Ad Advertisement Ad Advertisement

Maharashtra Legislative Session – दादर रेल्वेस्थानकाच्या ‘चैत्यभूमी’ नामकरणाची प्रक्रिया अधिवेशनात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई : Maharashtra Legislative Session – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांसाठी विविध सुविधा, सुरक्षा, वाहतूक, आरोग्य आणि स्वच्छतेच्या व्यवस्थांचे काटेकोर व समन्वित नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्यास राज्य शासनाने यापूर्वीच तत्वतः मान्यता दिली आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधानमंडळाच्या समितीशी संबंधित आवश्यक प्रक्रियेची पूर्तता विधिमंडळ अधिवेशनात करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथील तयारीचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आढावा घेण्यात आला. विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात आयोजित बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर यांच्यासह विविध विभागांचे सचिव, वरिष्ठ पोलीस अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका आणि भारतीय बौद्ध महासभा, अखिल भारतीय बौध्द भिख्खू संघ, आदी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक

महापरिनिर्वाण दिनाच्या आयोजनात समन्वय समिती, बौद्ध संघटना आणि विविध संस्थांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्थांची जबाबदारी पार पाडण्यात येत असली तरी या उपक्रमाच्या प्रभावी आयोजनासाठी सर्व संबंधित घटकांचा समन्वय आवश्यक आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, प्रशासकीय विभाग तसेच अन्य संबंधित यंत्रणा नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहेत. यंदाही प्रत्येक विभागाने सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडाव्यात.

महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या अनुयायांना त्रास होऊ नये, यासाठी तसेच कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी चैत्यभूमी परिसरात धरणे, निदर्शने, मोर्चे अथवा आंदोलनांना अधिकृतपणे बंदी जाहीर करण्याबाबत गृह विभागाने कार्यवाही करावी. तसेच, रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलीस यंत्रणांनी एकत्रितपणे नियोजन करून अनुयायांचा प्रवास सुलभ करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.

सर्व पुतळ्यांची स्वच्छता

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. या निर्णयाच्या अंमलबजावणीत कुठे अडचण आहे, याची तपासणी करून पुढील पाच ते सात दिवसांत आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

स्मारकासाठी वाढीव निधी कमी पडू देणार नाही

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. स्मारकाचे बहुतांश काम पूर्ण झाले असून, मुख्य पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासंदर्भात काही बाबी प्रलंबित आहेत. कामाच्या खर्चात वाढ झाली तरी त्याची भरपाई करण्यास शासन तयार असून उर्वरित काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टोल सवलत देण्याचा विचार – उपमुख्यमंत्री शिंदे

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो अनुयायांना सुविधा देण्यासाठी शासन पूर्णपणे तयारी करत आहे. मुंबई महानगरपालिका, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर विकास विभाग आणि अन्य संबंधित विभागांनी एकत्रितपणे केलेल्या नियोजनातून दरवर्षी व्यवस्थांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. समन्वय समिती आणि विविध संघटनांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांची दखल घेऊन त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल. तिथे येणाऱ्या लाखो अनुयायांची कोणतीही गैरसोय होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
महापरिनिर्वाण दिनासाठी येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्यासंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

अनुयायांच्या सुरक्षिततेस प्राधान्य – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

देशभरातून आणि राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देण्यात यावे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले. चैत्यभूमी परिसरासह मुंबईत येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रशासनाने सज्ज राहून नागरिकांच्या सुविधा आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांच्यासह विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठकीत विविध सूचना मांडल्या. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 70 वा महापरिनिर्वाण दिन असून, 5 आणि 6 डिसेंबरला चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात भाविकांची संख्या सुमारे 15 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

Read About : Maharashtra dam water levels 2026 – धरणांतील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांची घट

E-paper : Punyanagari E-Paper

Comments

Comments will appear here.

Comments are submitted for administrator moderation before appearing publicly.