑगस्ट 2025 मध्ये भारताची एकूण निर्यात 65.93 अब्ज डॉलर इतकी होती. यंदाच्या ऑगस्टमध्ये तीने मोठी झेप घेऊन ती आता 82.68 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. निर्यातीत झालेली ही वाढ केवळ किमतीतील बदल झाल्यामुळे नसून प्रत्यक्ष निर्यात केलेल्या मालाच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे आकडेवारीतून दिसून येते. ऑगस्ट 2026 मध्ये वस्तूंची निर्यात 43.81 अब्ज डॉलरवर पोहोचली. मागील वर्षी याच महिन्यात ती 34.74 अब्ज डॉलर इतकी होती. म्हणजेच वस्तूंच्या निर्यातीत 26.12 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे, वस्तूंची आयात 70.67 अब्ज डॉलर राहिली. त्यामुळे ऑगस्टमध्ये वस्तूंच्या व्यापारातील तूट 26.86 अब्ज डॉलर राहिली, जी मागील वर्षी 27.20 अब्ज डॉलर होती.
एकूण आणि वस्तूंच्या व्यापार तुटीत झालेली घट ही सकारात्मक बाब असल्याचे राजेश अग्रवाल (Rajesh Agrawal) यांनी सांगितले. निर्यात वाढीसोबतच व्यापार तूट कमी होणे हे देशाच्या परकीय व्यापारासाठी महत्त्वाचे संकेत मानले जात आहेत. पहिल्या पाच महिन्यांमध्ये पेट्रोलियम, कच्चे तेल तसेच कोळसा, कोक आणि ब्रिकेट यांसारख्या ऊर्जा उत्पादनांचा व्यापार तुटीत मोठा वाटा राहिला. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीतही लक्षणीय वाढ झाली आहे. निर्यातीच्या बाबतीत अभियांत्रिकी वस्तू, पेट्रोलियम उत्पादने, रसायने आणि कापड क्षेत्राने चांगली कामगिरी केली. पहिल्या पाच महिन्यांत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत सुमारे 30 टक्के वाढ झाली. अभियांत्रिकी वस्तूंची निर्यात 20 टक्क्यांहून अधिक वाढली, तर सेंद्रिय आणि असेंद्रिय रसायनांच्या निर्यातीत 14 टक्के वाढ झाली. सागरी उत्पादनांच्या निर्यातीतही 14 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली.
भारताने निर्यातीसाठी पारंपरिक बाजारपेठांबरोबरच विविध देशांमध्ये विस्तार करण्यास सुरुवात केल्याचेही या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. चीनला होणाऱ्या निर्यातीत 39 टक्के वाढ झाली. सिंगापूरला निर्यात 97 टक्क्यांहून अधिक वाढली. दक्षिण आफ्रिकेला 58 टक्के, तर मलेशियाला होणाऱ्या निर्यातीत 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. ब्रिक्स देशांनाही भारताच्या निर्यातीमध्ये महत्त्वाचे स्थान मिळत आहे. पहिल्या पाच महिन्यांत ब्रिक्स देशांना भारताची निर्यात 13.3 टक्क्यांनी वाढून 34.5 अब्ज डॉलरवर पोहोचली.
निर्यातीच्या या वाढीमुळे भारतीय उत्पादन क्षेत्रासाठीही सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, रसायने, कापड आणि सागरी उत्पादनांसारख्या विविध क्षेत्रांमधून निर्यात वाढत असल्याने भारताच्या उत्पादन क्षमतेला जागतिक बाजारपेठेत अधिक मागणी मिळत असल्याचे संकेत आहेत. विविध देशांमध्ये निर्यात वाढल्यामुळे एखाद्या एका बाजारपेठेवरील अवलंबित्व कमी करण्यासही मदत होऊ शकते. त्यामुळे जागतिक मागणीतील बदल किंवा एखाद्या देशातील व्यापारविषयक अडचणींचा भारतीय निर्यातीवर होणारा परिणाम काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. वाणिज्य सचिवांनी निर्यात वाढीचा आणखी एक महत्त्वाचा पैलू अधोरेखित केला. ही वाढ केवळ निर्यात मालाच्या किमती वाढल्यामुळे झालेली नसून प्रत्यक्ष प्रमाणातही वाढ झाली आहे. एकूण 168 प्रमुख वस्तूंपैकी 68 वस्तूंमध्ये किंमत आणि निर्यात प्रमाण या दोन्ही बाबतीत वाढ झाली आहे.
यावरून भारताच्या निर्यात वाढीला उत्पादन क्षेत्रातील वाढ आणि प्रत्यक्ष मालवाहतुकीतील वाढीचा आधार मिळत असल्याचे संकेत मिळतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतील मागणी, भारतीय उत्पादनांची स्पर्धात्मकता आणि विविध देशांमध्ये निर्माण होत असलेल्या नव्या संधी या पुढील काळात निर्यातीसाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. भारताच्या निर्यात बाजारपेठेचे होत असलेले विविधीकरण आणि उत्पादनाधारित निर्यातीत झालेली वाढ यामुळे देशाच्या परकीय व्यापाराला अधिक व्यापक आधार मिळण्याची शक्यता आहे. व्यापार तूट कमी होत असतानाच निर्यात वाढत असल्याने आगामी महिन्यांतील आकडेवारीकडे उद्योग आणि व्यापार क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.
ऑगस्टमधील व्यापाराची प्रमुख आकडेवारी
- एकूण निर्यात : 82.68 अब्ज डॉलर
- एकूण निर्यात वाढ : 25.4 टक्के
- वस्तूंची निर्यात : 43.81 अब्ज डॉलर
- वस्तूंची आयात : 70.67 अब्ज डॉलर
- एकूण व्यापार तूट : 9.41 अब्ज डॉलर
- वस्तूंची व्यापार तूट : 26.86 अब्ज डॉलर
कोणत्या बाजारपेठेत निर्यात वाढली?
चीनला भारताची निर्यात 39 टक्के, सिंगापूरला 97 टक्क्यांहून अधिक, दक्षिण आफ्रिकेला 58 टक्के आणि मलेशियाला 75 टक्क्यांहून अधिक वाढली. पहिल्या पाच महिन्यांत ब्रिक्स देशांना भारताची निर्यात 13.3 टक्क्यांनी वाढून 34.5 अब्ज डॉलर झाली.
Read About: Taiwan Warns: चीनमध्ये जाणाऱ्या तरुणांसाठी वाढता धोका; फसवणूक आणि नजरकैदेचा इशारा
E-Paper: Punyanagari E-Paper

You need an account to post comments.