ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक कोंडीवर विद्यानंद बापट यांची परखड भूमिका
छत्रपती संभाजीनगर: Public Festival Noise Pollution – सार्वजनिक उत्सव साजरे करण्यास विरोध नाही; मात्र उत्सवांच्या नावाखाली ध्वनिप्रदूषण करणे, रस्ते अडविणे आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण करणे योग्य नाही. कोणत्याही नागरिकाला सक्तीचा श्रोता बनवता येणार नाही. उत्सव साजरे करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे, तर इतरांच्या हक्कांचा आदर राखून आनंद साजरा करणे होय, अशी परखड भूमिका सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी मांडली.
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ४२ व्या पुण्यतिथीनिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र छत्रपती संभाजीनगर आणि एमजीएम विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन, कल्चर अँड मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘यशवंत स्मृती व्याख्यानात’ ते बोलत होते. ‘सार्वजनिक उत्सव आणि नागरी समस्या’ या विषयावर आईन्स्टाईन सभागृहात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या जिल्हा केंद्राचे अध्यक्ष तथा एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम होते. यावेळी कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, जिल्हा केंद्राचे सचिव नीलेश राऊत, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, ध्वनिप्रदूषणाने सर्व मर्यादा ओलांडल्या असून न्यायालयानेही याबाबत वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार महत्त्वाचा असला, तरी तो अमर्याद नाही. भारतीय संविधानाच्या कलम २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या अधीन आहे. ध्वनिवर्धकांच्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांच्या ऐकण्याच्या, वाचनाच्या, संवाद साधण्याच्या आणि शांततेत विश्रांती घेण्याच्या अधिकारावर गदा येते. त्यामुळे उत्सव साजरे करताना ध्वनीच्या मर्यादांचे पालन करणे गरजेचे आहे.
सार्वजनिक उत्सवांच्या काळात रस्ते आणि फुटपाथवर उभारण्यात येणारे मंडप तसेच मिरवणुकांमुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो. रस्ते हे नागरिकांच्या मुक्त संचारासाठी आहेत. उत्सवांमुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात अडथळे निर्माण होऊ नयेत. त्यासाठी मोठ्या मैदानांवर उत्सवांचे मंडप उभारावेत. मिरवणूक आणि विसर्जनासाठीही त्याच परिसरात स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना त्यांनी केली.
ध्वनिप्रदूषण आणि वाहतूक अडथळे हे केवळ व्यवस्थापनाचे प्रश्न नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत. त्यामुळे सार्वजनिक उत्सवांचे आयोजन करताना सर्व नागरिकांच्या सोयी, सुविधा आणि अधिकारांचा विचार झाला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुलपती अंकुशराव कदम यांनी बापट यांनी उपस्थित केलेल्या सार्वजनिक उत्सव, ध्वनिप्रदूषण आणि नागरी समस्यांशी संबंधित मुद्यांना महत्त्व असल्याचे सांगितले. नागरिक म्हणून या समस्या सोडविण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू, असे त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक नीलेश राऊत यांनी केले. सूत्रसंचालन एमजीएम विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत येरूळे यांनी केले, तर आभार अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांनी मानले.
Read About : Integrated Cancer Care Project – कर्करोगाचे निदान, उपचार आणि पाठपुरावा आता एकाच साखळीत, जिल्ह्यात 12 महिन्यांचा विशेष प्रकल्प
E-Paper: Punyanagari E-Paper


Comments
Comments will appear here.
Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.