Ad Advertisement Ad Advertisement

London Experts Cancer Surgeries – लंडनच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घाटीत तीन मोठ्या शस्त्रक्रिया

थायरॉईडच्या दोन शस्त्रक्रियांसह कर्करोगग्रस्त जबड्याची पुनर्रचना

छत्रपती संभाजीनगर : London Experts Cancer Surgeries : शासकीय कर्करोग रुग्णालय अर्थात राज्य कर्करोग संस्थेच्या डोके व मान शस्त्रक्रिया विभागाच्या वतीने आयोजित दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शस्त्रक्रिया शिबिरात लंडन येथील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तीन जटिल शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. यामध्ये थायरॉईडच्या दोन शस्त्रक्रियांसह जबड्याच्या कर्करोगाने ग्रस्त एका रुग्णावर शस्त्रक्रिया करून प्लास्टिक सर्जरीच्या माध्यमातून जबड्याची पुनर्रचना करण्यात आली.

या आंतरराष्ट्रीय शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल्स एनएचएस ट्रस्ट, यूके येथील डॉ. जोनाथन ह्यूज, लंडन येथील विजेंद्र इंगळे, अरविंद गायकवाड, डॉ. दर्पण जक्कल, डॉ. किशोर सुलाने, डॉ. सुनील देशमुख, डॉ. अजय बोराळकर, डॉ. वसंत पवार, डॉ. प्रफुल्ल जटाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. शिवाजी सुक्रे यांनी घाटी रुग्णालय राज्यातील अग्रगण्य शासकीय रुग्णालय म्हणून पुढे येत असल्याचे सांगितले. घाटी प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या एकजुटीमुळे शासकीय कर्करोग रुग्णालयाने राष्ट्रीयस्तरावर ओळख निर्माण केली आहे. आगामी काळात स्वतंत्र रक्तपेढी आणि धर्मशाळा उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. अल्पदरात पेट-स्कॅनसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्याने सर्वसामान्य कर्करुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शिबिराच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.१७) तीन मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन हॉस्पिटल्स एनएचएस ट्रस्ट, यूके येथील प्राध्यापक डॉ. जोनाथन ह्यूज आणि रॉयल फ्री हॉस्पिटल, लंडन येथील डॉ. विजेंद्र इंगळे यांचे या शस्त्रक्रियांदरम्यान मार्गदर्शन लाभले. डोके व मान शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वसंत पवार, डॉ. प्रमोद धनजकर, डॉ. प्रीतम भगत, डॉ. सृजन गुप्ता, डॉ. गणेश बोरेवाड, डॉ. हनिफा यांनी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या. या तीन दिवशीय शिबिरात हेड ॲण्ड नेक सर्जरी विषयावर ११ व्याख्याने आयोजित करण्यात आली आहे. या शिबिरात शंभरहून अधिक कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या अनुभवातून निवासी डॉक्टरांना अत्याधुनिक शस्त्रक्रिया तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळण्यास मदत झाली.

Read About : National Epilepsy Day 2026 Awareness Treatment – अंधश्रध्दा सोडा, उपचारांचा मार्ग स्वीकारा
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.