१७ नोव्हेंबर अपस्मार दिन | अपस्माराबाबत आरोग्य विभागाची जनजागृती
छत्रपती संभाजीनगर : National Epilepsy Day 2026 Awareness Treatment – अपस्मार हा मेंदूशी संबंधित आजार असून, त्याबाबत समाजात असलेले गैरसमज आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय अपस्मार दिनानिमित्त आरोग्य विभागाकडून जनजागृती करण्यात येत आहे. अपस्मार हा संसर्गजन्य आजार नसून योग्य निदान, नियमित औषधोपचार आणि वैद्यकीय मार्गदर्शनामुळे बहुतांश रुग्णांच्या झटक्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. त्यामुळे रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना उपचारासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
अपस्मार हा मेंदूतील संदेशांच्या कार्यात असंतुलन निर्माण झाल्यामुळे होणारा आजार आहे. यामुळे रुग्णाला वारंवार झटके येऊ शकतात. मात्र, या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धा आहेत. योग्य उपचार घेतल्यास अपस्मार असलेल्या व्यक्तींनाही सामान्य आणि सक्रिय जीवन जगता येते. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या माध्यमातून असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत विविध आजारांची लवकर ओळख व निदान करण्यावर भर दिला जात आहे.
उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणीसह आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या जात असून, झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन आणि आवश्यकतेनुसार उच्चस्तरीय आरोग्य संस्थेत पाठविण्यात येते. अपस्मार असलेल्या व्यक्तींनाही शिक्षण, रोजगार आणि सामाजिक जीवनात समान संधी मिळणे आवश्यक आहे. त्यांच्याशी भेदभाव न करता सहानुभूतीने वागावे आणि त्यांना सामाजिक आधार द्यावा. अपस्माराबाबतचे गैरसमज दूर करून रुग्णांना योग्य उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमधील आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
झटका आल्यास काय करावे
अपस्माराचा झटका आल्यास रुग्णाला सुरक्षित ठिकाणी झोपवावे. शक्य असल्यास त्याला एका कुशीवर वळवावे आणि डोक्याखाली मऊ वस्तू ठेवावी. झटका किती वेळ सुरू आहे, याची नोंद ठेवावी. झटका पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ सुरू राहिल्यास, वारंवार झटके आल्यास किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. झटका सुरू असताना रुग्णाच्या तोंडात चमचा, बोट, पाणी किंवा अन्य कोणतीही वस्तू घालू नये. तसेच रुग्णाला जबरदस्तीने पकडून ठेवू नये. अपस्माराचे निदान झालेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित औषधे घ्यावीत. स्वत:हून औषधे बंद करणे किंवा औषधांचा डोस बदलणे टाळावे. नियमित उपचार आणि वैद्यकीय तपासणीमुळे झटक्यांवर नियंत्रण मिळवता येते.
Read About : Electropathy Practitioners Homeopathy Doctor Title Ban – इलेक्ट्रोपॅथी व्यावसायिकांना होमिओपॅथी डॉक्टरांचे पदनाम वापरण्यास मनाई – 2026
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.