Ad Advertisement Ad Advertisement

Flydubai Pilot Incident : आकाशातल्या विश्वासाची गोष्ट

Flydubai Pilot Incident : रस्त्यावर गाडी चालवत असताना काही बिघडले तर चालक गाडी बाजूला घेऊ शकतो. रेल्वेत आपत्कालीन व्यवस्था असते. जहाजातही काही पर्याय उपलब्ध असतात. पण, विमान एकदा आकाशात गेले की प्रवासी पूर्णपणे कॉकपिटमधील वैमानिकांवर अवलंबून असतो. विश्वास ही अपरिहार्यताही असते.

परवा फ्लाय दुबईच्या विमानात जे काही आक्रित घडले, त्याचा परिणाम काय झाला असता याची कल्पनाही करता येत नाही. या विमानाचा भारतीय वैमानिक स्मित मच्छार आणि ओमानचा सहवैमानिक यांच्यात झटापट झाली. कारण कळले नाही, पण सहवैमानिकाने स्मितवर चाकूने हल्ला केला आणि त्यात स्मित जखमी झाला. या झटापटीत ३५ हजार फूट उंचीवरून उडत असलेले विमान थेट १७ हजार फुटांपर्यंत खाली आले. विमान खाली कोसळत असल्याची प्रवाशांची भावना झाली. तिकडे कॉकपिटमध्ये झटापट सुरू होती. स्मित मच्छार गंभीर जखमी झाला होता, तरीही त्याने हिंमत करून कॉकपिट उघडले आणि मग जे काही घडले ते साऱ्या जगाच्या पुढे आहे. १८० प्रवाशांचा जीव वाचला. त्यात स्मितचे शौर्य, त्या विमानातील काहींनी दाखविलेले प्रसंगावधान या साऱ्यांचे योगदान आहे. मात्र, स्मितने जखमी स्थितीत दाखविलेले शौर्य अकल्पनीय आणि त्यामुळेच कौतुकास्पद म्हणावे लागेल.

मी जगाच्या कानाकोपऱ्यात प्रवास केला आहे. अक्षरश: लाखो किलोमीटर्स. विमानात चढताना कोणत्याही प्रवाशाला कॉकपिटमध्ये बसलेले वैमानिक दिसत नाहीत. परंतु, त्यांच्यावर प्रवाशांचा विश्वास असतो. वैमानिक आणि सहवैमानिकांचा तर एकमेकांवर जिवापाड विश्वास असतो. कारण विमानाला काही धोका झाला तर दोघांनाही धोका असतो. विमानात बसताना प्रवासी वैमानिकाला पाहत नसतात. त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांच्या मनात काय चालले आहे, त्याने आदल्या रात्री किती झोप घेतली आहे, त्याच्या आयुष्यात काही अस्वस्थ करणारे घडले आहे का? यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर प्रवाशाला माहीत नसते. तरीही तो विमानात बसतो, सीट बेल्ट लावतो, इंजिनांचा आवाज ऐकतो आणि विमान आकाशात झेपावते तेव्हा स्वत:ला पूर्णपणे त्या दोन अज्ञात माणसांच्या हाती सोपवतो. त्या दोन माणसांपैकी एक म्हणजे कॅप्टन आणि दुसरा सहवैमानिक. हा विश्वास इतका सहज आणि सरावाचा असतो की त्याचे महत्त्व आपल्याला जाणवतही नाही. फ्लाय दुबईच्या विमानात घडलेल्या घटनेने मात्र या विश्वासावरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. हा प्रश्न केवळ फ्लाय दुबईचा नाही. केवळ विमान वाहतुकीचाही नाही. हा आधुनिक व्यवस्थेतील विश्वासाचा प्रश्न आहे.

विमान वाहतूक तर मुळातच विश्वासावर चालत असते. आपण विमान कंपनीवर विश्वास ठेवतो. देखभाल करणाऱ्या अभियंत्यांवर विश्वास ठेवतो. एअर ट्रॅफिक कंट्रोलवर विश्वास ठेवतो. सुरक्षा यंत्रणेवर विश्वास ठेवतो आणि सर्वांत शेवटी वैमानिकांवर विश्वास ठेवतो. विमानात बसलेल्या माणसाकडे पर्याय नसतो. रस्त्यावर गाडी चालवत असताना काही बिघडले तर चालक गाडी बाजूला घेऊ शकतो. रेल्वेत आपत्कालीन व्यवस्था असते. जहाजातही काही पर्याय उपलब्ध असतात. पण, विमान एकदा आकाशात गेले की प्रवासी पूर्णपणे कॉकपिटमधील वैमानिकांवर अवलंबून असतो. विश्वास ही अपरिहार्यताही असते.

कॉकपिटमधील कॅप्टन आणि सहवैमानिक यांचे नाते बाहेरून पाहताना साधे वाटते. एक कॅप्टन, दुसरा फर्स्ट ऑफिसर. पण, कॉकपिटमध्ये या नात्याचा खरा अर्थ वेगळा असतो. दोघे मिळून विमानाचे संचालन करतात. एकमेकांच्या निर्णयांची पडताळणी करतात. उपकरणांवर लक्ष ठेवतात. हवामानाचा अभ्यास करतात. एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधतात. आपत्कालीन परिस्थितीत एकमेकांना मदत करतात. कॅप्टनने चूक केली तर सहवैमानिकाने ती दाखवून द्यावी. वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे त्याचे प्रत्येक म्हणणे बरोबर असेल असे गृहीत धरू नये. कॉकपिटमध्ये अधिकारापेक्षा सुरक्षितता मोठी असावी. विमान वाहतुकीच्या क्षेत्रात हा धडा मोठ्या अनुभवातून आलेला आहे. एकेकाळी कॉकपिटमध्ये कॅप्टनचा अधिकार जवळजवळ अंतिम मानला जात असे. अनेक दुर्घटनांच्या अभ्यासातून मात्र लक्षात आले की, काही प्रसंगी कनिष्ठ सदस्याला परिस्थितीतील धोका जाणवत होता; पण वरिष्ठाला विरोध करण्याची मानसिकता नसल्यामुळे तो ठामपणे बोलला नाही. त्यातून कॉकपिट संस्कृती बदलली.

आज सहवैमानिक हा केवळ कॅप्टनचा सहाय्यक नसतो. तो विमानाच्या सुरक्षा व्यवस्थेतील सक्रिय घटक आहे. पण, फ्लाय दुबईची घटना या व्यवस्थेसमोर एक वेगळे आव्हान घेऊन उभी ठाकली आहे. ज्या व्यक्तीने तुमच्यासोबत विमान सुरक्षितपणे उडवायचे आहे, तीच व्यक्ती विमान धोक्यात घालण्याचा निर्णय घेत असेल तर..? याचे उत्तर कोणत्याही प्रशिक्षण पुस्तिकेत सहज मिळणार नाही. आजकालची विमाने अत्यंत प्रगत आहेत. अनेक प्रणाली संभाव्य धोके आधीच ओळखतात.

ओमानचा सहवैमानिक तसे वागला, त्यामुळे सारेच सहवैमानिक तसे वागतील असा निष्कर्ष काढण्याची आवश्यकता नाही. सहवैमानिकाचा हेतू काय होता हे तपासातून स्पष्ट झाले पाहिजे. पुढच्या वेळी अशी घटना घडण्याची शक्यता आणखी कमी कशी करता येईल या दृष्टीने तपास करावा लागेल. वैमानिकांची निवड स्क्रूटिनीच्या माध्यमातून करता येईल का? नियमित मूल्यमापन अधिक परिणामकारक करता येईल का? कॉकपिटमध्ये संकट निर्माण झाल्यास बाहेरून हस्तक्षेप करण्याच्या पद्धती आणखी सुरक्षित करता येतील का?… हे सारे प्रश्न तांत्रिक आहेत, पण त्यामागे एकच मूलभूत विचार आहे आणि तो म्हणजे विश्वासाला प्रणालीची साथ असली पाहिजे. यापुढे फक्त आमच्या ‘वैमानिकांवर विश्वास ठेवा’ एवढे पुरेसे ठरणार नाही. त्या विश्वासामागे कठोर निवड असली पाहिजे. आकाशात उडताना प्रवाशांच्या मनात असलेल्या विश्वासाला तडा जाऊ न देणे आणि तडा गेला तरी शेकडो जीव वाचवणारी व्यवस्था तयार ठेवणे, हीच आधुनिक विमान सुरक्षेची खरी कसोटी आहे.

डॉ. पिनाक दंदे
संपर्क : ९८२३०४५५३३

Read About : Vulture Parenting : पिल्लांच्या संगोपनासाठी विशेष काळजी घेणारा पक्षी
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.