Advertisement Advertisement

Jayakwadi Ramsar रामसर प्रस्ताव अखेर राज्य शासनाकडे सादर

Jayakwadi Ramsar Proposal Finally Submitted छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची शान आणि देश-विदेशातील पक्ष्यांचे माहेरघर असलेले पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि पाणथळ परिसरास आंतरराष्ट्रीय रामसर दर्जा मिळावा यासाठी वन्यजीव प्रशासनाकडून सुधारित प्रस्ताव बोरीवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. नंतर तो परिपूर्ण करून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) कार्यालयाकडे पाठविण्यात आला. आता येथूनही हा प्रस्ताव अंतिम झाला असून तो राज्य शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रवीकिरण गोवेकर यांनी दिली.

रामसरसाठी असलेल्या एकूण आठ निकषांपैकी पाच निकष या अभयारण्याने पूर्ण केले आहेत. दरम्यान राज्य शासनाने प्रकल्पाच्या ३४१.०५ चौ.किमी. क्षेत्रफळाच्या बुडीत क्षेत्राला जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून अधिसूचीत केले आहे. २०१८ मध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून पाणपक्षी संवर्धनासाठी प्राधान्य देण्यात आलेल्या पाणथळांत जायकवाडीचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच २०१७ मध्ये केंद्र सरकारकडून इको सेन्सेटिव्ह झोनची अधिसूचना जारी करण्यात आली. वेटलॅण्ड्स ऑफ इंटरनॅशनल सिग्निफिकन्स (आंतरराष्ट्रीय महत्वाचे पाणथळ) तसेच देशातील महत्वाच्या जलाशयांत जायकवाडीचा समावेश झालेला आहे.

या अभयारण्य आणि पाणथळ परिसरात २५०पेक्षा अधिक प्रजातींचे पक्षी आढळतात. तिबेट, मध्य आशिया, मंगोलिया, सैबेरिया, दक्षिण रशिया, पूर्व युरोप, उत्तर आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशियातून येणारे पक्षी येथील पाणथळाची समृद्धता स्पष्ट करतात. अभयारण्याचा परिघ/बाहेरील सीमा ४५० किमी. इतकी आहे. तर संपूर्ण परिसर ३३९७९ हेक्टरमध्ये पसरलेला आहे.

१७ एप्रिल २०२६ रोजी जायकवाडी पक्षी अभयारण्याचा आंतरराष्ट्रीय रामसर दर्जाचा सुधारित प्रस्ताव स्थानिक वन्यजीव प्रशासनाकडून बोरीवली येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाकडे पाठविला होता. येथून तो नागपूर आणि आता शासनाकडे सादर करण्यात आला आहे. तथापि, राज्याकडून तो केंद्र शासनाकडे कधी रवाना होतो याकडे पर्यावरणवादी आणि अभ्यासकांचे लक्ष लागून आहे.

गस्ती पथकाला बळकटीची गरज

जायकवाडी अभयारण्याच्या संरक्षणसाठी वनविभागाचे पथक सतत गस्तीवर असते. पण या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक साहित्य आणि साधने पुरेशी नाहीत. यात अत्याधुनिक फोटोग्राफी कॅमेरे, दुर्बीण, बर्ड रेस्क्यू कीट, लाईफ जॅकेट, अंडरवॉटर कॅमेरे, सेंसर केज, फ्लोटींग कॅमेऱ्यांचा समावेश आहे. शिवाय गस्तीसाठी खोल पाण्यात जाण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बोटीही उपलब्ध नाहीत. कर्मचाऱ्यांना आवश्यक सामग्रीसह तांत्रिक प्रशिक्षण देत गस्तीला बळकटी देण्याची गरज व्यक्त होत आहे.