Ad Advertisement Ad Advertisement

Legal Mystery : सत्यप्रकाश भुताच्या फिर्यादीवरून खटला!

Legal Mystery : उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा संभाळून योगी आदित्यनाथ यांनी सुसाट राज्यकारभार सुरू करण्याच्या तीन वर्षे आधी चक्क एका भुताच्या फिर्यादीवरून एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींविरुद्ध फौजदारी खटला दाखल करण्याची थक्क करणारी कर्तबगारी बाजावून तेथील पोलिसांनी त्या राज्याची कुप्रसिद्धी नव्या शिखरावर नेली होती. परंतु, अलाहाबाद उच्च न्यायालयाने हा अविश्वसनीय खटला रद्द केला.

एवढेच नव्हे तर मुळात हयातच नसलेल्या व्यक्तीची फिर्याद नोंदवून आणि नंतर तिचा जबाबही नोंदवून त्या आधारे न्यायालयात आरोपपत्रही दाखल करणाऱ्या किमयागार तपासी अधिकाऱ्याची चौकशी करण्याचा आदेश त्यानंतर १० वर्षांनी देऊन राज्याच्या कायदा व न्याय व्यवस्थेची उरलीसुरली लाज राखली होती. या सर्व कपोलकल्पित वाटाव्या अशा अजब घटनाक्रमाची सत्यकथा आज मी सांगणार आहे.

कुशीनगर जिल्ह्यातील कोतवाली हाटा पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये सत्यप्रकाश या व्यक्तीने त्याच गावातील पुरुषोत्तम सिंग यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पाच जणांविरुद्ध जमिनीच्या वादातून दाखल केलेल्या फौजदारी फिर्यादीने हे भूत आख्यान सुरू झाले आणि पुढे उत्तरोत्तर ते रंगत गेले. कोतवाली हाटा हे गावातील प्रत्येकजण दुसऱ्याला ओळखत असणारे गंगेच्या काठावरील गाव. गावातील पोलिसही प्रत्येकाला ओळखत असणार हेही उघड आहे. अशा या आपसी ओळखीच्या माहोलमध्ये सत्यप्रकाशला ओळखणाऱ्या पोलिसाने त्याला समोर बसवून त्याची ही फिर्याद नोंदवून घेतली असणार हेही ओघाने आलेच.

अशा या फिर्यादीवरून सिंग व इतरांविरुद्ध भादंवि कलम ४१९, ४२०, ४६७, ४६८ आणि ४७१ अन्यये रीतसर एफआयआर नोंदवून तपास केला गेला. तपास पूर्ण झाल्यावर पोलिसांकडून सिंग यांच्यासह पाच आरोपींविरुद्ध आरोपपत्रही दाखल केले गेले. त्यात फिर्यादी सत्यप्रकाश यांचा तपासात नोंदविलेला जबाबही होता. शिवाय हा जबाब सत्यप्रकाशने पोलीसांना स्वत: येऊन दिला, असा जबाब लिहून घेणाऱ्या पोलिसाच्या सही-शिक्क्यानिशी हाती लिहिलेला शेराही त्यावर होता.

हा खटला रद्द केला जावा यासाठी सिंग व इतर आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका केली आणि या कथानाकाचे गूढ आणखी वाढले. मुळात ज्या सत्यप्रकाश यांच्या फिर्यादीवरून हा खटला केला गेला, ते फिर्याद दाखल केली गेल्याच्या कथित तारखेस हयातच नव्हते, असा मुद्दा याचिकाकर्त्या आरोपींच्या वकिलाने मांडला. त्याची शहानिशा करण्यासाठी न्या. सौरभ श्याम श्रेय यांनी कुशीनगरच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितले. दंडाधिकाऱ्यांनी सत्यप्रकाश यांच्या विधवा पत्नीचा जबाब घेतला व सत्यप्रकाश यांच्या मृत्यूचा दाखलाही तपासला. कोतवाली हाटी पोलीस ठाण्यात सत्यप्रकाश यांच्या नावे ही फिर्याद नोंदविली जाण्याच्या तीन वर्षांपूर्वीच या सत्यप्रकाश यांचे निधन झाले होते, असे या चौकशीतून निष्पन्न झाले!

अर्थात, सिंग व इतरांविरुद्धची फिर्याद व त्यावरून उभा राहिलेला खटला पूर्णत: बनावट असल्याचे सिद्ध झाल्याने उच्च न्यायालयाने तो रद्द केला. तसेच अशा प्रकारे हयात नसलेल्या व्यक्तीच्या म्हणजेच भुताच्या नावे फिर्याद नोंदविणे व त्यावरून खटलाही दाखल करण्याच्या पोलिसांच्या या मती गुंग करणाऱ्या तत्परतेने निष्पाप नागरिकांना नाहक त्रास होतो, याची गंभीर दखल घेत न्यायालयाने संबंधितांच्या चौकशीचा आदेश दिला.

या फिर्यादीच्या तपासात पोलिसांनी आरोपींचाही जबाब नोंदविला असणार, त्यामुळे आपल्याविरुद्ध फिर्याद करणारा हा कथित फिर्यादी सत्यप्रकाश हयात नाही हे आरोपींनी उच्च न्यायालयात सांगण्याआधी पोलिसांना का सांगितले नाही? त्यांनी तसे सांगितले असेल तरी पोलिसांनी हयात नसलेल्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून आरोपपत्र दाखल करण्यापर्यंतची मजल कशी मारली? आरोपपत्र दाखल करताना पोलिसांनी आरोपींना दंडाधिकारी न्यायालयात हजर केले तेव्हा त्यांनी तेथेही याची वाच्यता का केली नाही? केली असेल तर ते न्यायालयही गप्प का राहिले? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत.

या प्रकरणातील आणखी धक्कादायक प्रकार म्हणजे, हयात नसलेल्या सत्यप्रकाश यांच्या वतीने विमल कुमार पांडे नावाच्या वकिलाने वकीलपत्रही दाखल केले होते. त्या वकीलपत्रावर सत्यप्रकाश यांच्या विधवा पत्नी ममता देवी यांनी स्वाक्षरी केली होती. असे मृत व्यक्तीचे वकीलपत्र त्या मृताच्या पत्नीच्या सहीने सादर करून या बनावट खटलेबाजीत सामील झालेल्या या वकिलावर अद्दल घडेल अशी सज्जड कारवाई करण्याऐवजी उच्च न्यायालयाने त्यास यापुढे सावधगिरी बाळगण्याची फक्त समज देऊन दया दाखवली, हेही लक्षणीय आहे. तपासी अधिकाऱ्याविरुद्धच्या चौकशीच्या आदेशाचे पुढे काय झाले? त्या चौकशीतून या भुताच्या फिर्यादीचे गूढ उकलले का याविषयी पुढे काही कळले नाही. उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रातही त्याविषयची बातमी वाचनात आली नाही. ते कळेपर्यंत आपण ‘उत्तर प्रदेश है तो कुछ भी मुमकीन है’, असे म्हणून वाट पाहायची!

अजित गोगटे

Read About : Chhattisgarh Tribal Dance : नृत्यातून निवडला जातो जीवनसाथी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.