महिलांच्या 33 टक्के आरक्षणामुळे देशाच्या राजकारणाचे समीकरण बदलणार
मुंबई : Lok Sabha Constituencies Delimitation – केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबरपासून लोकसभेचे तर, 2 डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज सुरू होईल. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) विधेयक मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मतांची जुळवाजुळव केली आहे. हे विधेयक मंजूर झाल्यावर लोकसभेच्या सुमारे 850 जागा होतील. तर, राज्यातील लोकसभेच्या जागांची संख्या 48वरून 72 होण्याची शक्यता आहे. तर, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या अनुषंगाने नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा लागू झाल्यावर महिलांना 33 टक्के आरक्षण दिले जाईल. यामुळे देशाच्या राजकारणाचे समीकरणच बदलेल.
देशाची लोकसंख्या काळानुरूप बदलत राहते. काही भागांतील लोकसंख्येत मोठी वाढ नोंदवली जाते तर, तर काही भागांमध्ये वाढीचा दर कमी असतो. हा समतोल दूर करण्यासाठी मतदारसंघ पुनर्रचना केली जाते. या बदलानुसार लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या सीमा आणि संख्या निश्चित करण्याची घटनात्मक प्रक्रिया म्हणजे, डिलिमिटेशन. विशेष म्हणजे, 1976 साली घटनादुरुस्ती करुन लोकसभेच्या मतदारसंघांचा संख्याविस्तार 2001पर्यंत थांबविण्यात आला होता. त्यानंतर, 2002 मध्ये पुन्हा घटनादुरुस्ती करून ही प्रक्रिया 2026 सालापर्यंत गोठवण्यात आली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडण्यात येत आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेची वाट न पाहता, 2011ची जनगणना किंवा सरकारने निश्चित केलेल्या आकडेवारीच्या आधारे ही पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव या विधेयकात मांडण्यात आला आहे.
अशा वाढतील लोकसभेच्या जागा
सध्या लोकसभेतील सदस्यसंखाय 543 आहे. प्रस्तावित विधेयक मंजूर झाल्यास लोकसभेतील सदस्यसंख्या 850पर्यंत जाऊ शकते. 50 टक्के जागावाढीच्या मॉडेलनुसार, उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या जागा 80 वरून 120, बिहारमधील 40 वरून 60, महाराष्ट्रातील 48 वरून 72, पश्चिम बंगालमधील 42 वरून 63 आणि तामिळनाडूतील 39 वरून सुमारे 59 पर्यंत वाढू शकतात. तथापि, मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या प्रक्रियेनंतर जागांची संख्या निश्चित केली जाईल.
नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा
महत्त्वाचे म्हणजे, या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार नारी शक्ती वंदन अधिनियम कायदा 2023 लागू होणार आहे. सप्टेंबर 2023 मध्ये संसदेने 106 वी घटनादुरुस्ती मंजूर करून ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे नाव देऊन कायदा करण्यात आला. त्यानुसार, लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 33 टक्के जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली. मात्र, ही आरक्षणव्यवस्था जनगणना आणि त्यानंतरच्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर लागू होणार आहे. . हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे लोकसभेत सरकारला बहुमतासाठी 360 संख्याबळाची आवश्यकता असणार आहे. संसदेतील एनडीएचे सध्याचे संख्याबळ 321 आहे. त्यामुळे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी मोदी सरकारने जुळवाजुळव सुरू केली आहे.
लोकसभेतील एनडीएचे संख्याबळ
सध्याचे संख्याबळ – 321
- भाजप : 241
- तेलुगू देसम पक्ष : 16
- शिवसेना (एकनाथ शिंदे) : 13
- जनता दल (युनायटेड) : 12
- लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) : 5
- जनता दल (धर्मनिरपेक्ष) : 2
- जनसेना पक्ष : 2
- राष्ट्रीय लोकदल : 2
- अपना दल (एस) : 1
- आसाम गण परिषद : 1
- एजेएसयू पक्ष : 1
- हिंदुस्तानी अवाम मोर्चा : 1
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) : 1
- सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा : 1
- यूपीपीएल : 1
- एनसीपीआय (तृणमूलमधून बाहेर पडलेले) : 20
- शिरोमणी अकाली दल : 1
मागील वेळी मदत करणारे एनडीएबाहेरील समर्थक
वायएसआर काँग्रेस – 4
अपक्ष – 1
आता काय होऊ शकते?
यावेळी देखील त्यांची साथ असल्यास संख्याबळ 326 पर्यंत पोहोचते. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने (8) पाठिंबा दिला आहे तर, द्रमुक (22), मिळण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास एनडीएचे संख्याबळ 356 होऊन हे विधेयक मंजूर करणे शक्य होईल.
Read About : चंद्रावरील मातीसारख्या मातीपासून ‘लेगो’ विटा – Moon Soil LEGO Bricks
E-paper : Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.