Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Drought Ground Report – पंचनामे झाले, मदत कधी मिळणार? दुष्काळात शेतकऱ्यांसमोर संकटांचा डोंगर

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती; केंद्राचे पथक नुकसानीची पाहणी करत असताना शेतकऱ्यांचे आर्थिक मदतीकडे लक्ष

पुणे : Maharashtra Drought Ground Report परतीचा मान्सून बरसेल आणि जाता जाता का होईना पाऊस दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा देईल, अशी आशा राज्यातील जनतेला होती खरी परंतु परतीचा मान्सून काही बरसला नाही.त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात पीक नाही, विहिरीला पाणी नाही. दावणीच्या जनावरांची पोट खपाटीला गेली आहेत .बळीराजाचे डोळे पाणावले आहेत.दसरा-दिवाळी हे सण अवघ्या काही दिवसांवर आले आहे. पण यंदाची दिवाळी शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नाही, तर अंधाराची म्हणजे ‘काळी दिवाळी’ ठरणार आहे. आजच्या रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती नेमके काय आहे, सरकारने काय पावले उचलली आहेत आणि आपण समाज म्हणून काय करू शकतो.हा वृत्तांत शेवटपर्यंत वाचा..

यंदाचा मान्सून अत्यंत अपुरा ठरला आहे. राज्याने सरासरीच्या तुलनेत पावसाचा मोठा तुटवडा अनुभवला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी तब्बल २६५ तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा सुमारे ७५% भाग दुष्काळाच्या होरपळीत अडकला आहे.मराठवाडा आणि विदर्भाची स्थिती तर अत्यंत बिकट आहे. सुमारे १ कोटी ४९ लाख हेक्टरवरील खरीप पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. सोयाबीन, कापूस आणि मका यांसारखी हाती आलेली पिके डोळ्यांसमोर जळून खाक झाली. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आता प्रश्न उभा राहतो की शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार? यावर प्रशासन म्हणते, पंचनामे पूर्ण झाल्याशिवाय मदत मिळणार नाही. त्यासाठी पंचनाम्यांची स्थिती काय ते समजून घेऊ

सरकारने २६५ दुष्काळी तालुक्यांमध्ये १००% पीक पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पिक नुकसानीचे पंचनामे अंतिम टप्प्यात आले आहेत. अतिरिक्त १९ तालुक्यांमध्येही विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले.
जिथे पंचनामे झाले तिथे शेतकऱ्यांच्या तोंडी एकच प्रश्न आहे.नुकसान भरपाई कधी मिळणार?: नियमानुसार, केंद्रीय पथकाचा अहवाल आणि राज्य शासनाचा अंतिम डेटा जमा झाल्यानंतर साधारण ३ ते ४ आठवड्यांत एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा केली जाते.

सध्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ११ सदस्यांचे केंद्रीय पथक महाराष्ट्रात आले आहे. हे पथक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीचा अंदाज घेत आहे. त्यांच्या अहवालानंतर केंद्र सरकारकडून आपत्ती व्यवस्थापन निधीतून मोठी मदत मिळण्याची अपेक्षा आहे.राज्य सरकारचा मदतीचा प्लॅन काय आहे?


शासनाने तात्काळ काही महत्त्वाच्या सवलती लागू केल्या आहेत:

१. दुष्काळी भागात जमीन महसुलात पूर्ण सूट देण्यात आली आहे.
२. शेतकऱ्यांच्या शेती कर्जाचे पुनर्गठन केले जाईल आणि कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे.
३. शेती पंपांच्या चालू वीजबिलात सवलत देण्यात आली आहे.
४. तसेच, पिण्याच्या पाण्याची टंचाई पाहता नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना पाणी कपात व पाणी व्यवस्थापनाचे कडक नियम पाळण्याचे आदेश दिले आहेत.
५. दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
पण या सवलती किंवा माफी पुरेशी नाही.


मित्रांनो, या दुष्काळात केवळ शेतीचेच नुकसान झाले नाही, तर शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण टांगणीला लागले आहे. म्हणून सरकारने दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजसाठी मोफत एसटी पास आणि हॉस्टेलच्या जेवणाचा खर्च देखील दिला पाहिजे, जेणेकरून पैशांअभावी कोणत्याही शेतकऱ्याच्या मुलाचे शिक्षण सुटणार नाही!”भारत हा असा देश आहे, अडचणीच्या काळात तो प्रत्येक भारतीयाच्या मागे उभा राहतो. या तत्त्वानुसार ज्या राज्यांमध्ये पाण्याची उपलब्धता चांगली आहे, ती राज्ये रेल्वेच्या माध्यमातून (वॉटर एक्सप्रेस) दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये पिण्याचे पाणी पाठवू शकतात. या आधीच्या दुष्काळात राजस्थान-मध्य प्रदेशातून महाराष्ट्रातील लातूरसाठी रेल्वेद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. हा वॉटर एक्सप्रेस पॅटर्न पुन्हा राबवता येऊ शकतो.
राज्यातील पशुधनाला वाचवण्यासाठी शेजारील राज्ये आपल्याकडील अतिरिक्त कोरडा व ओला चारा मोफत किंवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देऊ शकतात. यासाठी आपल्या सरकारने शेजारील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संवाद साधून तात्काळ मदत मागणे गरजेचे आहे.
दुष्काळाशी लढताना केवळ तात्पुरती मदत पुरेशी नसते, तर कायमस्वरूपी उपाय शोधावे लागतात. याआधी भारतातील काही राज्यांनी दुष्काळाचे आदर्श हाताळणी केले आहे. कशी ती समजून..

१. राजस्थानचा ‘वॉटर फॉर ऑल पॅटर्न’: राजस्थानाने अत्यंत कमी पावसातही उपलब्ध पाण्याचे ऑडिट करून त्याचे गरजेनुसार वाटप केले. जेणेकरून पाण्यावाचून माणसं आणि जनावर मरणार नाही.
२. कर्नाटकची डिजिटल मॉनिटरिंग: कर्नाटकाने तंत्रज्ञानाचा वापर करून दुष्काळी भागात वेळेत चारा छावण्या आणि पाण्याची सोय केली.
हे लक्षात घेऊन दुष्काळ हाताळणीसाठी जे सामान्य माणसाच्या भल्याचं त्याचं अनुसरण आपल्या शासन व प्रशासनाने करणे गरजेचे आहे. तरच दुष्काळाच्या झळा काहीशा कमी होऊ शकतील.
मी आधी सांगितलं तसं दसरा आणि दिवाळी हे सण येत आहे. आपण सण नक्की साजरा करूया, पण एक भान ठेवून. आपल्या अन्नाचा प्रत्येक घास ज्याच्या घामातून येतो, तो शेतकरी आज रडतोय. यंदाच्या दिवाळीत आपण स्वतःहून काही सामाजिक योगदान देऊ शकतो:

  • शहरात राहणाऱ्या नागरिकांनी सणांवरील अवाजवी खर्च टाळावा.
  • तो पैसा वाचवून थेट आत्महत्याग्रस्त किंवा दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करावी.
  • सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दुष्काळी भागातील जनावरांच्या छावण्यांसाठी चारा आणि पाणी पुरवण्यास मदत करा.
  • सर्वात महत्त्वाचे: शेतकऱ्याला एकटे पाडू नका. त्यांना धीर द्या की, “तुम्ही खचू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे!”
    मित्रांनो..शेवटी एकच सांगावेसे वाटते… दुष्काळ फक्त जमिनीला पडत नाही, तो माणसाच्या धैर्याची परीक्षा घेतो. अशा कठीण काळात पिकांचे नुकसान भरून काढता येईल, पण गेलेला माणूस परत आणता येत नाही. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येऊ नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.दुष्काळात निसर्गाने जरी पाठ फिरवली असली, तरी माणसाने माणसाचे ‘माणूसपण’ सोडता कामा नये. आपल्याकडे संपत्ती किती आहे यापेक्षा आपल्याकडे ‘हृदय’ किती मोठे आहे, हे दाखवण्याची हीच वेळ आहे. चला, या दिवाळीत एखाद्या शेतकरी बांधवाच्या घरात मदतीचा दिवा लावूया आणि त्याचे आयुष्य प्रकाशमान करूया.

Read About : Shani Amavasya 2026 – शनिदेव शत्रू की मित्र? शनि अमावस्येचे महत्त्व, पूजा आणि प्रमुख मंदिरे
E-Paper: Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.