खरीप – रब्बी मिळून ४१ टक्के कर्जवाटप
जालना Jalna Crop Loan Disbursement: जिल्हा प्रशासनाकडून बॅँकर्सच्या वारंवार बैठका घेवून, पाठपुरावा केल्यानंतर बॅँकांनी पिककर्ज वाटपाला गती दिली आहे. मात्र तरीही बॅँका खरीप व रब्बी हंगामासाठी एकुण १८२० कोटींच्या उद्दीष्टांपासून अजूनही बरेच लांबच आहे. त्यात खरीपाचे उद्दीष्ट १३०३ कोटी तर रब्बीचे उद्दीष्ट ५१६.९३ कोटी रूपये एवढे आहे. याच्या तुलनेत खरीपात पिककर्ज वाटपाची टक्केवारी ३९.९३ टक्के तर रब्बीतील पिककर्ज वाटपाची टक्केवारी ४३.३७ टक्के एवढी आहे. या आकडेवारीवरून बॅँकांनी किमान ५० टक्के देखील उद्दीष्ट पूर्ण केले नाही. तथापि, कर्जमाफीमुळे कर्जवाटपाचा आकडा घसरल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून कार्यवाही सुरू केलेली आहे. याशिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे दिवाळीची ५ हजाराची अग्रीम रक्कमही जमा करण्यात आली आहे. यामुळे बॅँकांची पिककर्ज वाटपाची कार्यवाही काहीशी संथ झाल्याचे चित्र आहे. १६ नोव्हेंबरच्या अहवालात दोन्ही हंगामासाठी जिल्ह्यातील ८८ हजार ५२९ शेतकऱ्यांना ७४४ कोटी ५५ लाख रूपयांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे. त्याची टक्केवारी ४०.९१ टक्के एवढी आहे. यामध्ये खरीप हंगामात ७९ हजार २६२ शेतकऱ्यांना ५२० कोटी ३४ लाखांचे पिककर्ज वाटप करण्यात आले तर रब्बी हंगामात ९ हजार २६७ शेतकऱ्यांना २२४ कोटी २१ लाखांचे पिककर्ज वाटप करण्यात आले आहे.
दरम्यान, कर्जवाटपाची प्रक्रिया अजूनही सुरूच असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यावर्षी जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ६५ टक्के पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्यामुळे बि, बियाणे, खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना बॅँकांच्या भरवशावर रहावे लागले. परंतू शासनाने कर्जमाफी व दिवाळी अग्रीम दिल्याने बॅँकांनी पिककर्ज वाटपाकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई – केवायसी तसेच फार्मर आयडी केलेली नसल्याने त्यांना पिककर्ज वाटपात अडचणी येत आहे.
शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी
याशिवाय शासनाकडून आलेले पीएम किसान व अन्य अनुदानही अजून खात्यात जमा झाले नसल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे पैसा राहिला नसल्याने सर्व दारोमदार पिककर्जावरच अवलंबून होती. जिल्ह्याला १३०३ कोटींचे खरीपाचे तर ५१६.९३ कोटींचे रबीचे उद्दीष्ट आहे.
सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरू असल्याने पिककर्ज लवकरात लवकर वाटप करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही अनुदानातून थकीत कर्जाची रक्कम कपात करण्यासही प्र्रशासनाने बॅँकांना मनाई केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खेळता रहावा, त्यांना खते, बि बियाणे खरेदी करता यावे म्हणून शेतकऱ्यांना पिकविमा किंवा पिककर्जासाठी अडवणूक केली जावू नये, असे आदेशच आहे.
Read About : Why Glue Does Not Stick to Bottle – डिंक स्वतःच्याच बाटलीला का चिकटत नाही? जाणून घ्या यामागचे रंजक विज्ञान
E-Paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.