India’s National Security : दहशतवादाचे स्वरूप बदलत असताना त्याचा सामना करण्याची भारताची क्षमताही अधिक व्यापक, आधुनिक आणि प्रभावी होतेय. एकेकाळी सीमापार घुसखोरी, बॉम्बस्फोट आणि सशस्त्र हल्ल्यांपुरते मर्यादित असलेले दहशतवादाचे आव्हान आता डिजिटल माध्यमे, सायबर जग आणि तरुणांच्या वैचारिक विश्वापर्यंत पोहोचले आहे. मात्र, या बदलत्या आव्हानांपुढे भारत हतबल नाही. उलट, सुरक्षा यंत्रणांचे आधुनिकीकरण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, गुप्तचर यंत्रणांमधील समन्वय आणि दहशतवादाविरुद्धची ठाम राजकीय इच्छाशक्ती यांच्या बळावर भारताने आपल्या सुरक्षेची व्याप्ती अधिक मजबूत केली आहे. जम्मू-काश्मीरमधील अलीकडील दहशतवादी घटना आणि पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीच्या माध्यमातून भारतीय तरुणांना ऑनलाइन जाळ्यात ओढण्याचा उघड झालेला प्रयास या पार्श्वभूमीवर भारताच्या सुरक्षा सामर्थ्याचा आणि बदलत्या रणनीतीचा वेध घेणे समयोचितच ठरते.
जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची निर्घृण हत्या आणि कुलगाममधील मीरबाजार येथे सीआरपीएफ चौकीवर झालेला सशस्त्र हल्ला या घटना दहशतवादी कारवायांचे आव्हान अद्याप कायम असल्याचे दर्शवितात. मात्र, अशा घटनांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांनी विकसित केलेली क्षमता आणि त्यांची कार्यतत्परता ही देशासाठी मोठी जमेची बाजू आहे. दुर्गम जंगलांमध्ये ड्रोन, श्वान पथके आणि आधुनिक शोधसाधनांच्या मदतीने राबविल्या जाणाऱ्या मोहिमा असोत किंवा संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उभारलेली बहुस्तरीय यंत्रणा असो, प्रत्येक स्तरावर तंत्रज्ञान आणि मानवी कौशल्याची सांगड घातली जात आहे. लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल, जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांमधील समन्वयामुळे दहशतवाद्यांच्या हालचालींना आळा घालण्याचे प्रयत्न अधिक प्रभावी झाले आहेत.
दहशतवाद्यांच्या प्रत्येक डावाला तातडीने आणि अचूक प्रत्युत्तर देण्याची क्षमता विकसित करणे, हेच राष्ट्रीय सुरक्षेचे महत्त्वाचे सूत्र आहे.
विशेष म्हणजे, भारताने दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोन केवळ प्रत्यक्ष हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यापुरता मर्यादित ठेवलेला नाही. दहशतवादी कारवायांच्या मुळाशी असलेल्या आर्थिक, वैचारिक आणि आंतरराष्ट्रीय जाळ्यांवरही लक्ष केंद्रित केले आहे. पाकिस्तानी गँगस्टर शाहजाद भट्टीचे, राष्ट्रीय तपास यंत्रणेने उघडकीस आणलेले प्रकरण याच दृष्टीने महत्त्वाचे आहे. समाजमाध्यमांद्वारे भारतीय तरुणांशी संपर्क साधणे, त्यांचे ऑनलाइन सत्रांतून ब्रेनवॉश करणे, पैशांचे आमिष दाखविणे आणि त्यांना देशविघातक कारवायांसाठी प्रवृत्त करणे, अशा प्रकारचे जाळे उभारण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासातून समोर आले आहे. या प्रकरणात उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाने केलेली कारवाई आणि त्यानंतर एनआयएने हाती घेतलेला तपास हे देशातील तपास यंत्रणांच्या सजगतेचे निदर्शक आहे. पाकिस्तानस्थित या नेटवर्कवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करून त्याला दहशतवादी संघटना घोषित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णयही महत्त्वाचा आहे.
दहशतवाद्यांनी युद्धभूमी बदलली असली तरी भारतानेही आपल्या प्रतिकाराची साधने बदलली आहेत. सांप्रत दहशतवादविरोधी लढाईत सायबर तज्ज्ञ, डिजिटल फॉरेन्सिक यंत्रणा, आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणाऱ्या संस्था आणि आंतरराष्ट्रीय गुप्तचर सहकार्य यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. समाजमाध्यमांवरील संशयास्पद संपर्क, बनावट डिजिटल खाती, आर्थिक व्यवहार आणि परदेशातून चालविल्या जाणाऱ्या कारवायांचा मागोवा घेण्याची क्षमता भारतीय तपास यंत्रणांनी विकसित केली आहे. एखाद्या दहशतवादी कारवाईनंतर संशयितांचा शोध घेण्याबरोबरच ती घडवून आणणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचणे आणि भविष्यातील संभाव्य कारवाया आधीच निष्प्रभ करणे, हा आधुनिक सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग बनला आहे. या दृष्टीने एनआयए, एटीएस आणि विविध केंद्रीय तपास यंत्रणांमधील समन्वय देशाच्या सुरक्षेला अधिक बळ देणारा आहे.
तथापि, सुरक्षा यंत्रणांची सज्जता जितकी आवश्यक आहे, तितकीच समाजाची जागरूकताही महत्त्वाची आहे.
दहशतवादी संघटना तरुणांच्या भावनांचा, आर्थिक अडचणींचा आणि धार्मिक संवेदनशीलतेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तरुणांना डिजिटल साक्षरतेचे महत्त्व समजावून सांगणे, अफवा आणि अपप्रचारापासून सावध करणे, तसेच समाजमाध्यमांवरील माहितीची सत्यता तपासण्याची सवय लावणे गरजेचे आहे. दहशतवादाचा मुकाबला करताना सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण भारताची खरी ताकद केवळ त्याच्या शस्त्रसज्जतेत नसून विविधतेतून निर्माण झालेल्या एकात्मतेतही आहे. दहशतवाद्यांचे उद्दिष्ट समाजात फूट पाडणे असेल, तर त्याला एकजुटीने उत्तर देणे ही प्रत्येक नागरिकाची राष्ट्रीय जबाबदारी आहे. दहशतवादाचे डाव कितीही बदलले, त्याची साधने कितीही आधुनिक झाली आणि त्यामागील कारस्थाने कितीही गुंतागुंतीची बनली, तरी भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वभौमत्व यांच्याशी तडजोड होऊ शकत नाही. शत्रू कितीही कुटिल कारस्थान करीत असो, आव्हाने कितीही मोठी असो, पण आधुनिक तंत्रज्ञान, सक्षम यंत्रणा, जागरूक समाज आणि कणखर राष्ट्रीय इच्छाशक्ती यांच्या बळावर भारत आपल्या सुरक्षेचे कवच अधिक अभेद्य करण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे आणि हीच कणखर भारताची खरी ओळखही आहे!
Read About : Bank Liability in Digital Arrest Scams : उपकार नव्हे, जबाबदारी!
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.